Sports And Energy Drinks Benefits : तुमच्यापैकी बरेच जण स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स पित असतील; पण अनेकांना या दोन्हीतील फरक समजत नाही. स्पोर्ट्स आणि एनर्जी ड्रिंक्स म्हणजे एकसारखेच आहे, असे अनेकांना वाटते. पण, बारकाईने तपासणी केल्यानंतर त्यातील फरक समजून घेता येतो. याचविषयी हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. सुधीर कुमार म्हणाले की, स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये असे पोषक घटक असतात, जे जास्त व्यायाम केल्याने शरीरातून कमी होत जातात. त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. तर, एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर, कॅफिन व टॉरिन यांसारखे उत्तेजक घटक असतात.
एक चांगला नियम म्हणजे एक तासापेक्षा जास्त काळ व्यायाम करताना किंवा खूप उष्ण किंवा दमट परिस्थितीत व्यायाम करताना स्पोर्ट्स ड्रिंक्स वापरणे इष्ट. कारण- कॅफिन असलेले एनर्जी ड्रिंक्स शरीराला तात्पुरते ऊर्जा देऊ शकते; परंतु त्यातून शरीरास मुबलक पोषक घटक मिळत नाहीत. त्याशिवाय कॅफिन हे मूत्रवर्धक आहे, ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.
लहान मुलं अन् किशोरवयीन मुलांसाठी घातक
एनर्जी ड्रिंक्समधील उत्तेजक घटकांमुळे लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये इतर संभाव्य आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विकसनशील हृदय आणि मेंदूवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत लहान मुलांना एनर्जी ड्रिंक्स देणं टाळावं किंवा त्यांचा वापर शक्य तितका कमी करणं चांगल आहे,” असे डॉ. कुमार यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्समधील फरक जाणून घेणे गरजेचे आहेच. त्याशिवाय ही पेये तुमच्या शरीरावर, विशेषतः पचन आरोग्यावर कसा परिणाम करतात हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे. ही दोन वेगळी पेये आहेत, ज्यांचे उद्देश, फॉर्म्युला आणि त्यातील घटक वेगवेगळे आहेत, असे लीलावती हॉस्पिटल मुंबईच्या आहारतज्ज्ञ डॉ. वीणा पै म्हणाल्या.
स्पोर्ट्स ड्रिंक्सचे फायदे, तोटे
नावांप्रमाणेच स्पोर्ट्स ड्रिंक्स हे बहुतेकदा खेळाडू किंवा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंच्या पसंतीचे असते. स्पोर्ट्स ड्रिंक्स पिण्याचा उद्देश विविध खेळ खेळताना शरीराने गमावलेले कार्बोहायड्रेट्स, इलेक्ट्रोलाइट्स व द्रव पदार्थांचे प्रमाण पुन्हा भरून काढणे हा आहे. त्यामध्ये बहुतेकदा संतुलित घटक असतात. तसेच त्यात शरीरास जलद ऊर्जा देण्यासाठी साखर आणि हायड्रेशन राखण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश असतो, असे डॉ. पै म्हणाले.
खेळताना शरीरातील कमी होणारी पाण्याची पातळी वाढण्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स डिझाईन केलेले असते. या स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये कार्बोहायड्रेट्स (साखर)व्यतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम) असतात.
स्पोर्ट्स ड्रिंक्स सामान्यतः पचनसंस्थेसाठी सुरक्षित असतात. त्यातील उच्च साखरेचे प्रमाण कधी कधी जठरांसंबंधित समस्या निर्माण करू शकते. विशेषत: ज्यांना पोटांसंबंधित आजार आहे, त्यांच्यासाठी हे त्रासदायक ठरू शकते.
भरपूर व्यायाम करणाऱ्या किंवा शारीरिक हालचाल करणाऱ्या लोकांना हायड्रेटेड राहण्यासाठी आणि शरीरातील आवश्यक पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स फायदेशीर मानले जाते, असे हैदराबादच्या लकडिकापुलमधील ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स जीआय ऑन्कोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. नादेंडला हजारथैया म्हणाले.
एनर्जी ड्रिंक्सचे फायदे, तोटे
दुसरीकडे एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन आणि साखर असते, हे घटक शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात; पण ते प्रामुख्याने उत्तेजक म्हणून काम करतात. एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन, साखरेसह त्यात ग्वाराना, टॉरिन व जिनसेंग यांसारखे उत्तेजक घटक असतात. एनर्जी ड्रिंक्समध्ये स्पोर्ट्स ड्रिंक्सच्या तुलनेत खूप कमी पौष्टिक घटक असतात. त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वारंवार सेवन केल्यास तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असेही डॉ. पै म्हणाले.
एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाने शरीरातील गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमला धोका निर्माण होऊ शकतो. कॅफिनचे उच्च प्रमाण पोटात आम्लाचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे आम्ल रिफ्लक्स किंवा गॅस्ट्र्रिटिससारख्या समस्या उद्भवू शकतात,” असे डॉ. हजारथैया म्हणाले.
एनर्जी ड्रिंक्समधील जास्त साखरेचे प्रमाण पोट फुगणे आणि गॅसच्या समस्येस कारणीभूत ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये, एनर्जी ड्रिंक्समुळे पोटाच्या अस्तरांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता किंवा मळमळ होऊ जाणवू शकते, असे डॉ. हजारथैया म्हणाले.
खूप जास्त व्यायाम करताना शरीरास हायड्रेशनसाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स फायदेशीर ठरू शकतात; परंतु एनर्जी ड्रिंक्सचे सेवन सावधगिरीने केले पाहिजे. कारण- त्याच्या नियमित सेवनाने गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या निर्माण होऊ शकते, असे डॉ. हजारथैया म्हणाले.
डॉ. पै पुढे म्हणाले की, स्पोर्ट्स ड्रिंक्स असोत किंवा एनर्जी ड्रिंक्स, ही पेये पिताना अतिरेक करू नये. त्याऐवजी लिंबूपाणी, नारळ पाणी किंवा भाज्यांचा रस यांसारखे आरोग्यदायी पर्याय निवडा.