How to Take Care in Summer औषधाविना उपचार भारतीय संस्कृतीत वर्षप्रतिपदेला खूप खूप मोठे महत्त्व आहे. नुकत्याच संपलेल्या फाल्गुन मासातील- शिशिर ऋतूतील हवीहवीशी वाटणारी थंडी केव्हाच संपलेली असते. बघता बघता वसंत ऋतूचा सर्वात सुखद काळ केव्हाच मागे पडलेला असतो आणि झपाट्याने तुमच्याआमच्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे खूप प्रश्न उभे राहत असतात. एक काळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांत जीवन खूपच साधेसुधे व तुलनेने कमीत कमी धावपळीचे होते. आत्ताच्या केवळ शहरी जीवनातच नव्हे, तर ग्रामीण भागातही प्रचंड फेरबदल, उलटापालट झालेली दिसते. ‘वैशाख वणवा’ म्हटले तर अत्यंत त्रासदायक, पण दुसरीकडे त्याला तारुण्याची उपमा प्राचीन व आधुनिक शारीर शास्त्रज्ञांनी दिलेली आहेच. मे महिन्याच्या धगधगत्या उष्ण किंवा दमट तसेच दोन्ही प्रकारच्या हवामानाला जो टिकेल ‘तोच खरा पुरुष’ अशी व्याख्या केली जाते.
भरपेट न्याहारी, पुरेसे जेवण
भारतीय विमानदलात मी सुमारे दीड तप नोकरी केली. देशात, विविध भागांत अठरा उन्हाळे अनुभवले. सर्वच एअर फोर्स युनिटमध्ये खास उन्हाळ्याकरिता पुढील प्रकारे सुखाच्या मूलमंत्राचे फलक लावलेले असतात. ‘भरपेट न्याहारी आणि दुपारचे पुरेसे जेवण’. आत्ताच्या अति धावपळीच्या जगात काहींची दिवसाची सुरुवात भल्या पहाटे पाच-साडेपाचलाच होत असते. प्रत्येक कर्मचारी बाबू असो वा शारीरिक श्रमाची कामे करणारा कामगार असो, त्याला व्यवस्थित न्याहरी करायला ‘वेळच- टाईम’ नसतोच. तो कसाबसा कपभर चहा व त्याबरोबर पावाचा तुकडा किंवा दोन बिस्किटे खातो. अशा अत्यल्प सकाळच्या न्याहारीमुळे, आपण उन्हाळ्यात पुरेशी अन्नऊर्जा मिळवत नाही, हे त्याला कळत असते, पण वळतच नाही.
खजुराची ऊर्जा
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरमालकिणीला मुगाचे लाडू, नारळाच्या वड्या किंवा कोहळ्याच्या वड्या करावयास सांगाव्यात. एके काळी माझ्यासकट बहुतेक सर्व जण सकाळची सुरुवात श्री सूर्यनारायणाला किमान बारा सूर्यनमस्काराने वंदन करून करत असत. ज्यांना शक्य आहे त्यांनी, किमान सहा सूर्यनमस्कार, प्रत्येकी दोन, आईवडील व देवांकरिता अवश्य घालावेत. सूर्यनमस्कार, जोर बैठका व असाच शारीरिक व्यायाम करणाऱ्यांनी, थोडक्यात ऊर्जा मिळण्याकरिता एक-दोन खजुराची मदत अवश्य घ्यावी. थोडा वेळ असला तर थोडा गूळ, कणभर जिरे व दोन-तीन खजुराच्या बिया यांचे, मिक्सरच्या साहाय्याने सरबत करून प्यावे.
ताक प्यावे
माझा ‘पाव-बिस्किट संस्कृतीला’ खराखुरा तात्त्विक विरोध आहे. त्यांच्यात तुलनेने पोषणमूल्य खूप खूप कमी आहे. या दोन पदार्थांच्या निर्मितीतील स्वच्छतेची खात्री कोणी देऊ शकत नाही, अधिक लिहिणे न लगे. ज्वारीच्या उकडीचा कंटाळा आला, तर उपमा, शिरा वा चपाती यांचा आसरा घ्यावा. खूप स्थूल मंडळींनी ताजे ताकही प्यायल्यास दिवसभरात अधिक पोषणमूल्याची चिंता करावी लागत नाही.
पचायला जड अन्न नको
आपल्या नागरी व ग्रामीण समाजात प्रामुख्याने बहुसंख्याकांचा रोजचा कामाचा दिवस सकाळी आठ ते सायंकाळी पाच किंवा व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाल्या बाबूंकरिता सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसहा असा असतो. बहुतेकांचे दुपारचे जेवण हे उदरभरणाकरिता नसून दिवसभर काम करताना शारीरिक व मानसिक थकवा येऊ नये म्हणूनच प्रत्येक जण घेत असतो. ते कधीच पोटभर नसते. उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात ते खायला- पचायला खूप जड असून चालणार नाही, याची काळजी ‘घरातील लक्ष्मी’ नक्कीच घेत असते. त्याकरिता सुकी चपाती किंवा ज्यांना पंजाबी, राजस्थानी परोठे, पुऱ्यांमध्ये विशेष रुची असते त्यांनी मेथी परोठा, कांदे-बटाटे मिक्स परोठा व तोंडी लावण्याकरिता उन्हाने खराब न होणारी, तुलनेने कमी पातळ भाजी, तोंडीलावणी निवडावीत.
अतिस्थूल व्यक्तींना फलाहार हरकत नाही
या भाज्या- फळभाज्यांकरिता फ्लॉवर, कोबी, बिनबियाची काटेरी वांगी, कांदा, दुधीभोपळा, दोडका अशांच्यातून निवड करावी. काही मंडळी ऑफिसमध्ये एखादे सफरचंद किंवा केळी, चिकू, पपई, खरबूज, ठरावीक ऋतूमध्ये गोड द्राक्षे, आंबा यांची निवड करत असतात. स्थूल, अतिस्थूल व्यक्तींकरिता असा फलाहार ठीक आहे, पण दादा खडीवाल्यांसारख्या ‘काडी पैलवान’ माणसांनी दुपारी एक-दीड वाजता व्यवस्थित जेवावे असा शास्त्राचा सांगावा आहे. ज्यांना मे महिना किंवा वैशाख वणवा सुसह्य व्हावे असे वाटते त्यांनी ताकाचा ‘आधार’ जरूर घ्यावा.
आवडीनुसार खा, पण तेलकट नको
काही कार्यालयीन कर्मचारी घरून निघतानाच किंवा नऊ-दहा वाजता भरपूर नाश्ता करून निघतात व दुपारी अजिबात न जेवता अडीच-तीन किंवा चार वाजता निवांतपणे कमी-जास्त खाण्याचा पर्याय निवडतात. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी अनेक कार्यालयीन बाबूंना आपल्या कार्यालयातून घरी पोचायला रात्रीचे दहा-साडेदहाही होत असतात. अशा व्यक्तींच्या पुढे चार-साडेचार वाजता काय खावे व असे अन्नपदार्थ कसे पैदा करावे, असा यक्षप्रश्न नेहमीच असतो. मग अशा वेळेस या मंडळींनी जवळपासच्या कँटीन व हॉटेलमधील पदार्थांची गरजेपुरती मदत घेण्यास काहीच वावगे नाही. त्याकरिता आवडीनिवडीनुसार ब्रेड-बटर, टोस्ट सँडविच, फार तेलकट नसलेले पोहे घेणे वाईट नव्हे.
रस्त्यावरचे खाणे टाळा
अलीकडे पुणे, मुंबई शहरांत ठिकठिकाणी ‘खाऊगल्ल्यांचा’ धंदा खूप खूप जोरदार चाललेला आढळतो. या खाऊगल्ल्या सकाळी ९-१० वाजता व दुपारी ४-४॥ वाजता अशा कर्मचारीबंधूंच्या उदार आश्रयावर वाढत्या संख्येने आपला धंदा करताना दिसतात. वाचकमित्रांनो, अशा प्रकारचे रस्त्यावरचे खाणे स्वच्छ, आरोग्यदायी असायला पाहिजे, हे मी सांगावयास नकोच.
दूषित पाणी टाळा
मे महिन्यामध्ये असे रस्त्यावरचे दुपारचे खाणे झाल्यावर स्वाभाविकपणेच ‘खवय्यामंडळी’ हॉटेलमधील पाण्याची किंवा विविध वॉटर बॉटल सप्लाइंग कंपन्यांच्या बाटल्यांची निवड, बाटलीमागे वीस रुपये देऊन करतात. आपल्या देशात पिण्याच्या पाण्याची सार्वत्रिक खूप टंचाई आहे. पुणे, मुंबई अशी काही ठरावीक शहरे सोडली, तर नगरपालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या दर्जाची कोणी खात्री देऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी साठवलेल्या पाण्यातील ई- कोला अशा जंतुसंसर्गामुळे अतिदूषित झालेले पाणी सगळेच रोज पित असतात, पण काहींना मात्र अशा दूषित पाण्यामुळे अॅमिबायसिस, अपचन, अतिसार, जुलाब, पोटदुखी, जंत, कृमी, आम्लपित्त, उलटी अशा कमीअधिक रोगांचा केव्हा तरी सामना करायला लागतो.
सुंठ चूर्ण वापरा
समस्त मानव जातीकरिता सर्वात सुरक्षित पाणी म्हणजे उकळलेले, खळखळून उकळलेले पाणी हे सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी रस्त्यावरचे पाणी न पिता घरून आणलेल्या पाण्याची बाटली व त्याबरोबर चिमूटभर सुंठ चूर्णाची मदत जरूर घ्यावी. थोर आयुर्वेदीय शास्त्रकारांनी ‘शण्ठा्याम वातं शमयेद!’ अशी सुंठीशी मैत्री करण्याचा सांगावा दिला आहे. घराबाहेर कुठेही तहानेकरिता पाणी प्यावयाचे असल्यास विनासंकोच भरपूर पाणी प्यावे, त्यामध्ये सुंठ पूड असावी हे पुन्हा एकदा सांगण्याचा मोह मला आवरत नाही.