Control Blood Sugar Level: मधुमेह हा एक जुनाट चयापचयासंबंधीचा आजार आहे. त्यात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी होते. त्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड व नसा यांना गंभीर नुकसान पोहोचते. आनुवंशिक असलेल्या मधुमेहाची अनेक कारणे आहेत. या आजारपणात खाण्यापिण्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह झाल्यानंतर काही पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे लागते आणि काही पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरात तुम्ही जे अन्न खाता, त्याचा तुमच्या शरीरावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळे रक्तशर्करेची समस्या असलेल्या लोकांना खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी तुमच्या दिवसाची सुरुवात कोणत्या पदार्थांनी करावी, याच विषयावर हंग्री कोआला येथील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा
१. ओट्स
मधुमेहाच्या रुग्णांना अशा पदार्थांचे सेवन करावे लागते; ज्यात भरपूर फायबर असते आणि भरपूर पोषक असतात. तसेच साखर आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अनेक आरोग्य तज्ज्ञ मधुमेही लोकांना ओट्स खाण्याचा सल्ला देतात. ओट्समध्ये कॅलरीज कमी आणि फायबर भरपूर असते. ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. नाश्त्यात ओट्स खाल्ल्यास मधुमेही रुग्णांना दिवसभर ऊर्जा मिळते. ओट्स खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. स्वाभाविकत: त्यामुळे जास्त खाल्ले जाण्यास प्रतिबंध होतो. ओट्समध्ये कॅलरीज नसतात आणि त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.
२. बार्ली
मधुमेह किंवा प्री-डायबेटिक लोकांसाठी बार्ली खूप फायदेशीर मानली गेली आहे. ओट्सप्रमाणेच बार्ली ही बीटा-ग्लुकन सामग्रीमुळे रक्तातील साखर स्थिर करण्यासाठी प्रभावी आहे. त्यातील फायबर इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
(हे ही वाचा: झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!)
३. शेंगा
मसूर आणि काळे बीन्स यांसारखे पदार्थ फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. हे दोन्ही पदार्थ ग्लुकोजचे शोषण कमी करणे आणि रक्तातील साखरेची जलद वाढ रोखणे यासाठी महत्त्वपूर्ण असतात.
४. नट
बदाम, अक्रोड व इतर शेंगदाणे पचनशक्ती सुधारणे आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राखणे यासाठी एकत्रितरीत्या काम करतात.
५. पालेभाज्या
पालक व इतर पालेभाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.