मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाच्या निमित्तानं लहान मुलांशी गप्पाटप्पा सुरू होत्या. तितक्यात एक पाचवीतली मुलगी म्हणाली, “ताई, थ्री इडियट्समध्ये तो सीन आहे ना, चमत्कार-बलात्कारवाला… त्यातला बलात्कार म्हणजे नक्की काय?” ज्या मुलामुलींना या शब्दाचा अर्थ माहीत होता त्यांच्यात कुजबुज झाली. काही माना नकळत खाली गेलेल्या मला दिसल्या आणि माझ्यासकट उपस्थित शिक्षकांच्या काळजाचा क्षणभर ठोका चुकला. आमीर खान आणि तमाम थ्री इडियट्सच्या टीमनं मुलं हा प्रश्न विचारू शकतात याचा विचार सीन उभा करताना आणि संवाद लिहिताना केला असेल का? थ्री इडियट्सनंतर जन्माला आलेल्या पण टीव्हीवर सतत हा सिनेमा पाहात घराघरात वाढणाऱ्या पिढीला असे प्रश्न पडत असतात. काय सांगायचं त्यांना?

समाजात सतत दिसणारं ‘रेप कल्चर’ आता फक्त टीव्ही आणि सिनेमापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मुलांच्या हातातल्या गेमिंगमध्येही हिंसा आणि रेप कल्चर शिरलेलं आहे. खरं तर हे सगळं आज होतंय अशातलाही भाग नाही. मी जेव्हा वाढीच्या वयात होते, म्हणजे नव्वदच्या दशकात, तेव्हाही जवळपास सगळ्या हिंदी सिनेमांमध्ये बलात्काराची दृश्यं असायची. त्याचा त्या पिढीवर, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या हिंसा आणि लैंगिकतेच्या जाणिवांवर नेमका काय परिणाम झाला असेल हे शोधण्याची धडपड विशेष कुणी केली नाही.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात सर्दी खोकल्याला पळवून लावण्यासाठी काय कराल?

द व्हीदरस्पून इन्स्टिट्यूटच्या ‘द सोशल कॉस्ट ऑफ पोर्नोग्राफी: अ स्टेटमेंट ऑफ फाईंडिंग्स अ‍ॅण्ड रेकमेंडेशन्स’ या अहवालात म्हटलं आहे, की पोर्नचे परिणाम सगळ्यांवर होतात. लैंगिक उत्तेजना अश्लीलतेतून, हिंसेतून निर्माण होत असेल, तर ही मोठीच समस्या आहे. हिंसक लैंगिक कृत्यं सतत प्रदर्शित होत असतील, पुन्हा पुन्हा दाखवली जात असतील, पाहण्यासाठी प्रोत्साहित केलं जात असेल, तर ते निरोगीपणाचं लक्षण नाही. आदर, संमती आणि निरोगी लैंगिक संबंध न शिकवता हिंसक लैंगिकता खुलेआम उपलब्ध असणं यामुळे जाणीव नसलेला आणि शुद्ध गमावलेला समाज तयार होतो. असा पोर्न धोकादायक समाजनिर्मितीला हातभार लावू शकतो.

एक लक्षात घेवूया, हिंसेचं आकर्षण फक्त मोठ्यांमध्येच असतं असं नाहीये, लहान मुलांमध्येही हिंसेचं आकर्षण प्रचंड आहे. मुलं एकमेकांना जेव्हा मारतात तेव्हा दरवेळी त्यांना एकमेकांचाच राग आलेला असतो असं नाहीये, तेही दुसरा कुठला तरी राग आपल्यापेक्षा कमकुवत मुलावर काढत असतात. एखाद्या मुलाला चार जणांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुली करणं आणि त्याची मजा घेणं हे मुलं करतात. हे मुलं पूर्वीही करत होती आणि आजही करतायेत. मात्र आजच्या मुलांच्या हातात २४/७ एक गॅजेट आहे ज्यावर त्यांना हवी तेव्हा, पाहिजे त्या प्रकारची हिंसा पाहायला मिळू शकते आणि ते अतिशय धोकादायक आहे.

हेही वाचा… Health Special: स्निग्धांशाचे (फॅट्स) शरीरातील नेमके काम काय?

मुलं पोर्न बघताना अनेकदा अब्युझिव्ह व्हिडिओ पाहतात असं ‘अरुण साधू फेलोशिप’चं काम करत असताना माझ्या लक्षात आलं. आपण कधीतरी मुलांशी कुटुंबातल्या, समाजातल्या, शारीरिक-मानसिक आणि भावनिक हिंसेविषयी बोलतो का? तर नाही! किंवा क्वचित… ‘फाईट द न्यू ड्रग’ या साईटने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न बघणाऱ्या मुलांची संख्या नुसतीच झपाट्याने वाढतेय असं नाही, तर हिंसक शरीरसंबंध किंवा अब्युज पाहण्याकडे सरकते आहे.‘extreme brutal gang bang,’ ‘sleep assault,’ ‘domestic discipline,’ आणि ‘crying in pain’ अशा कॅटेगरीखाली मोडणारे व्हिडीओज मुलं सर्रास पाहतात. वयाच्या अतिशय नाजूक वयात, म्हणजे पंधरा सोळाव्या वर्षी BDSM सारखे प्रयोग करुन बघतात.

म्हणूनच मुलांशी हिंसेबद्दल बोलणं गरजेचं आहे जसं आपण आता हळूहळू लैंगिकतेबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. कुटुंबात हिंसेबद्दल बोललं जाणं आवश्यक आहे. हिंसा का करायची नाही, हिंसा का सहन करायची नाही, कुणी त्रास दिला तर त्याविषयी का बोललं पाहिजे. मुलांबरोबर फक्त अ‍ॅक्शन सिनेमे पाहायचे नाहीयेत तर त्यातल्या हिंसेबद्दल आणि त्याच्या अनावश्यक ग्लोरिफिकेशनबद्दल ही बोलणं आवश्यक आहे. एखादा हिंसक सिनेमा पाहात असताना त्यांच्या मना- मेंदूत काय घडतं हे त्यांना विचारलं पाहिजे. आयटम साँग पाहताना त्यांना काय वाटतं हे त्यांच्याशी बोलून समजून घेतलं पाहिजे.

हेही वाचा… Health Special: अती पाणी पिण्याचा अन्नपचनावर परिणाम होतो का?

टोकाची हिंसक दृश्य पाहताना त्यांच्या मनात काय विचार येतात, त्यांना ते जे पाहतात ते करावंसं वाटतं का की, जे पाहतात त्याचा त्रास होतो, वॉर गेम्स किंवा अ‍ॅक्शन गेम्स खेळताना काय वाटतं त्यांना हे जाणून घेतले पाहिजे. काय योग्य आणि अयोग्य याची चर्चा व्हायला हवी. सिनेमे, सीरिअल्स, गेमिंग, पोर्न या सगळ्यातून जी हिंसा त्यांच्यापर्यंत पोहोचते त्याविषयी बोललं पाहिजे. त्या हिंसेकडे पाहायचं कसं हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याही पलीकडे हिंसक विचार आले तर त्यात गैर नाही पण ते बाजूला कसे सारायचे याविषयी त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. डेक्सटर सारखी एखादी टोकाची हिंसा दाखवणारी सीरिअल पाहताना त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो का, हायस्कूल बुलिंगवरच्या सीरिअल्स बघताना काय विचार मनात येतो इथपासून आपल्याच आजूबाजूला रोजच्या रोज घडणाऱ्या हिंसेच्या घटनांबद्दल त्यांना काय वाटतंय हे कधी विचारणार आपण मुलांना? जी हिंसा त्यांच्या डोळ्यासमोर, मनात आणि विचारात असते ती त्यांनी प्रत्यक्षात करून पाहिल्यावर?

आज मुलांना सतत हिंसा सर्व बाजूंनी पाहायला मिळते आहे, मग ते गेमिंग असो, सिनेमे-सीरिअल्स असो, रिल्स असो नाहीतर अजून काहीही..त्यांच्या घरात-घराबाहेर सगळीकडे हिंसा सुरु आहे. अशावेळी त्या सगळ्याचे मुलांवर काहीच परिणाम होणार नाहीत, होत नाहीत हे गृहीत धरुन चालणं म्हणजे मोठ्यांच्या जगाने निवडलेली पळवाट आहे. अशी पळवाट निवडून आपण अस्वस्थ आणि असुरक्षित समाजात अजूनच अस्वस्थ पिढ्यांची फक्त भर घालतो आहोत. याचा एकत्रित परिणाम काय होऊ शकतो याचा कधी विचार केला आहे का?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talk to children about violence hldc dvr
Show comments