Smartwatch could help detect heart attack : स्मार्ट वॉचची सध्या बाजारात खूप मागणी आहे. अॅपलच्या मागोमाग अनेक कंपन्यांचे स्मार्ट वॉच आले. या स्मार्ट वॉचमध्ये अनेक फीचर्स दिली जातात. रोज पायी किती चाललात, तुम्ही कोणत्या लोकेशनवर आहात, कोणते अॅप्स वापरताय या सगळ्याची माहिती या स्मार्ट वॉचमध्ये असते. एवढंच नाही, तर तुमच्या आरोग्याची काळजीही हे घड्याळ घेतं. तुमच्या हृदयाचे ठोके आणि त्याविषयीची माहिती यातून मिळते. एवढंच नाही तर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ओळखून, स्मार्ट वॉच प्रसंगी तुमचा जीवही वाचवू शकतो.
तुमच्या हृदयाची गती, झोपेचे नमुने, शारीरिक क्रियाकलाप आणि अगदी रक्तातील ऑक्सिजनची पातळी, असे शरीरातील सूक्ष्म बदल ओळखण्यासाठी स्मार्ट वॉच साह्यभूत ठरू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या अभ्यासात हे अधोरेखित करण्यात आले आहे की, स्मार्ट वॉचमुळे तुम्हाला श्वसन संक्रमण, हृदयाची स्थिती आदी बाबी लवकर ओळखता येतात. स्मार्ट वॉच असल्यास हृदयविकाराचा झटका येण्याआधी आपल्याला इशारा मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला वैद्यकीय मदत मिळविणे शक्य होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिश जैन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. अनिश जैन म्हणाले, “ही उपकरणे केवळ ऑक्सिजन पातळी मोजतात आणि थेट ईसीजी रीडिंग देतात. सिंगल-लीड ईसीजी हृदयाच्या विशिष्ट लयीतील बिघाड शोधू शकतो; परंतु हृदयविकाराच्या निश्चित निदानासाठी 12-लीड ईसीजी आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, स्मार्ट वॉचमध्ये एक सेन्सर बसवलेला असतो; जो तुमच्या मनगटातील नसांतून तुमच्या हृदयाचे ठोके ओळखतो. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वेगळा असतो. हा वेग कमी किंवा जास्त झाल्यास स्मार्ट वॉचचा सेन्सर तुम्हाला तशी सूचना देतो; ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.
हेही वाचा >> महिनाभर दात न घासल्यास शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या
मात्र, स्मार्ट वॉचवर पूर्णत: अवलंबून राहता येणार नाही. त्यासाठी वरचेवर आरोग्य तपासणी करीत राहणे गरजेचे आहे.