सँडविचपासून रोलपर्यंत अनेक पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात मेयोनीज वापरले जाते. अनेकांना मेयोनीजशिवाय या पदार्थांना चव येत नाही, असे वाटते. मेयोनीज हे अत्यंत चविष्ट असते. हा पदार्थ मुले आणि मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. परंतु या खाद्यापदार्थामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत चिंतेमुळे तमिळनाडू सरकारने या पदार्थावर कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे.

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन आयुक्तांनी अलीकडील आदेशात, ८ एप्रिल २०२५ पासून कच्च्या अंड्यांचा वापर करून बनवलेल्या मेयोनीजचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास एका वर्षासाठी बंदी घातली आहे.

अधिकृत अधिसूचनेत मेयोनीजचे वर्णन “अंड्याचा पिवळा भाग, वनस्पती तेल, व्हिनेगर व इतर मसाले असलेले सेमी सॉलिड्ज इमल्शन” असे केले गेले आहे, जे सामान्यतः शोर्मासारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते. कच्च्या अंड्यांपासून बनवलेले मेयोनीज जास्त धोकादायक अन्नपदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. त्यामध्ये साल्मोनेला टायफिमुरियम, साल्मोनेला एन्टरिटिडिस, एस्चेरिचिया कोलाई व लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स यांसारखे हानिकारक जीवाणू असतात.

मेयोनेझ कशापासून बनवले जाते?( What is mayonnaise made of?)

होलिस्टिक डाएटिशियन (holistic dietitian) व्रिती श्रीवास्तव (Vriti Srivastav) यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “मेयोनीजमध्ये दोन मुख्य घटक असतात, अंड्यातील पिवळ्या भागापासून किंवा शाकाहारी पदार्थापासून मिळणारे तेल आणि पाणी.”

“पिवळ्या भागातील किंवा सोयासारख्या भाज्या आदी पदार्थांतून मिळणारे लेसिथिन हे दोन्ही द्रव (तेल आणि पाणी) मिसळण्यासाठी इमल्सिफाईंग एजंट म्हणून काम करते. त्यात व्हिनेगर, लिंबू व फ्लेवरिंग हे अतिरिक्त घटक जोडले जातात. मेयोनीजमध्ये जवळजवळ ७०-८० टक्के तेल असते,” असे ती म्हणाली.

कच्च्या अंड्यातील मेयो आरोग्यासाठी कसा धोका निर्माण करू शकतो?(How can raw-egg mayo pose a health hazard?)

“कच्च्या अंड्यांमुळे साल्मोनेलाचा धोका वाढतो. हा एक जीवाणू आहे, जो अन्नातून होणाऱ्या आजारास कारणीभूत होतो आणि तो आजार साल्मोनेलोसिस म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्यामुळे अतिसार, ताप व उलट्या होऊ शकतात, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि गंभीर आरोग्याची गुंतागुंत होऊ शकते. कोंबड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या साल्मोनेला असतो, जो त्यांच्या अंड्यांना दूषित करू शकतो,” असे चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, याबाबत गुडगावमधील झायला हेल्थकेअरमधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हरलीन गिल यांनी सहमती दर्शविली आणि स्पष्ट केले,” कच्च्या अंड्यांसह अन्न सुरक्षितपणे हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ त्यांना योग्य तापमानात फ्रिजमध्ये साठवणे आणि जास्त काळ बाहेर न ठेवणे. कारण- साल्मोनेलासारखे जीवाणू लवकर वाढू शकतात आणि आजार निर्माण करू शकतात.

“कच्च्या अंड्यांमध्ये जीवाणू असू शकतात; परंतु बहुतांशी पोटातील आम्ल त्यांना मारते. पण, कच्च्या अंड्याचे पदार्थ खोलीच्या तपमानावर ठेवल्याने जीवाणू वाढू शकतात आणि अन्नात गंभीर विषबाधा होण्याचा धोका वाढतो.”

त्यांनी मेयोऐवजी ह्युमस (hummus), ग्वाकामोल (guacamole), पुदिन्याचे दही (mint yogurt), त्झात्झिकी (tzatzik), पेस्टो (pesto), बीट दही (beetroot yogurt), ऑलिव्ह ऑइल, लिंबाच्या रसाचे ताजे मिश्रण, असे अनेक पर्याय सुचवले आहेत.