Summer Season Information ग्रीष्म ऋतू म्हणजे वसंत ऋतूनंतरचा आणि वर्षा ऋतूच्या (पावसाळ्याच्या) आधीचा ऋतू. वसंत ऋतूनंतर हळूहळू उष्णता अधिकाधिक तीव्र होत जाते, ती या ग्रीष्म ऋतूमध्ये. हिंदू कालगणनेनुसार साधारणपणे ज्येष्ठ व वैशाख या दोन महिन्यांमध्ये ग्रीष्म ऋतू असतो. आधुनिक कालगणनेनुसार साधारणपणे एप्रिल मध्यापासून ते जून मध्यापर्यंतचा दोन महिन्यांचा हा काळ, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये ‘मे महिन्यातला उन्हाळा’ आणि इंग्रजीमध्ये ‘समर’ म्हणतो. हा उत्तरायणामधील तीन ऋतूंमधला म्हणजे शिशिर, वसंत यानंतरचा शेवटचा ऋतू, जेव्हा उत्तरायणाची परम-स्थिती असते!
उत्तरायणामध्ये सूर्य उत्तर दिशेला सरकतो, म्हणूनच या काळाला उत्तरेकडे मार्गक्रमण या अर्थाने ‘उत्तर + अयन = उत्तरायण’ म्हटले आहे. (इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उत्तरायणामध्ये सूर्य उत्तर दिशेला सरकतो, असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात या काळात पृथ्वी दक्षिण दिशेला सरकत असते. मात्र त्या वेळी सूर्य उत्तरेकडे जात आहे, असे आपल्याला वाटते म्हणून या काळाला उत्तरायण म्हटले आहे. २२ डिसेंबर या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे प्रवास सुरू करतो, अर्थात सूर्याचा हा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने होतो, म्हणून हे उत्तरायण. उत्तरायणाचा हा काळ २२ डिसेंबरपासून २२ जूनपर्यंतचा असतो.
हेही वाचा – Summer drink: उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा मसाला ताक, वजन कमी करण्यासाठीही होईल मदत
या उत्तरायणामध्ये पृथ्वी दक्षिणायनाच्या तुलनेमध्ये सूर्याच्या जवळ जात असल्याने सूर्याची किरणे काटकोनामध्ये पडतात, जी अतिशय तीव्र व प्रखर असतात. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वारासुद्धा कोरडा होतो. हे कोरडे वारे शिशिर ऋतूमधल्या थंड वार्यांसारखे नसतात, तर उष्मा वाहून नेणारे असे कोरडे असतात. त्यामुळेच उत्तरायण हा तीव्र उष्णतेचा व कोरड्या (रुक्ष) वार्यांचा असा काळ असतो. हे गरम व कोरडे वारे एकीकडे शरीराला अधिकाधिक उष्ण करतात, तर दुसरीकडे कोरडेपणासुद्धा वाढवतात. सूर्याचे तीव्र उष्णत्व व वायूचे रुक्षत्व या कारणांमुळे अखिल सृष्टीतला ओलावा व स्निग्धता खेचून घेतली जाते. चंद्राचे शीतलत्व व स्निग्धत्व जे एरवी सृष्टीला बल देते, ते उत्तरायणातल्या रुक्ष-तीव्र वार्यांमुळे व सूर्याच्या उष्णतेमुळे कमी पडते. या सर्वांच्या परिणामी व उष्णतेचा प्रभाव वाढल्यामुळे वनस्पतीमधले आर्द्रत्व (ओलावा) कमी होतो आणि वनस्पतींमध्येही कडू-तुरट व तिखट असे कोरडे रस वाढतात. हे तीनही रस बल वाढवणारे नसून उलट बल कमी करणारे आहेत. त्यामुळे साहजिकच वनस्पतींच्या त्या कोरड्या रसावर पोसले जाणारे प्राणिजगतसुद्धा दुर्बल होते.
हेही वाचा – हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? मग हे सोपे व्यायाम नियमित करा!
उत्तरायणामध्ये दिवस मोठा व रात्र लहान असल्याने अधिक तासांच्या दिवसांमध्ये सूर्यकिरणांचा शरीरावर अधिक वेळ परिणाम होतो, दिवसभर प्राणिमात्रांचे व्यवहार चालू राहतात आणि महत्त्वाचे म्हणजे रात्र लहान असल्याने प्राण्यांची झोप पूर्ण होत नाही व थकवा वाढतो. या दिवसांत अग्नी मंद असतो. साहजिकच भूक लागत नाही, नीट जेवण जात नाही आणि बळेच खाल्ले तरी व्यवस्थित पचत नाही. शरीराला बल न देणार्या कडू-तुरट-तिखट रसांचा प्रभाव, हवेत वाढलेला उष्मा व कोरडेपणा, त्या परिणामी शरीरातून घटणारा स्नेह (स्निग्धतेचा अंश) व कमी होणारा ओलावा या कारणांमुळे प्राणी, पक्षी, वनस्पती एकंदरच संपूर्ण सजीवसृष्टी दुर्बल होते. म्हणूनच उत्तरायण हा अखिल सृष्टीसाठी दौर्बल्याचा काळ असतो. या काळामध्ये सूर्य व वायू हे सजीवांच्या शरीरातले बल कमी करतात-खेचून घेतात, म्हणून या काळाला ‘आदान काळ’ म्हणतात. (दान म्हणजे देणे आणि आदान म्हणजे घेणे) आणि त्या उत्तरायणामधला ग्रीष्मातला उन्हाळा हा परमोत्कर्षाचा व त्यामुळेच सर्वाधिक उष्ण व कोरड्या वातावरणाचा असा ऋतू आहे. या सर्वांच्या परिणामी संपूर्ण वर्षामधील ग्रीष्म हा असा ऋतू आहे, जेव्हा शरीराचे बल सर्वाधिक घटलेले असते.
drashwin15@yahoo.com