Health news: ‘मोहब्बत का शरबत’ हा सरबत तरुणाईमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. खरंतर या सरबताचं नाव ऐकताच तरुणाई याकडे आकर्षित होते. हे सरबत कलिंगड, दूध आणि साखर यांपासून बनवलेलं असते. कलिंगडामधे असलेल्या पोषक तत्त्वांमुळे कलिंगड हे अनेक कारणांनी आरोग्यास फायदेशीर ठरतं. डोळे, हाडं, हदय व स्नायूंचं आरोग्य जपण्यासाठी कलिंगड हे खूप उपयुक्त ठरतं. कलिंगडाचं सरबत यासाठी जास्त प्रभावी मानलं जातं. पण, बाहेर मिळणारं अतिसाखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं कलिंगडाचं सरबत हे हानिकारक ठरू शकतं. मोहब्बत का शरबत म्हणून फेमस असलेलं सरबत तरुणाईला अधिक आवडत असलं तरी ते आपल्यासाठी आरोग्यदायी आहे का? जाणून घेऊ.

फळांमधे कलिंगड हे अनेकांचं आवडतं फळ. रसरशीत, लाल रंगाचं आणि गोड चवीचं कलिंगड उन्हाची काहिली कमी करतं. उन्हामुळे सतत लागणारी तहान नियंत्रित करण्याचं काम कलिंगड करीत असतं. पण, कलिंगडऐवजी जेव्हा आपण त्याचा रस पितो तेव्हा किंवा वेगवेगळ्या फळांचा रस पितो तेव्हा त्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. याचसंदर्भात मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ अमरीन शेख यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

दूध आणि कलिंगड यांचं एकत्र मिश्रण विषारी

आयुर्वेदानुसार दूध आणि कलिंगड यांचं एकत्र मिश्रण हे विषारी ठरते. त्याचा दीर्घकाळ आपल्या पचन क्षमतेवर परिणाम होतो. दुधाबरोबर कधीही कलिंगडासारखी रसाळ फळं एकत्र करू नका, असा सल्ला आहारतज्ज्ञ सेतिया यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिला आहे. यावर पोषणतज्ज्ञ आरोशी अग्रवाल सांगतात, “कलिंगड आणि दूध एकत्र खाल्ल्यानं पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे केवळ आतड्यांनाच त्रास होतो, असे नाही. तर पचनाच्या समस्यादेखील उदभवू शकतात.”

कलिंगडाच्या रसामध्ये दूध मिसळल्याने काय होतं?

पुण्याच्या मणिपाल हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ प्रियंका बांदल सांगतात की, “कलिंगडाच्या रसामध्ये दूध मिसळल्याने मलईयुक्त पेय तयार होऊ शकते; परंतु ते पचनासाठी योग्य नाही. कारण हे मिश्रण काही लोकांच्या पचनशक्तीच्या भिन्नतेमुळे पोटात समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे मोहब्बत का शरबत यांसारखे ज्यूस पिण्यापेक्षा फक्त कलिंगड खाणं उत्तम” असा सल्ला वरिष्ठ आहारतज्ज्ञ प्रियंका बांदल देतात.

मधुमेहाचा धोका वाढू शकतो

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ अमरीन शेख सांगतात, “मोहब्बत का शरबत या सरबतामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते; जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो.”

हेही वाचा >> वयाच्या पंचविशीनंतर दुधात पाणी मिसळून का प्यावे? तज्ज्ञांनी केला खुलासा

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ अमरीन शेख सांगतात, “अशा प्रकारचे सरबत पिण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. हे सरबत रोज पिऊ नका. तर अधूनमधून त्याचा आनंद घ्या. सरबत पिताना त्यात साखरेचं प्रमाण कमी करा. अशा प्रकारे फळांच्या सरबतमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाकू नका,” असा सल्ला आहारतज्ज्ञ शेख देतात. मात्र ज्यांना मोहब्बत का शरबत आवडतो त्यांनी प्रमाणात याचं सेवन करुन त्यामध्ये साखरेचं प्रमाणही कमी करावं असं आहारतज्ज्ञ अमरीन शेख सांगतात.