मानवी जीवनाच्या हजारो वर्षांच्या प्रवासात ज्यांना उत्क्रांती तत्त्वज्ञानाचा पुरावा पाहावयाचा असेल त्यांनी उसाकडे पाहावे. या पृथ्वीवर प्रथम कोणत्या तरी गवताचे स्वरूप असलेल्या वनस्पतीचे आजचे उत्क्रांत स्वरूप आपले सर्व जीवन व्यापून आहे. ऊस आहे म्हणून जीवनात गोडी आहे.
दर क्षणी शरीराला एनर्जी किंवा पेट्रोल लागते. ते पेट्रोल उसामुळे शरीराला मिळते. कावीळ, यकृतवृद्धीचे विकार, उदर, जलोदर, पांथरी वाढणे, वजन अकाली घटणे या विकारांत पथ्यपाणी खूप असते. त्यामुळे अन्न नकोसे वाटते. अशा वेळी उसाचा उपयोग होतो. विशेषत: कावीळ विकारात उसाचे तुकडे करून ते चावून चावून खावेत. बाजारातील माश्या बसलेला ऊस किंवा गुऱ्हाळातील उसाचा रस जुलाब, टाइफाईड, कॉलरा या रोगांना कारण होऊ शकतो. कावीळ किंवा लिव्हर विकारात रोज फक्त संबंध ऊस चावून खाल्ला तर औषधाशिवाय रोग लवकर बरा होतो.
लघवीची आग होणे, लघवीतून रक्त जाणे, तिडीक मारणे या विकारात नियमित ऊस खावा, लघवी साफ होते. पायावरची सूज कमी होते. कमी रक्तदाब, मुंग्या येणे, चक्कर, फेकल्यासारखे पडणे या विकारांत उसाचे एक दांडके चावून खावे. मूतखडा विकारात उसाच्या मुळांचा काढा चहाऐवजी घ्यावा.
उसाचा शिरका- आपल्या देखरेखीखाली उसाचा अर्धा लिटर रस काढून घ्यावा. त्यात चवीपुरते सुंठ व मिरेपूड मिसळावी. पाऊण लिटरच्या बाटलीत हे मिश्रण ठेवून द्याावे. वरचे झाकण एक आटा सैल असावे. आतील गॅस बाहेर निघून जायला वाव हवा. वीस दिवसांनंतर बाटलीत रस गाळून घ्यावा. वर बुरशी आली असली तर ती अलगद काढून टाकावी. पोटदुखी, जुलाब, उलट्या, गॅस धरणे, अजीर्ण, अपचन, अरुची, अग्निमांद्या, ढेकरा इत्यादी आमाशयाच्या तक्रारींवर हा उसाचा शिरका उत्तम औषध आहे. जेवणानंतर गरजेप्रमाणे १० ते २० मिली एवढ्याच प्रमाणात घ्यावे.
उसापासून बनणाऱ्या पदार्थांत खडीसाखर श्रेष्ठ आहे. चांगली पत्री खडीसाखर ही कफ होऊ देत नाही. त्यामुळेच वृद्ध माणसाच्या न हटणाऱ्या कफ, दमा, खोकला, आवाज बसणे, थकवा याकरिता खडीसाखर व लवंग आलटून पालटून चघळणे हा उत्तम उपाय आहे. गायक, वक्ते, शिक्षक यांच्या स्वरयंत्रावर ताण पडू नये म्हणून त्यांनी खिशात तंबाखू, सिगरेटऐवजी खडीसाखर, लवंग ठेवावी. चांगली खडीसाखर दुधात बनते. सोडा प्रक्रियेत बनलेली खडीसाखर औषधी उपयोगाची नाही.
उसापासून बनणाऱ्या पदार्थांत काकवी हा पदार्थ कनिष्ठ समजला जातो, पण ज्यांना शारीरिक श्रम खूप आहेत. थकवा येऊन चालत नाही. काम खूप केले पाहिजे त्यांच्याकरिता काकवी हे ‘स्वस्ताईचे टॉनिक’ आहे. काकवी तुलनेने उष्ण आहे. कफ व पित्त दोन्ही वाढते.
उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात. गूळ बनताना ती द्रव्ये नष्ट होत नाहीत. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वत्र साखरेऐवजी गूळच वापरावा. शरीराला लागणारी, दर क्षणाला आवश्यक असणारी केमिकलविरहित ‘चैतन्याची ऊब’ गुळामुळे मिळते. गुळाने मलावरोध होत नाही. तोंडाला चव येते. शरीर गार पडत नाही. रक्तदाब, चक्कर, गरगरणे यावर गूळ हा उत्तम उपाय होय. उन्हाळ्यात कडक उन्हाच्या परिणामांपासून लांब राहण्याकरिता गूळ खाऊन बाहेर पडण्याचा पूर्वी प्रघात होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा