Measles Outbreak: मुंबईत गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये लहान मुलांमध्ये गोवर पसरल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गोवर हा एक संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. जगात या आजारामुळे अनेक निष्पाप बालकांचा मृत्यु होतो. या आजारावर प्रभावी लस (MMR Vaccine) असली तरी, जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा हा विषाणू लाळेच्या थेंबामधून हवेतून पसरतो आणि इतर लोकांना संक्रमित करतो. सुरुवातीला या आजाराचे लक्षणं दिसून येत नाही. संसर्ग झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना गोवरची लागण होऊ नये, यासाठी कशी काळजी आपल्याला घेता येईल.
गोवर प्रतिबंधक लस
गोवराविरुध्द सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. ही लस शासकीय आरोग्यसेवेतूनही मिळते. बाळाच्या शरीरात आईकडून आलेली प्रतिकारशक्ती सहा महिनेपर्यंत असते. म्हणून ही लस पहिल्या सहा महिन्यांनंतर १५ व्या महिन्यांत बाळाला द्यावी. याचे इंजेक्शन असते. लस टोचल्यावर सहा ते दहा दिवसांत थोडा ताप, अंगावर लाली, किंवा पुरळ येतात. हे सर्व एक-दोन दिवसच टिकते.
(आणखी वाचा : जास्त प्रमाणात गव्हाची पोळी खाताय? आताच व्हा सावधान! ‘या’ आजारांना आमंत्रण देऊ नका )
लसटोचणीनंतर आठवडयाभरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. कधीकधी एखादा झटका येण्याची शक्यता असते; पण बहुतेक मुलांना काहीही त्रास होत नाही. ही लस अर्धवट मारलेल्या विषाणूंची बनलेली असते. म्हणून शीतकपाटात ठेवल्याशिवाय लस टिकत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या लसीमुळे कायमची प्रतिकारशक्ती निर्माण होते. एम.एम.आर. नावाच्या लसीत गोवर, जर्मन गोवर व गालगुंड या तीन आजारांविरुध्द लस एकत्र मिळते. गोवरप्रतिबंधक लस वापरून गोवर टाळणे हे फार महत्त्वाचे आहे. असंख्य मुलांचे आजारपण, मृत्यू यामुळे टाळता येतील.
व्हिटॅमिन ए कमी असलेल्या मुलांमध्ये गोवरची अधिक गंभीर प्रकरणे होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन ए दिल्याने गोवरची तीव्रता कमी होऊ शकते.
अशी घ्या बालकांची काळजी
– गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे घरच्याघरी उपचार करु नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे.
– गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावे.
– लहान मुलांना गोवरची लक्षणं आढळल्यास त्यांना शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये.