भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, भारतीय लोक मोठ्या प्रमाणात अँटीबोयोटिक्स घेत असल्यामुळे त्यांच्या शरीरातील जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढली असल्यामुळे ते औषधांना दाद देत नाहीत. याचा अर्थ गंभीररीत्या अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर औषधांचा अनुकूल परिणाम न होता, रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा औषधांचा (अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल) गैरवापर हे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे त्याबद्दल खबरदारी घेणं गरजेचं आहे. शिवाय लोकांच्या शरीरावर औषधांचा योग्य परिणाम न होण्याचं कारण आणि औषधांचा वाढता गैरवापर होण्याची कारणं याबाबतची सविस्तर माहिती डॉक्टर रोमेल टिक्कू (मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत येथील इंटरनल मेडिसिनचे संचालक) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे. त्यांनी सांगितलं की, अँटीबायोटिक्सचा सततचा मारा हा जीवाणूंना सशक्त करत असतो. कारण- सवयीनं जीवाणूसुद्धा औषधांशी जुळवून घेऊ लागतात; ज्यामुळे ते आणखी मजबूत होतात. त्यामुळेच किरकोळ संसर्गासाठी कोणत्याही अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीरावर औषधांचा योग्य तो परिणाम न होण्याची कारणे

पहिले कारण म्हणजे अँटिबायोटिक्स सहजपणे उपलब्ध होतात आणि आपण थोडे जरी आजारी पडलो तरी लवकर बरे होण्याच्या अपेक्षेने औषध घेण्याची आपली सवय. त्यामुळे लोक योग्य उपचारांऐवजी स्वतःहून अँटीबायोटिक्स घेण्यासाठी मेडिकलमध्ये जातात. शिवाय, अनेकदा ते ओळखीच्या डॉक्टरांना औषधांचा कोर्स लिहून देण्यास भाग पाडतात आणि डॉक्टरांनी नकार दिला, तर ते थेट फार्मासिस्टकडून हवी ती औषधं विकत घेतात.

डॉक्टर सांगातत की, अनेकदा मला माझ्या रुग्णांना ताप, अंगदुखी व डोकेदुखीसाठी पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला द्यावा लागतो. परंतु, त्यापैकी अनेक जण नंतर आयबुप्रोफेन आणि डायक्लोफेनाक यांसारखी औषधं स्वत:च्या मनानं घेतात. जेव्हा एखाद्याला तापाचं कारण माहीत नसतं तेव्हा पॅरासिटामॉल हे सर्वांत सुरक्षित औषध असतं. मात्र, त्यानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्हाला नेमकं कोणतं औषध घ्यायचं आहे ते विचारू शकता. तसेच पॅरासिटामॉलदेखील जास्त प्रमाणात घेऊ नये. कारण- औषधाचा डोस एखाद्या व्यक्तीचं वय आणि शरीराचं वजन यावर अवलंबून असतो.

सर्वांत जास्त गैरवापर केली जाणारी औषधं कोणती आहेत; जी लोक त्यांच्या मर्जीनं मेडिकल स्टोअरमधून विकत घेतात ती पुढीलप्रमाणे :

Azithromycin – ताप, घसा दुखणं, प्रौढ आणि मुलांमध्ये खोकला.
Amoxycillin – सामान्य सर्दी, ताप, कान दुखणं, घसा दुखणं व खोकला.
Amoxycillin (Clavulanic acid कॉम्बिनेशन) – प्रौढांमध्ये ताप, घसा दुखणं व खोकला.
सिप्रोफ्लोक्सासिन, ऑफलोक्सासिन – मूत्रमार्गात संसर्ग व अतिसार.
Cefixime – ताप, घसा दुखणे व खोकला.

अँटिबायोटिक्सचा गैरवापर होण्याचं आणखी एक कारण म्हणजे लोक परदेशांत जाण्याच्या निमित्तानं अनेकदा अँटिबायोटिक्स साठवून ठेवतात किंवा तिथे राहणाऱ्या कुटुंबीयांना पाठवण्यासाठी ते ती खरेदी करतात. औषधांचा शरीरावर योग्य तो परिणाम न होण्याचं तिसरं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे क्लिनिकल नियमांचं पालन न करणं. कारण- अनेक लोक त्यांना बरं वाटू लागल्यावर ओषधांचा डोस घेणं मध्येच थांबवतात. अँटिबायोटिक्स घेण्याच्या नियमांचं पालन न केल्यानं आणि अंदाधुंद वापराचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे औषध-प्रतिरोधक क्षयरोग (टीबी); जे आपल्या देशासाठी एक मोठं संकट बनलं आहे.

चौथं कारण म्हणजे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णापर्यंत सुपरबग्सचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्णालयांमधील चुकीचा स्वच्छता प्रोटोकॉल. कारण स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली नाही तर रुग्णालयातील संसर्गांची संख्या वाढते. विशेषत: वैद्यकीय उपकरणं आणि सामायिक केलेल्या जागांसाठी योग्य प्रोटोकॉल असावेत. तसेच आरोग्य सेवेतील प्रत्येक व्यावसायिकानं योग्यरीत्या मास्क घालणं, हातमोजे घालणं आणि निर्जंतुक गाऊन घालणं आवश्यक आहे. हातांची स्वच्छता आणि स्वच्छता प्रोटोकॉलचं पालन करणं या बाबी प्रतिजैविक-प्रतिरोधक संक्रमणाचा प्रसार रोखण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. तुमचं लसीकरण अद्ययावत आहेत का याची खात्री करणंदेखील गरजेचं आहे. तसेच रुग्णांना ते करीत असलेल्या औषधांच्या चुकीच्या वापराच्या धोक्यांबद्दल त्यांना शिक्षित करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना तयार करणं गरजेचं आहे, असंही डॉक्टर म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop taking antibiotics for minor illnesses including colds and fevers using drugs at will can be dangerous jap
Show comments