Dental Hygiene Sugary Snacks: दातदुखीच्या वेदना ज्यांनी सहन केल्या आहेत त्यांनाच त्याची तीव्रता समजू शकते. एकदा का दात ठणकायला लागला की मग अन्य कोणत्याही कामाकडे बघणं सुद्धा कठीण होऊन बसतं. अलीकडे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीनुसार अनेक उपचार अगदी कमीत कमी वेळेत, खर्चात व त्रास न होऊ देता करता येतात पण काहीही झालं तरी ही तुमच्या नैसर्गिक दातांवर एका प्रकारची प्रक्रियाच झाली. हेच टाळायचे असल्यास तुम्हाला नियमित जीवनशैलीत काही साधे सोपे बदल करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही साखरेचे सेवन कमी करायला हवे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोड बिस्किटांमुळे दातांवर काय परिणाम होतो?

साखरेला रक्तात विरघळण्यासाठी लागणारी वेळ कमी असते. शरीरात जीवाणूंद्वारे होणारे चयापचय साखरेच्या बाबत अधिक वेगाने होते आणि त्यामुळे आम्ल तयार होते. हे आम्ल तोंडातही पसरल्याने दातांमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होते व पोकळी तयार होते. यानंतर आपण साखरेचे सेवन कमी न केल्यास किंवा तोंडाची नीट स्वच्छता न ठेवल्यास दाताला कीड लागू शकते.

दाताला कीड लागण्याची सुरवात ही लहान स्वरूपातच होते. तर दातांच्या पोकळीच्या आत असलेल्या मज्जातंतूपर्यंत कीड पोहोचण्यासाठी सुमारे १३महिने लागतात. अशा स्थितीत रूट कॅनलसारखी प्रक्रिया दातांच्या मुळांचे रक्षण करू शकते. लक्षात एकदा कीड मज्जातंतूपर्यंत पोहोचली की, तुम्हाला दातात वेदना जाणवतात आणि हिरड्यांना सूज येते.

जगभरातील प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना एपिकल पीरियडॉन्टायटीस (AP) किंवा दातांना कीड लागल्यामुळे वेदना होतेय असा एक तरी दात असतो. यासंदर्भात भारतात केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, प्रौढ लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतीयांश (६५ टक्के) लोकांना एपिकल पीरियडॉन्टायटीस असलेला किमान एक दात आहे. या एकूण त्रासावर डॉ गोपी कृष्णा, सरचिटणीस, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्डोडोन्टिक असोसिएशन (IFEA) यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना काही साधे सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे रूट कॅनल किंवा अन्य दात दुखण्याच्या उपचारात प्रत्येक दातासाठी खर्च होणारे १०, ००० आपण वाचवू शकता.

1) स्नॅकिंगचे प्रमाण कमी करा: सकाळी ११ वाजता चहा- बिस्कीट, 4 वाजता चहा- बिस्कीट परत रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणाऱ्या व्यक्तीला दिवसातून एकदा जास्त प्रमाणात गोड खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा दात किडण्याचा आणि संसर्गाचा धोका जास्त असतो. साखरेचे वारंवार सेवन केल्याने अधिक आम्ल तयात होते. हे आम्ल डेंटल प्लेकमधील बॅक्टेरियामध्ये राहून कीड लागण्याचा धोका वाढतो. म्हणून लक्षात ठेवा गोडं खाणं हानीकारक नाहीपण वारंवारता कमी करायला हवी.

2) रात्री दात घासणे: आपल्या तोंडातील बॅक्टेरिया आपण अन्न खाल्ल्यानंतर सक्रिय होतात आणि रात्री जेव्हा आपल्या तोंडातील लाळ कमी होते तेव्हा त्यांचा प्रसार वाढतो. दातांचे आजार आणि किडणे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी ब्रश करणे ही एक उत्तम सवय आहे.

3) तोंडाला हायड्रेट ठेवणे हा दंत रोग टाळण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. जसे आपले वय वाढत जाते तसे हे विशेषतः महत्वाचे आहे. कारण वाढत्या वयानुसार लाळ कमी होते, विशेषत: जर रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल यांसारख्या सामान्य आजारांसाठी तुम्ही अनेक औषधे घेत असाल तर याचा परिणाम अधिक होतो. तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी आणि अधिक हायड्रेट ठेवण्यासाठी दर दोन ते तीन तासांनी पाणी पिणे हा एक चांगला मार्ग आहे ज्यामुळे दंत रोग टाळता येतात.

हे ही वाचा<< आठवड्याला ७० तास काम का करू नये? मन व शरीराची काळजी घेण्यासाठी काय करावं, तज्ज्ञ सांगतात..

4) आपल्याकडे दातांच्या प्रक्रियेसाठी कोणतेही विमा कवच नाही त्यामुळे दातांच्या स्वच्छतेसाठी ५०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणे अनेकजण टाकतात. पण ही गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवा व नियमित अंतराने दातांच्या स्वच्छतेसाठी व तपासणीसाठी जा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugary biscuits with tea can decay teeth cost you around 10 thousand how acidity effects your teeth root canal cost svs