बिग स्क्रीनवर फिल्म्सच्या कमबॅकप्रमाणेच, अनेक जुन्या सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा समोर येत असतात. अशीच एक अभिनेत्री सोनाली बेंद्रेची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकप्रिय असण्याबद्दल वक्तव्य केले आहे. खरे तर ही लोकप्रियता नकारात्मक होती. अभिनेत्रीने तिच्या दिसण्यावरून तिला कशी टीका सहन करावी लागली होती याबद्दल तिने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आता माझी खूप स्तुती होते. पण, एक काळ असा होता जेव्हा लोकांनी माझ्यावर खूप टीका केली. माझ्या शरीराची खूप खिल्ली उडवली जायची. मी इतकी बारीक होते की, मला ‘लँप पोस्ट’ किंवा ‘जिराफ’ असं म्हटलं जायचं. कारण- माझा गळा लांब आहे. आता माझ्यासाठी तो एक मोठा गुण आहे. आता तोच गळा सर्वांना आवडतो. शाळा आणि कॉलेजमध्ये मला खूप चिडवलं जायचं; पण मला त्याचा कधीच फरक पडला नाही. मी सगळं मजेशीररीत्या घेतलं.” असं सोनाली बेंद्रेने ‘लेहरेन टीव्ही’वरील जुन्या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा… Fabulous Lives vs Bollywood Wives फेम शालिनी पासीने सांगितली डाएटमधली ‘ही’ सीक्रेट गोष्ट, घरोघरी असणाऱ्या या गोष्टीचा होतो आरोग्याला फायदा, तज्ज्ञ सांगतात…

सोनाली बेंद्रेच्या या मुलाखतीवरून दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांना बॉडी शेमिंगचा सामना कसा करावा हे विचारलं. वोक्हार्ट हॉस्पिटल्स मिरा रोडच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती आपल्या शरीराकडे कोणत्या पद्धतीने पाहते आणि ते स्वीकारते हे मुख्यत्वे ती व्यक्ती कोणत्या संस्कृतीत वाढते यावर अवलंबून असतं. “आपल्याकडे सोशल मीडियाचा अतिरिक्त प्रभाव आहे. ‘परफेक्ट लाइफ’ खरं तर आपण कसं जीवन जगतो आणि गोष्टी कशा स्वीकारतो यावर सर्वस्वी अवलंबून असतं” , असं डॉ. आनंद यांनी सांगितलं.

त्यांच्या मते, शरीराच्या सकारात्मक मूल्यांची कमी आणि पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे असुरक्षितता निर्माण होऊ शकते. “पालकांनी मुलांना शरीरातील बदल आणि त्यांना कसं स्वीकारावं याचं शिक्षण देणं आवश्यक आहे,” असे आनंद यांनी सांगितले.

एक समाज म्हणून आपण फक्त बाह्य सौंदर्य न पाहता, आपली दृष्टी बदलायला सुरुवात केली पाहिजे. सोशल मीडियामुळे आपल्या जीवनावर परिणाम व्हायला नको याची काळजी घेतली पाहिजे. येथे संवाद खूप महत्त्वाचा आहे. या समस्यांबद्दल बोलल्यानं आपल्याला त्या समस्येची जाणीव होईल आणि उपाय कसे शोधता येतील हे समजेल,” असे डॉ. आनंद यांनी सांगितले.

हेही वाचा… Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

“मानसिक आरोग्य सकारात्मकपणे विकसित करण्यासाठी शारीरिक फिटनेस आणि योग्य जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. त्यात योग आणि ध्यान या बाबी मोठ्या प्रमाणावर मदत करतात. पुरेशी झोप घेणं आणि पोषणाची काळजी घेणं यांमुळे आपल्या शरीराविषयीचे दृष्टिकोन सुधारू शकतात.”

तथापि, कधी कधी या समस्या गंभीर होऊ शकतात आणि त्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून याची तपासणी केली पाहिजे, असे डॉ. आनंद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre was body shamed due to her long neck people called her giraffe dvr