Stomach Gas Home Remedies: सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे दिनचर्या आणि आहारशैली बदलत राहते. अशा अनियमित जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यातील सामान्य समस्या म्हणजे पोट फुगणे. यालाच ‘ब्लोटिंग’ असेही म्हणतात. ब्लोटिंगमध्ये पोटात जास्त गॅस जमा होतो आणि पोट फुगू लागते. बऱ्याच लोकांना छोले किंवा राजमा खाल्ला की लगेच पोट फुगण्याचा, गॅसेस होण्याचा त्रास होतो, त्यामुळे मग ते हे दोन्ही पदार्थ खाणं टाळतात. असंतुलित आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा जास्त खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. गॅसने पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सल्लागार, डॉ. प्रतीक तिबडेवाल यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. प्रतीक तिबडेवाल सांगतात, “राजमा आणि छोले अत्यंत फायदेशीर आहेत, कारण ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम आहार पर्याय ठरतात. ते विरघळणारे फायबर, लोह आणि प्रथिने यांनी भरलेले असतात, जे वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, रक्तदाब राखण्यास आणि त्वचा सुधारण्यास मदत करतात. तथापि, हे दोन्ही लेक्टिनने भरलेले आहे, त्यामुळे फुगणे आणि गॅससारख्या पाचक समस्या उद्भवू शकतात.”

यासाठी उपाय म्हणून तुम्ही भिजवलेल्या शेंगांमध्ये कढीपत्ता, दालचिनीची काडी, हिंग, मीठ आणि आले घालणे ही युक्ती करू शकता. पण, उकळण्याआधी किमान अर्धा तास ते सर्व एकत्र भिजत ठेवा. हे पाच घटक छोले किंवा राजमाचे अम्लीय गुणधर्म शोषून घेतात, त्यामुळे पोट फुगणे आणि गॅस टाळण्यास मदत होते.

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा हे उपाय

हिंग : हिंग पोटात आणि लहान आतड्यात पाचक एन्झाईम्सची क्रिया वाढवून गॅस आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून प्या. हिंगामुळे पोट साफ होते आणि गॅसपासून आराम मिळतो.

आले : आल्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात जे अपचन, मळमळ दूर करण्यास मदत करतात. स्वयंपाक करताना तुम्ही किसलेले आले किंवा ताजे आले पेस्ट वापरू शकता.

दालचिनीची काठी : दालचिनीमध्ये कार्मिनेटिव गुणधर्म असतात, ते गॅस निर्मिती कमी करण्यास मदत करते आणि पचनास मदत करते.

कढीपत्ता : कढीपत्त्यात पाचक एन्झाईम्सदेखील असतात, जे पचनास मदत करतात आणि गॅस टाळतात.

मीठ : सोडियम आणि क्लोराईड आयन पचन आणि पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करतात, यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपण काळे मीठदेखील वापरू शकता.

अपचन, गॅस टाळण्यासाठी व्यक्तींनी रात्री छोले किंवा राजमा यांसारख्या शेंगा खाणे टाळावे, असे डॉ. तिबडेवाल यांनी सांगितले. काही गुंतागूंत टाळण्यासाठी या शेंगा खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित समस्या वाढल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. तिबडेवाल म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stomach gas problem how to get instant relief from stomach gas home remedies pdb