आपल्याबरोबर आईला बाहुलीची वेणी घालायला लावणारी मुलगी, बाबांबरोबर क्रिकेट खेळणारा मुलगा, रूसलेली मनाली, गप्पा मारणारी, मस्ती करणारी सृष्टी अशीच आपली मुले असतात. आपण त्यांच्याशी खेळताना, वागताना, त्यांना शिस्त लावताना आपले डोळे, आपले हावभाव, शरीराची हालचाल या सगळ्यांचे मुले निरीक्षण करतात. आपल्याशी खेळताना आईचे लक्ष नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात येते. एखादे वेळेस आपण कपडे विस्कटून टाकले हे आईला अजिबात आवडले नाही हे न सांगताही सृष्टीला कळते. त्याच बरोबर त्यांना प्रेमाने केलेला स्पर्श लगेच कळतो. आईने समजूत काढताना जवळ घेतले, डोळे पुसले, की बरे वाटते. बाबांनी शाबासकी देताना पाठीवर थाप मारली तर जास्त आनंद होतो.
‘अरे अक्षय, वर चढू नकोस रे! पडशील ना अशाने! कित्ती वेळा सांगितलं तुला, सगळी खेळणी एकदम खेळायला काढू नकोस. एक वेळी एक खेळ खेळावा. आता सगळा पसारा करून ठेवशील.”
‘धपाटा घालू का’? कोण हट्ट करतंय? इतका वेळ तू घेतलास ना फोन? मग आता सलीलला नको द्यायला? भाऊ आहे ना तो तुझा’?
“किती वेळा सांगितलं, मी मोठ्या माणसांशी बोलताना मध्ये मध्ये बोलायचे नाही! गप्प बस आता’!
हेही वाचा : Health Special : तुम्ही ताडगोळा खाल्लाय का कधी?
अशी अनेक विधाने, आपल्या मुलांबरोबरचे संवाद घरोघरी ऐकू येतात. बहुतेक संवादांमध्ये ‘असे करू नकोस, असे वागू नकोस, असे केलेस तर तसे होईल,’ अशी नकारात्मक विधानेच जास्त ऐकू येतात. आपल्या वागणुकीचे नकारात्मक परिणाम काय काय होणार आहेत ते मुलांना लवकर आणि सतत सांगितले जाते. यातून योग्य वर्तणुकीचे प्रशिक्षण मिळतेच असे नाही, किंबहुना होणाऱ्या परिणामांच्या भीतीने मुले कधी कधी नवीन गोष्टी करताना पुढाकार घेत नाहीत, किंवा अधिकाधिक हट्ट करू लागतात किंवा वागताना आक्रस्ताळेपणा करतात.
आपण आपल्या मुलांशी कसे वागावे म्हणजे मुले आपल्याला हवी तशी वागतील असा प्रश्न पालकांच्या मनात असतो. अर्थात त्याचा उद्देश आपल्या मुलाचा योग्य विकास व्हावा, त्याला पुढे जाऊन कुटुंबात, समाजात वावरण्याची क्षमता निर्माण व्हावी, शाळाकॉलेज मध्ये शिकताना, मित्र मैत्रिणी करताना अडचण येऊ नये असाच असतो. थोडक्यात, आपले मूल सक्षम, स्वावलंबी, स्वतंत्र आणि आयुष्यात यशस्वी व्हावे अशी स्वाभाविक आकांक्षा प्रत्येक पालकाची असते.
त्यासाठीच अनेक सकारात्मक पद्धतींचा उपयोग करता येतो. लहानपणापासून आपल्यापैकी बरेच जण ऐकत मोठे झाले असतील की आपल्याच मुलाची जास्त प्रशंसा करू नये. मूल शेफारते! परंतु आपल्या मुलाचे योग्य प्रमाणात कौतुक केले तर मुलाचा आत्मविश्वास वाढतो. ‘आपण एका जागी बसून भात खाल्ला आणि आईने शाबासकी दिली’ हे मुलाला समजते. दुसऱ्या दिवशीही भात खाताना एका जागी बसावे असे मुलाला वाटते. जणू ते शाबासकी मिळण्याची वाट पाहते. एकदा ही सवय लागली की पुढची पायरी चढायला हरकत नाही. उदा. भात खाऊन झाल्यावर आपण होऊन हात धुवायला बेसिनसमोर जाऊन उभे राहिल्याबद्दल आता कौतुक करायला हवे.
शाबासकी देतानाही केवळ ‘शाब्बास’ असे म्हणणे पुरेसे नाही. कशासाठी शाबासकी हे ही स्पष्ट केले पाहिजे. ‘वा, कित्ती छान, एका खुर्चीत बसून आज सगळा भात खाल्लास! शाब्बास प्रणव!’ एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळवल्याची शाबासकी आपण देतोच, त्याच बरोबर त्या स्पर्धेसाठी जे कष्ट घेतले त्यासाठी सुद्धा शाबासकी दिली पाहिजे.
हेही वाचा : ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…
मुलांना ‘quality time’ दिला पाहिजे असे म्हणतात. म्हणजे नक्की काय करायचे? एक तर खरेच थोडासा वेळ आपल्या मुलासाठी काढायचा. म्हणजे काय? ‘सगळी कामे सोडून मुलीबरोबर भातुकली खेळत बसू का?’ कामाचे फोन करू की मुलाबरोबर बॉल बॉल खेळू?’ मुले जे करत असतील त्याच्यासाठी काही थोडा वेळ काढणे, त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खेळात सामील होणे हे महत्त्वाचे. “मी माझ्या बाहुलीची वेणी घालते, तू तुझ्या बाहुलीची वेणी घाल” असे जेव्हा मुलगी सांगते तेव्हा आपणही तसे करणे, तिचे अनुकरण करणे हयातून तिला खूप आनंद मिळतो. हे करताना जर आपण म्हटले, “ कित्ती छान वेणी घातलीस! मी पण तशी घालते!” ती भलतीच खूश होते. पुढच्या वेळेस आई सांगते, “ चल आपण रुमालाची घडी घालू” ती पटकन तयार होते.
मुलाबरोबर क्रिकेट खेळताना मुलगा वडिलांना सांगतो, ‘मी तुझ्या मागे उभा राहतो आणि बॉल टाकतो, तू बॅटने मार’, बाबा म्हणतात, ‘चालेल, तू माझ्या समोर उभा रहा, बॉल टाक, मी बॅट मारतो’. मुलगा नवीन शब्द शिकला, वडिलांबरोबर खेळल्याचा आनंद मिळाला आणि वडिलांनाही आपल्या मुलाची बॉल धारण्याची, झेलण्याची प्रगती पाहायला मिळाली.
आपल्या रडणाऱ्या मुलीला जवळ घेऊन आई म्हणाली, ‘काय झालं मनाली? का रडू आलं?’ मनाली म्हणाली, ‘माझ्या हातातून रॅकेट खेचून घेतली शिवानीने, अशीच आहे ती!’ आई म्हणाली’ तिने तुझ्या हातून रॅकेट खेचून घेतली म्हणून तुला राग आला? म्हणून रडू आलं? आलं माझ्या लक्षात. आपण खेळलो ना बराच वेळ? उद्या पुनः खेळू हां!’ मनाली शांत झाली. दुसरे काहीतरी खेळू लागली.
हेही वाचा : foxtail millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे…
आपण आपले काम करताना सुद्धा quality time देऊ शकतो का? का नाही? माझी मैत्रीण सांगत होती ‘मी रोज संध्याकाळी ऑफिस मधून घरी गेले आणि स्वयंपाकाला लागले की सृष्टीला जवळ बसवायचे, मला दिवसभरात दिसलेली, अनुभवाला आलेली एखादी छानशी गोष्ट सांगायचे. उदा. आज काय गंमत झाली, माझ्या खिडकीतून पाऊस इतका छान दिसत होता!’ मग सृष्टी सांगायला सुरुवात करायची,’आई आज खेळताना इतकी गंमत झाली….’ असा मायलेकीचा संवाद सुरू झाला. मग कधी कधी ती म्हणायची,‘सृष्टी चल दोघी मिळून कपड्यांच्या घड्या घालू.’ सृष्टी दंगा करायची. घड्या मोडून टाकायची. तिची आईही तिच्या खेळात सामील व्हायची! सगळ्या घड्या विस्कटून झाल्या की मग म्हणायची, ‘चला कित्ती मज्जा आली ना! आता आवरूया!’ सृष्टी आपोआप मदतीला लागायची.
आपले वागणे आणि मुलांचे वागणे हे बिंब प्रतिबिंबासारखे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कौतुक, शाबासकी देताना आपल्या मुलाला शिस्त कशी लागणार? मुलांना शिक्षा कधी करायची की नाही? असे अनेक प्रश्न पालक म्हणून आपल्या मनात असतात. त्याची चर्चा पुढील लेखात!