डॉ प्रदीप आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

” अरे, कॅनडामध्ये मला माझे भाड्याचे घर सोडावे का लागले याचा किस्सा एकदम सॉलिड आहे,” नुपूर सांगत होती.

नुपूर…ही माझ्या मित्राची मुलगी. सध्या आयआयटी जोधपूर येथे बी.टेक. करते आहे आणि मशीन लर्निग आणि एआय मध्ये तिने चांगलं प्रभुत्व मिळवलं आहे. एवढी की, या विषयात तिने कॅनडाच्या विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवली आणि तिकडे ती तीन महिने जाऊन आली. कॅनडा सरकारने तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप देऊ केली आहे.

तर ती सांगत होती, कॅनडामध्ये ती सुरुवातीला एका भाड्याच्या घरात मैत्रिणीबरोबर राहत होती. पण एके दिवशी तिच्या घरमालकाने मेल पाठवून तिला घर सोडण्यास भाग पाडले. मला कळेचना की असं काय झाले की या तरुण बुध्दिमान मुलीला घर मालकाने एकदम घर सोडण्यास सांगावे.

” अरे काही नाही, माझ्या शेजारणीने तक्रार केली की मी रात्री दहानंतर फोन वर बोलत होते. त्यामुळे तिला त्रास झाला.”

मी एकदम बेशुध्द . ” अग तुझ्या घरात तू रात्री दहा नंतर कॉल वर बोलते आहेस, त्यात एवढा काय त्रास?”

” कॅनडामध्ये रात्री दहानंतर पीस अवर्स असतात. तिकडे असा आवाज केलेला चालत नाही.”

आणि या इवल्याशा चुकीसाठी कोणतीही ताकीद वगैरे न देता डायरेक्ट घर खाली !

हेही वाचा >>>Health Special: फास्टफूड खा पण पौष्टिक असं!

आणि गेले दोन दिवस आपण बातम्या वाचतो आहोत की लोकांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवत फटाके फोडले. दिल्लीपासून मुंबई , पुणे,नागपूर पर्यंत सर्व शहराची हवा या काळात आणखी खराब झाली.

निव्वळ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एकट्या पुण्यात किरकोळ आगीच्या ४१ घटना घडल्या. (इंडियन एक्सप्रेस वृत्त)

▪️दिवसेंदिवस हवेतील प्रदूषण वाढते आहे. वायू प्रदूषणामुळे आपले आयुष्य जवळपास पाच वर्षांनी कमी होते आणि तुम्ही दिल्ली, लखनौमध्ये असाल तर दहा वर्षांनी!

▪️भारतात जगातील सर्वाधिक टीबी रुग्ण (सुमारे २८ लाख) आहेत. जवळपास जगातील प्रत्येक तिसरा चौथा टीबी रुग्ण आपल्या देशात आहे.

▪️कोविडमुळे अनेकांची फुप्फुसे काही प्रमाणात अकार्यक्षम झाली आहेत.

▪️वायूप्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, उच्च रक्तदाब, ब्रेन स्ट्रोक याशिवाय स्तनाचा कर्करोग आणि मधुमेह यासारखे आजार देखील बळावतात.

▪️वायू प्रदूषणामुळे अँटिबायोटिक्सना न जुमानणाऱ्या जीवाणूंमध्ये देखील वाढ होते.

▪️हवेचे प्रदूषण केवळ आजार वाढवत नाही तर आपल्या आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम करते. आपला जीडीपी वायू प्रदूषण झाल्याने कमी होतो कारण मनुष्य बळ आजारी पडते, त्याची काम करण्याची क्षमता घटते, कामावरील एकाग्रता कमी होते.

आणि हे सगळे असूनही आपणाला आपली दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी ,असे वाटत नाही. कोर्टाने यात हस्तक्षेप करावा एवढे आपण अक्कलशून्य आहोत का?

हेही वाचा >>>Power of protein : वृद्धांनी आहारात अधिक प्रथिनांचे सेवन का केले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

काल आपण क्रिकेट वर्ल्डकपमधील सेमी फायनल जिंकली आणि सर्वत्र अजून जोरदार फटाके फुटले. पण अशा दूषित हवेत प्रचंड दमसास असणारे नवे मोहम्मद शमी कसे तयार होतील ? भलाथोरला आवाज, फटाके , डीजे या शिवाय आपल्याला कोणताच आनंद व्यक्त का करता येत नाही?

की आपण एवढे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहोत की कितीही गोंधळात आपण नीरव शांतता अनुभवू शकतो? आपल्या सारख्या विश्वगुरु असलेल्या देशाला पीस अवर्सची गरजच नाही. पीस अवर्स ही केवळ पहिल्या जगातील देशांची नौटंकी आहे ?

माहिती नाही. पण आपल्याला खरोखरच पुढील दिवाळी फटाकेमुक्त आणि आरोग्यदायी साजरी करावयाची असेल तर त्याची सुरुवात आतापासून करावी लागेल. फटाके निर्मितीवर निर्बंध घालण्यापासून सुरुवात करावी लागेल. केवळ वेळेचे बंधन निरुपयोगी आहे, हे आपण पाहिलेच आपल्या समाजाची एक घातक सवय नाहीशी करणे अवघड खरे पण अशक्य नाही. लोकांनाही याची गरज समजावून सांगावी लागेल. तहान लागली की विहीर खोदल्यासारखे आपण केवळ हिवाळ्यात जागे होतो आणि मग ऑड इव्हन सारखे काही तात्पुरते उपाय मलमपट्टीसारखे करु लागतो. आपल्याला दीर्घकालीन काही करावे लागेल. नागरी समाजातील शहाण्यासुरत्या लोकांनाही आपला दबाव वाढवावा लागेल. धोरणात्मक बदल करावयाचे तर हा विषय लोकचळवळ म्हणून पुढे यायला हवा.

पर्यावरण हा ही एक राजकीय मुद्दा आहे. दिल्ली किंवा इतर शहरातील सर्व प्रकारच्या प्रदूषणाबाबत केवळ एकमेकांवर आरोप करण्याऐवजी सर्वच राजकीय पक्षांनी यावर एकत्र येऊन विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे जरी असतील तरी हवा कोणत्याच सीमा जुमानत नाही म्हणूनच तर ती पंजाब , हरियाणा ओलांडून दिल्लीत येते. आपल्यालाही पक्षीय सीमा ओलांडून थोडे शहाणे होता येईल का ? अनेक युरोपीय देशांमध्ये ग्रीन पॉलिटिक्स सुरु झाले आहे. ग्रीन पार्टीसारखे पक्ष अनेक देशांमध्ये पर्यावरणनिष्ठ राजकारण करत आहेत. हा एकूण मानवी अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण आणि व्यापक मुद्दा आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याची केवळ तोंडपूजा करणे आपल्याला खूप महागात पडेल.

केवळ पहिल्या जगाला नव्हे याही देशाला पीस अवर्सची आणि स्वच्छ हवेची नितांत गरज आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The country is in dire need of peace hours and clean air hldc amy
Show comments