Benefits Of Raw Turmeric Chai: तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? काही जण सकाळी एक चमचा तूप व कोमट पाणी पित तर काहीजण मेथीचे, धण्याचे, जिऱ्याचे, ओव्याचे, तुळशीचे पाणी पिऊन दिवस सुरु करतात. आता हे काहीजण म्हणजे खरंतर ‘काहीच’ जण आहेत. याउलट फक्त चहा किंवा कॉफी पिऊन पळापळ सुरु करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत जो या दोन्ही गटांना एकत्र आणू शकेल. हो बरोबर वाचलंत, छान वाफाळता चहा घेऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. इंस्टाग्रामवर शेफ शिप्रा खन्ना यांनी या आरोग्यदायी चहाची रेसिपी शेअर केली आहे. सुरुवातीला हा चहा कसा बनवायचा हे आपण पाहूया आणि मग याचे भन्नाट फायदे सुद्धा तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..
चहा कसा बनवायचा?
साहित्य
पाणी
कच्ची हळद
गरज असल्यास गूळ
पद्धत
- थोडे पाणी उकळून घ्या.
- उकळल्यावर गॅस बंद करा.
- थोडी कच्ची हळद किसून घ्या. उकळी काढा
- गाळून घ्या.
खन्ना यांनी सुद्धा आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये या हळदीच्या चहाचे काही फायदे नमूद केले आहेत. खन्ना सांगतात की, कच्च्या हळदीमध्ये कर्क्युमिन हे दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले सत्व असते. कच्ची हळद जळजळ कमी करण्यास, प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकते. काही अभ्यासांनुसार, यात कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. तुम्हाला तुमचा चहा गोड आवडत असल्यास तुम्ही गूळ किंवा खोबऱ्याची पावडर घालू शकता.
कच्च्या हळदीच्या चहाचे फायदे
जिंदाल नेचर क्युअर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी खन्ना यांच्याशी सहमती दर्शवत इंडियन एक्सस्प्रेसला माहिती दिली की, कच्च्या हळदीमध्ये मुख्यतः कर्क्यूमिन हा प्रमुख घटक असतो. तुमच्या दिनचर्येत विशेषतः सकाळच्या वेळी कच्च्या हळदीचा वापर करून, तुम्ही तुमच्या शरीरात होणारी जळजळ कमी करू शकता. विशेषतः सांधेदुखीचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर ठरू शकते.
याव्यतिरिक्त, क्युरक्यूमिनचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील मुक्त रॅडिकल्सवर प्रभावी असतात ज्यामुळे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत मिळू शकते. कच्च्या हळदीचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण तुमच्या शरीराच्या संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यास मदत करतात. काही अभ्यासात कर्क्युमिनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात असे सुचवले असले तरी, ठोस पुरावे समोर येण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. तरीही, कच्च्या हळदीचा तुमच्या दिनक्रमात समावेश करणे हे संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी एक सक्रिय पाऊल असू शकते.
हे ही वाचा<< ७ दिवस फक्त पाणी पित उपवास केल्यास वजन, रक्तदाब, रक्तातील साखर यात काय फरक पडतो? सूत्र समजूया..
काय लक्षात ठेवावे?
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही फायदेशीर गोष्टीसाठी सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज आणि सहनशीलता भिन्न असते, म्हणून आपल्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांसह सल्लामसलत करणे गरजेचे आहे, विशेषत: तुम्हाला अन्य कोणते आजार असतील किंवा औषधे चालू असतील तर तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.