विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज अशक्य गोष्टीदेखील शक्य झाल्या आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी जीवन सुलभ करण्यासाठी रोबोट्स डिझाइन केले आहेत. आतापर्यंत तुम्ही रोबोट्सच्या मदतीने केलेले अनेक आविष्कार पाहिले असतील, पण रोबोट्सच्या मदतीने कधी एखाद्या बाळाचा जन्म झाल्याचे ऐकले आहे का? तुम्ही म्हणाल, हे कसे शक्य आहे? तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.
रोबोटच्या सहाय्याने पहिल्या बाळांचा झाला जन्म
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्राणू इंजेक्ट करणार्या रोबोटच्या साहाय्याने गर्भधारणा केल्यानंतर पहिले बाळ जन्माला आले आहे. थांबा, गैरसमज करून घेऊ नका. रोबोट्स कधीच मानवासारखे पारंपरिक पद्धतीने बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एक असा रोबोट तयार केला आहे जो महिलांना गर्भधारणेत मदत करू शकतो. या प्रक्रियेत रोबोटिक सुई वापरून महिलेच्या गर्भामध्ये शुक्राणू सोडले जातात.
रोबोटिक सुईचा केला जातो वापर
एमआयटीच्या टेक्नॉलॉजी रिव्ह्युनुसार, बार्सिलोना, स्पेनमधील अभियंत्यांच्या टीमने न्यू यॉर्क शहरातील न्यू होप फर्टिलिटी सेंटरमध्ये, स्त्रीच्या गर्भातील अंड्यांमध्ये शुक्राणू पेशी सोडण्यासाठी एका रोबोटिक सुईचा वापर केला आहे. या प्रक्रियेमुळे दोन निरोगी भ्रूण निर्माण झाले आणि दोन मुलींचा जन्म झाला आहे.
स्त्रीच्या गर्भात असे सोडले जातात शुक्राणू
अहवालानुसार, जगातील पहिल्या शुक्राणू इंजेक्ट करणाऱ्या रोबोटवर (world’s first insemination robot) काम करणाऱ्या अभियंत्यांपैकी एकाला प्रजनन औषधाच्या क्षेत्रात फारसा अनुभव नव्हता. “प्रजनन औषधाचा प्रत्यक्ष अनुभव नसलेल्या एका अभियंत्याने रोबोटिक सुई ठेवण्यासाठी सोनी प्लेस्टेशन 5 कंट्रोलरचा वापर केला. कॅमेऱ्याद्वारे मानवी अंड्यावर नजर ठेवली, त्यानंतर सुई अंड्यामध्ये प्रवेश करते आणि शुक्राणू कोशिका तिथे सोडते,” असे अहवालात म्हटले आहे.
शुक्राणू-इंजेक्ट करणार्या रोबोटच्या सहाय्याने जन्मलेल्या पहिल्या मुली
शुक्राणू इंजेक्ट करणाऱ्या रोबोटच्या मदतीने महिलेच्या गर्भशयात शुक्राणू सोडल्यानंतर निरोगी भ्रूण निर्माण झाले आणि दोन मुलींचा जन्म झाला. रोबोटद्वारे गर्भाधानानंतर जन्माला आलेली ही पहिली बाळे आहेत, असे एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूने म्हटले आहे.
”एक दिवस या तंत्रज्ञानामुळे रुग्णांना प्रजननक्षमतेच्या क्लिनिकला (fertility clinic) भेट देण्याची गरज उरणार नाही, जिथे गर्भधारणेच्या एका प्रयत्नासाठी यूएसमध्ये २०,००० डॉलर खर्च होऊ शकतो,” असे ओव्हरचर लाइफचे मुख्य आनुवांशिकशास्त्रज्ञ सॅंटियागो मुन्ने यांनी सांगितले, ज्यांनी शुक्राणू रोबोट विकसित केला आहे. या रोबोटबाबत सांगताना ते म्हणाले की, ”तुम्ही अशा बॉक्सची कल्पना करा की जिथे शुक्राणू आणि अंडी आत जातात आणि पाच दिवसांनी गर्भ तयार होऊन बाहेर येतो.”
सध्या, IVF लॅबमध्ये महागड्या आणि प्रशिक्षित भ्रूणशास्त्रज्ञांची (embryologists) आवश्यकता असते जे सूक्ष्मदर्शकाखाली अतिपातळ पोकळ सुया वापरून अंडी आणि शुक्राणू हाताळतात. प्रक्रिया नाजूक, दीर्घकाळ चालणारी आहे आणि यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दर वर्षी सुमारे ५,००,००० बालके IVF द्वारे जन्माला येतात, परंतु बर्याच लोकांना प्रजननक्षमतेची औषधे उपलब्ध नसतात किंवा ती परवडत नाहीत.
हा रोबोट विकसित करणार्या ओव्हरचर लाइफ या स्टार्टअप कंपनीने म्हटले आहे की, ”त्यांचे उपकरण IVF स्वयंचलित करण्याच्या दिशेने एक प्रारंभिक पाऊल आहे, संभाव्यत: ही प्रक्रिया कमी खर्चिक आणि अधिक सामान्य ठरू शकते”
तज्ज्ञांच्या मतानुसार, अत्याधुनिक प्रक्रियेमुळे इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)ची किंमत लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.