मागच्या दोन लेखात आपण कंबरदुखीबद्दल माहिती घेतली, सगळ्या प्रकारच्या कंबरदुखीला आणि सगळ्या वयोगटातील रुग्णांना फिजिओथेरेपी लाभदायक आहे. सध्या होणार्‍या कंबरदुखीवरील संशोधनात व्यायाम आणि सेल्फ मॅनेजमेंट या दोन उपायांची सर्वाधिक शिफारस करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेल्फ मॅनेजमेंट आणि व्यायाम याबद्दल आपण येणार्‍या दोन लेखात बघणार आहोत. कंबरदुखीचं सेल्फ मॅनेजमेंट रुग्णांना शिकवण्याचं आव्हान पेलण्याआधी फिजिओथेरेपिस्ट डॉक्टरांना रुग्णांची सखोल आणि विस्तृत तपासणी करावी लागते.

हेही वाचा – तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

फिजिओथेरपी उपचाराची पद्धत अतिशय रुग्णकेंद्रित असते. साहजिकच यासाठी कंबरदुखीच्या प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी आवश्यक ठरते. फिजिओथेरपी डॉक्टरांची तपासणीची पद्धत ही सखोल आणि विस्तृत आहे. फिजिओथेरेपी असेसमेंट ही फक्त शारीरिक लक्षणं किंवा वेदना यापुरती मर्यादित नाहीये. अशा विस्तृत तपासणीच्या पद्धतीमुळे फिजिओथेरेपिस्ट हे रुग्णाशी सखोल संवाद साधू शकतात.

वेदनेची सुरुवात कशी झाली हे रुग्णाच्या दृष्टिकोनातून ऐकण्यापासून सुरू होणारी तपासणी ही शारीरिक लक्षणं, कंबरदुखीची तीव्रता, कंबरेच्या हालचाली, स्नायूंची कार्य क्षमता, विशिष्ट क्लिनिकल टेस्ट, रुग्णाकडे असणार्‍या काही रिपोर्ट्सची तपासणी असे टप्पे घेत पुढे जाते. यानंतर रुग्णांचा त्यांच्या वेदनेबद्दलचा दृष्टिकोन काय आहे, त्यांच्यामते त्यांच्या कंबरदुखीची कारणं काय आहेत, त्यांच्या दैनंदिन जगण्यात त्यांना कोणत्या गोष्टी करण्यासाठी त्रास होतो आहे, उपचारानंतर त्यांच्या काय अपेक्षा आहेत, सध्या असणार्‍या कंबरदुखीसह रुग्ण कितपत स्वावलंबी आयुष्य जगतो आहे, रुग्णाच्या वेदनेमध्ये शारीरिक घटक वगळता इतर मानसिक, भावनिक किंवा इतर काही आजार असे घटक आहेत का अशी सखोल तपासणी फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर करतात.

वर सांगितलेले विविध घटक (जे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळे असतात) विचारात घेऊन रुग्णकेंद्रित उपचार केले जातात. यात उपकरणांद्वारे केले जाणारे वेदनाशामक उपाय, सुपरएवाइजड व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि कामाच्या ठिकाणी करण्याचे बदल यांचा समावेश होतो. यापैकी सगळ्या उपायांबद्दल आपण आधीच्या बर्‍याच लेखांमध्ये सविस्तर माहिती घेतली आहे. या सगळ्या उपचारांसोबत अजून एक महत्वाचा स्तंभ फिजिओथेरेपी उपचारपद्धतीत येतो तो म्हणजे कंबरदुखीच्या रुग्णांना सेल्फ-मॅनेजमेंट शिकवणं!

हेही वाचा – Health Sepcial: ऋषिपंचमीच्या दिवशी ‘या’ भाज्या का खातात? त्यातून कोणती पोषक तत्त्वे मिळतात?

योग्य त्या वेळी आमचे प्रत्यक्ष उपचार संपले की आम्ही कंबरदुखीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रुग्णाच्या खांद्यावर सोपवतो, पण ही जबाबदारी एकदम सोपवता येत नाही त्यासाठी रुग्णांची मानसिक आणि शारीरिक तयारी करून घ्यावी लागते. सेल्फ मॅनेजमेंटमध्ये पुढील गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही रुग्णांना मार्गदर्शन करतो.

  • कंबरदुखीकडे सजगतेने बघणं
  • आम्ही त्यांना खाली वाकण्याच्या आणि वजन उचलण्याच्या ज्या सुधारित पद्धती शिकवल्या आहेत त्या कटाक्षाने पाळणं
  • झोप, व्यायाम आणि आहार यांची सांगड घालणं
  • मद्यपान आणि धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहणं
  • मानसिक तणाव आणि कंबरदुखी यांच्यातला दुवा समजून घेणं
  • आपण करत असलेल्या व्यायामांची नोंद ठेवणं
  • आपल्याला असलेल्या वेदनेचं प्रमाण नेमक्या पद्धतीने सांगता येणं
  • शारीरिकदृष्ट्या जास्तीत जास्त सक्रिय राहणं
  • सोशल मीडियावरील क्विक फिक्सेस आणि ट्रेण्ड्सना बळी न पडणं

या गोष्टींचा समावेश होतो. आम्ही करत असलेल्या प्रत्यक्ष उपचारांसोबत या सेल्फ मॅनेजमेंटचं महत्व अनन्यसाधारण आहे. यापुढील लेखात कंबरदुखीच्या व्यायामांमधील काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teaching back pain patients self management is an important part of treatment hldc ssb