लिंबूपाणी आणि नारळपाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ही दोन्ही पेये विशेषतः उन्हाळ्यात जास्त प्रमाणात प्यायली जातात. उन्हाळ्यात नारळपाणी किंवा लिंबूपाणी ही लोकांची पहिली पसंती असते. कारण- ही दोन्ही पेये शरीराला हायड्रेटेड ठेवतात आणि झटपट एनर्जी मिळवून देतात. मग अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की, रोज सकाळी दिवसाची सुरुवात लिंबूपाणी आणि नारळपाण्याच्या सेवनाने केली, तर आपल्या शरीरावर काय परिणाम होईल? याचे फायदे आणि तोटे काय? याच विषयावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार व चिकित्सक डॉ. दिलीप गुडे यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. तेव्हा ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.
डाॅक्टर सांगतात, “नारळपाण्याला अमृताची उपमा दिली जाते. हे द्रावण शरीरातील ताकद वाढविण्याचे काम करते. त्यामुळे अशक्त व्यक्तीला सलाईन नाही, तर नारळपाणी पिण्यास सांगितले जाते. नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. नारळपाण्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, तसेच अ, ब व क ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात. नारळपाणी इम्युनिटी बूस्टर आहे. ते तुम्हाला हायड्रेट ठेवते; तर लिंबूपाण्यात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते; तसेच यात लोह अन् पोटॅशियमही असते. उन्हाळ्यात लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले असते.”
(हे ही वाचा : रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश )
लिंबासह नारळपाणी सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार?
१. नारळाचे पाणी घामाने गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून काढण्यास मदत करते. त्यातील पोटॅशियममुळे निर्जलीकरण व स्नायूंना येणारे पेटके टाळण्यास मदत मिळते. नारळपाणी व लिंबाचा रस दोन्हीमध्ये अल्प प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात; ज्यामुळे खेळाडूंना किंवा जास्त घाम गाळणाऱ्या व्यक्तींना फायदा होतो.
२. नारळपाणी मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत करू शकते. परंतु, लिंबूपाण्यात जास्त साखर मिसळून पिऊ नये; अन्यथा रक्तातील शर्करा वाढू शकते. हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे काळे मीठ टाकून, ते पिऊ शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि तुम्हाला ॲसिडिटीपासूनही दूर राहता येईल.
३. नारळपाणी आणि लिंबाचा रस यांचे मिश्रणदेखील काही रुग्णांमध्ये तयार होणाऱ्या किडनी स्टोनच्या प्रतिबंधासाठी मदत करू शकते.
४. तसेच या पेयांचे दीर्घकाळ सेवन केल्याने त्वचा निरोगी बनते.
५. परंतु, जास्त प्रमाणात लिंबूपाण्याच्या सेवनामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. जर लिंबूपाणी बनविण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला, तर जास्त प्रमाणात अॅसिड तयार होते; जे हाडांच्या आरोग्यासाठी वाईट मानले जाते.
डॉ. गुडे यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत तुम्ही लक्षात घ्याव्यात अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे :
१. नारळपाण्याचे दररोज सेवन केल्याने साखरेचे प्रमाण अधिक वाढू शकते.
२. लिंबाच्या रसातील आम्लता संवेदनशील दातांना त्रास देऊ शकते. ते पाणी पातळ केल्याने हा विपरीत परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते.
३. नारळपाणी आणि क जीवनसत्त्व यांचे मिश्रण पोटॅशियमची पातळी वाढवू शकते किंवा द्रावण जास्त होऊ शकते. तुम्हाला आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यास हे दररोज सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
समतोल आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयी एकूणच आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लिंबूसह नारळपाणी आपल्या दिनचर्येमध्ये एक ताजेतवानेपणाची भर टाकू शकते; पण आरोग्यासाठी ही जादूची गोळी मात्र नाही हे लक्षात घ्या.