पावसाळ्यातील शरीर-स्थिती जी अनारोग्यकर होते,तिला अनुसरून आयुर्वेदाने यूष किंवा सूपचे प्राशन करावे असा सल्ला दिला आहे.
पावसाळ्यात जो आहार घ्यावा असा आयुर्वेदामध्ये निर्देश आहे,त्यामधील एक मुख्य खाद्यपदार्थ म्हणजे यूष किंवा सूप. (चरकसंहिता १.६.३८) पावसाळ्यातील शरीर-स्थिती जी अनारोग्यकर होते, तिला अनुसरून ऋषिमुनींनी यूष किंवा सूपचे प्राशन करावे असा सल्ला दिला आहे. (अष्टाङ्गसंग्रह १.४.४५)ज्या सूप्सचे प्राशन उपवासाच्या दिवशी करणे योग्य होईल. सूप हा शब्द आज इंग्रजीमध्ये सर्रास वापरला जात असला तरी तो मुळात संस्कृत आहे, हे
समजल्यावर वाचकांना गंमत वाटेल. (सुश्रुतसंहिता १.४६.३४९)
आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात थंड पदार्थ का टाळावेत?
पावसाळ्यातील अनारोग्यकर स्थिती म्हणजे मंदावलेली भूक, कमजोर पचनशक्ती,दुर्बल शरीर, वातप्रकोप व पित्तसंचय.या गोष्टींचा विचार करून यूष व सूप पिण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.शरीराला आवश्यक ते बल देणारा हलका आहार तर मिळावा, मात्र तो पचवण्याचा ताण अग्नीवर येऊ नये,अशी सूप-यूषची योजना करण्यात आली आहे. सूप-यूष तयार करताना त्यामध्ये चिंच-आमसूलासारखे आंबट पदार्थ कटाक्षाने मिसळण्याचे कारणही ‘आंबट रस हा वातशमन तर करतोच, शिवाय आंबट रसामुळे भूक वाढून सेवन केलेल्या अन्नाचे पचन होते’, हा आहे. विविध डाळींपासुन तयार केलेल्या सूप्सचे गुणदोष पुढे सांगितले आहेत . सर्वच सूप्स अतिमात्रेमध्ये पित्तकारक आहेत,हे विसरू नये.
आणखी वाचा: Mental Health Special: मोबाईलमध्ये मश्गुल मुलांचं काय करायचं?
यूष तयार करण्याची पद्धत
मूग, मटकी, मसूर वगैरे धान्य ४ तोळे (अंदाजे ४० ग्रॅम) घेऊन त्यामध्ये त्याच्या (मूग-मटकी-मसूर वगैरे कडधान्यापसुन बनवायचे असेल तर) सोळा पट पाणी आणि तांदूळ,जवापासुन यूष बनवायचे असेल तर आठ पट पाणी टाकून ते मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित उकळवून निदान एक चतुर्थांश बाकी राहील इतपत आटवावे.कडधान्यांपासून बनवताना कडधान्य बोटाने चेपून नीट शिजले आहे का ते पाहावे. नंतर त्या मिश्रणामध्ये आमसूल, चिंच, डाळिंबाचे दाणे, जिरे, गूळ, मोहरी असे पदार्थ (चवीनुसार) मिसळून त्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी द्यावी, की झाले तयार ‘कृतयूष. तेल-तुपाची फोडणी न देता बनवलेले ते ‘अकृतयूष’. फोडणी दिलेल्या कृतयूषापेक्षा फोडणी न दिलेले अकृतयूष हे पचायला हलके आहे. (चरकसंहिता १.२७.२६४) यूष आणि सूप या दोन पदार्थांमध्ये फरक आहे.
सूप तयार करण्याची पद्धत
सूप तयार करताना मूग, मसूर, तूर इत्यादी कडधान्यांची डाळ घ्यावी. ती डाळ स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजवत ठेवावी. नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून ती शिजवावी. त्यामध्ये चवीनुसार (गरजेनुसार) चिंच, कोकम, जिरे, मोहरी, गूळ मिसळून एक उकळी येईपर्यंत शिजवावे. तेल वा तुपाची फ़ोडणी द्यावी. तेल किंवा तुपाची फोडणी देऊन बनवलेले सूप वातशमनासाठी उपयुक्त असल्याने या सूपचा पावसाळ्यात अधिक उपयोग होतो. या सूपमध्ये कांदा, मुळा, मेथी, पडवळ, बटाटा, शेवगा, वांगे, गवार, लसूण,इ. भाज्या सुद्धा मिसळल्या की ते सूप अधिक पोषण देणारे असे बनते. अग्नी मंद असताना मात्र वरील पदार्थ सुपामध्ये मिसळू नयेत. सूप तयार करताना डाळ न वापरता अखंड कडधान्य वापरायचे असेल तर ते दहाबारा तास भिजवून ठेवावे आणि मग सूप बनवावे.