छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याचा त्रास जगभरातील लाखो लोकांना होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर विविध घरगुती उपचार सांगणार्या कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानी यांनी सुचवलेल्या एका उपायाने लक्ष वेधले आहे.
दररोज सकाळी धण्याचे पाणी प्या
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका रीलमध्ये ती सांगते, “जर तुम्हाला छातीत होणारी जळजळ किंवा कोणत्याही प्रकारचे अपचन होत असेल तर एक चमचा धणे भिजवल्याशिवाय झोपायला जाऊ नका.” हे साधे मिश्रण छातीत होणारी तीव्र जळजळ टाळू शकते का? खरंच हा उपाय फायदेशीर आहे का?
याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिक्का (Kanikka) मल्होत्रा यांनी सांगितले की, “धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. संशोधनातून असे समोर आले आहे की, “धण्याचे पाणी हे पाचक एन्झाइम्सना उत्तेजित करू शकते, संभाव्यता पचनास मदत करते आणि सूज आणि अपचन कमी करते. पण, छातीत होणारी तीव्र जळजळ टाळण्यासाठी त्याचा प्रभाव कमी असल्याचे स्पष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये पोटातील आम्लाचे उत्पादन वाढवून लक्षणे आणखी बिघडू शकतात.”
याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशिअन वेदिका प्रेमानी यांनी सांगितले आहे की, ” धण्याच्या पाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि ते दिवसभरात कधीही सेवन केले जाऊ शकते.”
हेही वाचा – रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
फायदे (Benefits )
- पचनास मदत करते (Aiding Digestion) : काही अभ्यासात असे समोर आले आहे की, “धणे हे पाचक एन्झाइम्सचे उत्पादन उत्तेजित करून पचनास मदत करू शकतात, संभाव्यत: अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी आणि पोटातील अतिरिक्त आम्लाची गरज कमी करण्यासाठी प्रोत्साहन देते.
- अस्वस्थता दूर करते (Soothing Discomfort): धण्याचे पाणी पोट फुगणे आणि अपचन कमी करते, हे सिद्ध करणारे काही पुरावे संशोधनातून समोर आले आहेत.
धोका (Risk)
छातीतील जळजळ वाढवते : धण्याचे पाणी प्यायल्याने काही लोकांना छातीतील जळजळ वाढल्याचे जाणवू शकते. याचे कारण असे की, ते पोटातील आम्लाचे उत्पादन उत्तेजित करू शकतात, जे अन्ननलिकेत परत येऊ शकते आणि छातीत जळजळ निर्माण होऊ शकते.
छातीत तीव्र जळजळ होत असलेल्या व्यक्तींसाठी धण्याचे पाणी घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा –
मल्होत्रा यांच्या मते, छातीत तीव्र जळजळ होत असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत धण्याचे पाणी समाविष्ट करताना काही विशिष्ट विचार किंवा विरोधाभास आहेत.
किती प्रमाणात प्यावे धण्याचे पाणी
- कमी प्रमाणात सुरुवात करा : कमी प्रमाणात धणे (साधारण अर्धा चमचे) पाण्यात रात्रभर भिजवून सुरुवात करा. हळू हळू शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेऊन प्रमाण वाढवा.
- प्रतिसादाचे निरीक्षण करा : धण्याचे पाणी प्यायल्यानंतर तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते याकडे बारकाईने लक्ष द्या. त्रास होत असेल तर धण्याचे पाणी पिणे थांबवा.
भिजवलेले किंवा उकळलेले धण्याचे पाणी ठरेल उत्तम?
भिजवणे विरुद्ध उकळणे : धणे रात्रभर भिजवणे ही उकळण्याच्या तुलनेत सौम्य पद्धत आहे. उकळल्याने धण्यामधून मजबूत अधिक केंद्रित रसायने बाहेर पडू शकतात
धण्याचे पाणी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
औषधे : धण्याच्या पाण्याच्या काही औषधांशी रासायनिक प्रक्रिया होऊ शकते, म्हणून रक्त पातळ करणारी किंवा यकृताद्वारे चयापचय करणारी औषधे घेत असाल तर धण्याचे पाणी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आधीपासून आरोग्य समस्या असतील तर : जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील, विशेषत: यकृत किंवा किडनीचे आजार असतील, तर धण्याचे पाणी घेण्यापूर्वी प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा – उकडलेल्या बटाट्यांपेक्षा थंड केलेले बटाटे खाणे आरोग्यदायी आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा
छातीत होणारी तीव्र जळजळ टाळण्यासाठी इतर नैसर्गिक उपाय आणि पारंपरिक उपचार
मल्होत्रा सांगतात, “जर तुम्ही छातीत होणारी तीव्र जळजळ टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर अनेक उत्कृष्ट भारतीय आयुर्वेदिक पर्याय आहेत. तुळशीच्या पानांचे सेवन करा, जे पोटाला सुखदायक गुणधर्मांसह, पचनसंस्थेतील जळजळ आणि वेदना कमी करू शकते, असे मानले जाते.”
पुदीन्याच्या पानांचा चहा हा आयुर्वेदातील एक लोकप्रिय थंडावा देणारे पेय (coolant) म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये शरीरातील वायू बाहेर टाकण्यास आणि सूज दूर करण्यास मदत करणारे कार्मिनिटिव्ह (वात कमी करणारे) गुणधर्म आहेत.
बडीशेप ही त्यांच्या अँटिस्पास्मोडिक गुणधर्मांमुळे एसोफॅगल स्फिंक्टर ( Esophageal Sphincter) शिथिल करू शकते, संभाव्यत: छातीत होणारी जळजळ कमी टाळू शकते.
जिरे, आणखी एक कार्मिनिटिव्ह (वात कमी करणारा) मसाला आहे जो पचनास मदत करू शकतो आणि वात कमी करू शकतो, तसेच शक्यतो पाचक एन्झाइम्सचे उत्पादन उत्तेजित करतो आणि पोटातील अतिरिक्त ॲसिडची गरज कमी करतो.
सरतेशेवटी मल्होत्रा पुढे सांगतात की, “आले त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, ते पचनसंस्थेतील जळजळ कमी करू शकते आणि पोटातील ॲसिडचे उत्पादनदेखील कमी करू शकते. “या औषधी वनस्पती सामान्यत: सुरक्षित असल्या तरी तुमच्या दिनचर्येत त्यांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.