One Minute Gut Health Test : आतडे आपल्या आरोग्याच्या केंद्रस्थानी असते. आरोग्य आणि हेल्थस्पॅम सुधारण्याच्या बाबतीत आतडे बरे करणे किंवा ते बरे असणे ही पहिली पायरी असते, असे डिजिटल क्रिएटर व ‘बायोहॅकर’ (biohacker) तान्या मलिक चावला यांनी एका इन्स्टाग्राम रीलमध्ये म्हटले आहे. तर तुम्हाला अॅसिडिटीचा धोका आहे की नाही हे शोधण्यासाठी एक मिनिटाची चाचणी घेण्याचा सल्ला तान्या मलिक चावला यांनी दिला आहे.
या चाचणीमध्ये रिकाम्या पोटी पाण्याबरोबर बेकिंग सोडा घेणे समाविष्ट आहे. बेकिंग सोडा पोटातील आम्लात मिसळून कार्बन डाय-ऑक्साइड (वायू) तयार करतो, ज्यामुळे ढेकर येतो. ढेकर देण्यासाठी लागणारा वेळ एखाद्या व्यक्तीच्या पोटातील आम्ल कमी आहे की नाही हे ठरवण्यासाठी वापरला जातो.व्हिडीओमध्ये, तान्या मलिक चावलाने पोटातील जास्त आम्लामुळे आम्लपित्त होते या सामान्य गैरसमजाबद्दल सांगितले आहे. तिने असा दावा केला की, पोटातील आम्ल कमी झाल्यामुळे अन्न आतड्यात पचत नाही आणि त्यामुळे किण्वन व आम्ल रिफ्लक्स (GERD) होते.
तान्या मलिक चावलाच्या या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही चेन्नईच्या प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषण तज्ज्ञ मीनू बालाजी (Meenu Balaji) यांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला सांगितले की, पोटातील आम्ल उत्पादनाच्या मूल्यांकनासाठी ही चाचणी एक घरगुती पद्धत आहे. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते, जे इतर पाचक एंझाइम्ससह अन्नाचे विघटन करते. जास्त आम्ल उत्पादनामुळे अनेकांना आम्लपित्त होते म्हणूनच सामान्यतः अँटासिड्स लिहून दिली जातात. पण, पोटातील आम्लाचे प्रमाण कमी असल्याने पचन आणि पोषक घटकांचे शोषणदेखील प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य प्रभावित होते.
तसेच त्यांनी ही गोष्टसुद्धा निदर्शनास आणून दिली की, पोटातील आम्ल कमी किंवा जास्त, लहान आतड्यांतील जीवाणूंची अतिवृद्धी (SIBO), खूप लवकर खाणे किंवा जास्त हवा पोटात जाणे अशा अनेक कारणांमुळे ढेकर येऊ शकतो. म्हणूनच मीनू बालाजी यांच्या मते, ढेकर देणे हे पोटातील आम्ल पातळी ठरविण्यासाठी विश्वसनीय सूचक नाही.
बेकिंग सोड्याची चाचणी विश्वसनीय आहे का? (Gut Health Test)
ही प्रमाणित निदान चाचणी नाही. पचनाच्या समस्या असलेले काही लोक जेवणापूर्वीच ढेकर देतात, ज्यामुळे ढेकर देणे हे बेकिंग सोड्यामुळे आहे की आधीपासून असलेल्या आजारांमुळे आहे हे ठरवणे कठीण होते. मीनू बालाजी यांनी सांगितले की, पोटातील आम्ल पातळी व्यक्तीपरत्वे बदलते आणि दिवसभर कमी-जास्तसुद्धा होते, ज्यामुळे केवळ ढेकर देण्याच्या आधारे निष्कर्ष काढणे आणखीन कठीण होऊ शकते किंवा असू शकते. पोटातील आम्ल पातळी निश्चित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या लक्षणांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे. अचूक मूल्यांकनासाठी डॉक्टर, ‘हायडेलबर्ग पीएच टेस्ट’ (Heidelberg pH test) यांसारख्या चाचण्यांची शिफारस करू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे.