Drug Resistant Superbugs : जगभरात सुपरबग्स या जीवघेण्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढतायत. धक्कादायक बाब म्हणजे हा आजार मनुष्यासाठी सर्वाधिक जीवघेणा मानला जात आहे. सुपरबग्सच्या वाढत्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे अँटिबायोटिक्सचा चुकीचा आणि अतिवापर. ज्यामुळे शरीरातील बुरशीसारखे जीवाणू प्रतिजैविकांच्या प्रभावापासून स्वत:ला वाचवू शकतात.या अवस्थेला अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर), असे म्हणतात. याच स्थितीमुळे जगभरात २०५० पर्यंत जवळपास ३९ लाख लोकांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासातून देण्यात आला आहे.

या अभ्यासातून असेही भाकीत करण्यात आले की, २०५० पर्यंत झालेले तब्बल १६९ लाख मृत्यू हे अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सशी (एएमआर) संबंधित असतील.

एकूणच या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष पाहता, सुपरबग्स हे भविष्यात जागतिक आरोग्यासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते. दरम्यान, ही परिस्थिती अनेक दशकांपासून वाढतच आहे, अशी माहिती टाइम मॅगझिनने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशनचे प्राध्यापक व अभ्यासाचे लेखक मोहसेन नाघवी यांनी सांगितले.

शरीरातील जीवाणू, विषाणू, बुरशी व पॅरासाइट्स वेळेनुसार बदलत असतात आणि या बदलांच्या वेळी त्यांच्यावर प्रतिजैविक, अँटीव्हायरल, अँटीफंगल्स व अँटीपॅरासायटिक औषधांचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर) निर्माण होतात. अशा वेळी संसर्गावर उपचार करणे अवघड असते. ही प्रक्रिया शरीरात संथ गतीने सुरू असते. पण, औषधांचा, विशेषत:अँटिबायोटिक्सचा अतिरेक व अनावश्यक वापर केल्याने ही प्रक्रिया वेगवान होत आहे, अशी माहिती गुरुग्राममधील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिकल कन्सल्टंट डॉ. तुषार तायल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

सुपरबग्समुळे न्यूमोनिया, क्षयरोग व मूत्रमार्गाचे संक्रमण यांसारख्या सामान्य आजारांवर उपचार करणे अशक्य किंवा कठीण होते. यावेळी शरीरावर अँटीबायोटिक्स आणि इतर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही. परिणामी शरीरात संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो आणि मृत्यू होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मृत्यूसाठी सुपरबग्स जबाबदार असल्याचे म्हटले जाते.

सुपरबग्स कसे विकसित होतात?

तु्म्ही विशिष्ट एका आजारावर औषधे घेत असता, अशा वेळी शरीरातील बुरशी, विषाणू किंवा जीवाणू हे त्या औषधांच्या प्रभावापासून वाचतात आणि शरीरातील परिस्थितीशी जुळवून घेतात, तेव्हा शरीरात सुपरबग्सची संख्या वाढू लागते. माणूस, प्राणी व वनस्पतींमध्ये औषधांचा, विशेषत: अँटिबायोटिक्सचा अतिवापर आणि अनावश्यक किंवा गैरवापर केल्याने ही प्रक्रिया वेगवान होत आहे, अशी माहिती नोएडामधील फोर्टिस हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन, सीनियर डायरेक्टर डॉ. अजय अग्रवाल यांनी सांगितले.

जेव्हा तुम्ही अँटिबायोटिक्सचा गैरवापर करता किंवा अँटिबायोटिक्स घेणे मधेच थांबवता, तेव्हा शरीरात सुपरबग्स तयार होतात आणि वेगाने विकसित होऊ लागतात. मग अशा स्थितीत कोणत्याही आजारावर औषधांचा प्रभावी परिणाम होत नाही. या स्थितीला प्रतिजैविक प्रतिकार (AMR), असे म्हणतात.

आरोग्यावर सुपरबग्सचा प्रभाव

सुपरबग्समुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कारण- ते पूर्वी उपचार करण्यायोग्य संसर्गाचेही आता जीवघेण्या आजारात रूपांतर करीत आहेत. मूत्रमार्गाचे संक्रमण किंवा रक्तप्रवाह संक्रमण यांसारख्या आजारांवरील उपचारांस शरीर सुपरबग्समुळे प्रतिसाद देत नाही. अशाने शरीरावर दीर्घकाळापर्यंत आजाराचा प्रभाव जाणवतो. परिणामी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते, काही वेळा व्यक्तीच्या मृत्यूचा धोकाही वाढतो, असेही डॉ. अग्रवाल म्हणाले.

यावर डॉ. तायल पुढे म्हणाले की, वृद्ध, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्ती, लहान मुले आणि जे आधीपासूनच जुनाट आजारांचा सामना करीत आहेत अशा लोकांना सुपरबग्सच्या संसर्गाचा धोका अधिक असतो.

सुपरबग्सचे परिणाम

आजारांवरील मर्यादित उपचार पर्यायांमुळे सुपरबग्सच्या वाढीचे मानवी शरीरावर भयानक परिणाम होतात. जेव्हा एखाद्या आजारावर प्रतिजैविकांसारखी औषधे प्रभावी ठरत नाहीत. त्यावेळी डॉक्टरांकडून अधिक प्रभावी औषधे दिली जातात; पण त्याचे अधिक दुष्परिणाम जाणवू शकतात. अशाने आजारावर औषधांचा प्रभाव जाणवण्यास जास्त काळ लागू शकतो.

त्यात मागील काही वर्षांपासून नवीन अँटिबायोटिक्स औषधांच्या निर्मितीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे संक्रमणांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले प्रतिजैविकांचे पर्यायदेखील कमी आहेत, असेही डॉ. तायल यांनी नमूद केले.

अलीकडेच मंजूर मिळालेल्या डाल्बाव्हॅन्सिन, मेरापेनेम-व्हॅबोरबॅक्टम व सेफिडेरोकोल ही प्रतिजैविक औषधे केवळ काही मोजक्याच संक्रमणांविरोधात लढण्यास प्रभावी आहेत. पण, सुपरबग्स संक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यास ती तितकीशी प्रभावी ठरत नसल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले.

सुपरबग संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?

डॉ. तायल व डॉ. अग्रवाल यांच्या मते, सुपरबग्सचा गंभीर धोका असूनही तो रोखण्यासाठी लोकांनी आपल्या रोजच्य सवयीत काही बदल केले पाहिजेत. हे बदल कोणते ते जाणून घेऊ..

१) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणत्याही आजारांवर औषधे घ्या. तसेच औषधांचा कोर्स पूर्ण करा. पण, सर्दी, खोकला, ताप अशा संसर्गजन्य आजारांवर सतत औषधांचा वापर करणे टाळा.

२) नियमितपणे साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा. तसेच जेवताना आणि जेवण बनवितानाही स्वच्छता बाळगा.

३) एखाद्या विशिष्ट आजारावर जर लस उपलब्ध असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घ्या. अशाने संक्रमण टाळता येते. त्याशिवाय औषधांच्या सेवनाची गरजही कमी होते.

४) नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या पालेभाज्या किंवा अन्नपदार्थ खाण्यावर भर द्या.