Gut Health :आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आरोग्याच्या समस्या स्वत:हून अंगावर ओढावून घेतो. आज आपण द इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने आयुर्वेदामध्ये उल्लेख केलेल्या काही चांगल्या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण त्यापूर्वी आपण आतड्यांच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेऊ या.

दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटल येथील मिनिमल ॲक्सेस, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि बॅरिएट्रिक सर्जरीचे संचालक डॉ. सुखविंदर सिंग सग्गु सांगतात, “आपल्या आतड्यांमध्ये असंख्य चांगले बॅक्टेरिया असतात जे रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया आणि जवळपास सर्व महत्त्वाच्या शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. चांगले बॅक्टेरिया हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.”

Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Make nutritious rajgira halwa in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा; वाचा साहित्य आणि कृती

आयुर्वेदतज्ज्ञ दिक्षा भावसार सावलिया यांनी इन्स्टाग्रामवर आतड्यांच्या आरोग्यास फायदेशीर असे पदार्थ सांगितले आहेत.

आलं

आलं हे सर्वच पचनाशी संबंधित आजारांवर उपयुक्त आहे. “हे आलं ओल्या आणि कोरड्या स्वरूपात, रस किंवा तेल म्हणून सेवन करता येते. आल्यामुळे मळमळ वाटणे, स्नायू दुखणे, खोकला-सर्दी, घसा खवखवणे, अतिरिक्त चरबी, अपचन, जळजळ इत्यादी समस्या दूर राहतात; त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळीदेखील कमी होते”, असे दिक्षा भावसार सावलिया सांगतात.

औषध म्हणून आल्याचा वापर शतकानुशतके केला जात आहे. त्यात पचनाशी संबंधित समस्या, सूज येणे आणि मळमळ वाटणे इत्यादी समस्या दूर होतात. यामध्ये असलेल्या “जिंजरॉल आणि शोगोल या घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आतड्यांतील जळजळ कमी करतात”, असे दिल्लीच्या धर्मशिला नारायण हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. महेश गुप्ता सांगतात.

हेही वाचा : महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?

ताक

ताक हा एक आंबवलेला दुग्धजन्य पदार्थ असून यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतात. ताकातील प्रोबायोटिक्स आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताक हे अमृत असे सांगत डॉ. सावलिया सांगतात की, ते पचण्यास सोपे आहे. ताकाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, कफ, जळजळ वाटणे, भूक न लागणे, अशक्तपणा इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे लॅक्टोजच्या पचनास मदत करू शकते. ज्या लोकांना लॅक्टोजच्या सेवनाने त्रास होतो, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ताक हे सहसा दुपारच्या जेवणाबरोबर घ्यावे.

तूप

डॉ. सावलिया सांगतात, “गायीचे तूप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तूप हे थंड असते, जे वात आणि पित्ताचा त्रास कमी करते. यामुळे पचनक्रिया सुधारते. तुपामुळे स्नायू मजबूत होतात; याशिवाय आपल्या आवाजावर याचा चांगला परिणाम दिसून येतो. व्यक्तीची स्मृती चांगली राहते, चेहऱ्यावर चमक येते, केसांचे आरोग्य चांगले राहते, त्वचा निरोगी राहते, प्रजनन क्षमता सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि बुद्धिमत्ता वाढते. विशेष म्हणजे तूप हे तुम्ही केव्हाही खाऊ शकता.

तुपामध्ये ब्युटीरिक ॲसिड असते जे एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड असते, जे आतड्याच्या आतील पेशींना पोषण करते आणि पचन क्रियेत जळजळ कमी करण्यास मदत करते. गाईचे तूप कमी प्रमाणात सेवन केल्याने आतड्यांसंबंधीच्या समस्या दूर होतात आणि एकंदरीत पचनक्रिया सुधारते.

खडी साखर

खडी साखरेमध्ये कोणताही रासायनिक पदार्थ नसतो. साखरेचा शुद्ध प्रकार म्हणून खडी साखर ओळखली जाते. डॉ. सावलिया सांगतात, “आयुर्वेदामध्ये औषधे तयार करताना खडी साखर वापरली जाते. लठ्ठपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती, आतड्यांच्या समस्या असेल तर साखरेऐवजी खडी साखर खावी.”

डॉ. गुप्ता सांगतात, “खडी साखर हीसुद्धा साखरच आहे, त्यामुळे ती कमी प्रमाणात वापरली पाहिजे. खडी साखरेवर सामान्य साखरेपेक्षा कमी रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्याचे आरोग्यास फायदे आहेत. खडी साखरेमुळे आपल्याला जलद ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुरळीत राहते; पण खडीसाखर अतिप्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि आतड्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.”

जिरे, धणे आणि बडीशेप वापरून बनवलेला चहा (CCF Tea)

सीसीएफ चहा (cumin, coriander, and fennel tea) हा आयुर्वेदिक उपाय आहे. जिरे, धणे आणि बडीशेप यांच्या मिश्रणापासून हा चहा बनवला जातो. जिरे, धणे आणि बडीशेपमध्ये पाचक गुणधर्म आहेत, जे पोटाशी संबंधित समस्या, गॅस आणि अपचनसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. डॉ. सावलिया सांगतात की, सीसीएफ चहा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्याससुद्धा मदत करतात. आतड्यांच्या समस्या कमी करणे, भूक सुधारणे, रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित करणे, याशिवाय पोटदुखी, मळमळ, जळजळ कमी करणे इत्यादी समस्या दूर होतात.
“नियमित सीसीएफ चहा प्यायल्याने पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते,” असे डॉ. गुप्ता सांगतात.

“वरील पदार्थांचा समावेश करा, पण त्याचबरोबर आतड्यांच्या आरोग्यासाठी फळे, भाज्या, धान्ये आणि प्रोटिनयुक्त संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील तर आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे”, असे डॉ. गुप्ता सांगतात.