Summer Special: उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येत असतो. अशात शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होत असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाचा प्रभावा कमी व्हावा म्हणून लोक विविध उपाय करत असतात. काहीजण एसीच्या समोर बसून असतात. तर काही लोक शरीर थंड राहावे या उद्देशाने उसाचा रस, पन्ह, ताक, दही अशा पदार्थांचे सेवन करत असतात.
उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन पदार्थांचे सर्वात जास्त सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक समाविष्ट असतात. असे असले तरी उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताक पिणे योग्य असते असे म्हटले जाते. गरम वातावरणात दह्यापेक्षा ताक अधिक प्रभावशाली असते या विषयाबाबत आयुर्वेदामध्येही लिहिले आहे असे तज्ज्ञ सांगतात.
उन्हाळ्यात दही का खाऊ नये?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उन्हाळात दह्याऐवजी ताक पिणे अधिक फायदेशीर असते का याची माहिती देण्यात आली आहे. यानुसार, दही या पदार्थांचा उष्ण गुणधर्म असतो. ते गरम असते. उन्हाळ्यामध्ये उष्ण दही खाल्याने पोटाला त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार दही पचायला जड असते. त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कधी-कधी दह्याच्या सेवनाने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होऊ शकतो. दह्यामधील उष्णेतेमुळे पित्ताचा त्रास किंवा रक्तस्रावाचे विकार संभवतात. याउलट ताक पचायला हलके असते. त्याच्या सेवनामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय ते थंड असते.
Smartvedaa या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवर आरोग्य आणि आहार यांच्या संबंधित सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली जाते.