जगभरात १.४ अब्ज तरुण वर्ग हा अकार्यक्षम ठरत आहे. यामध्ये तीनपैकी एक महिला आणि चारपैकी एक पुरुष हे व्यायाम किंवा अत्यावश्यक असणाऱ्या शारीरिक हालचाली करत नाहीत, असे आढळून आले आहे. ‘कोविड’च्या काळात सुरु झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीने शारीरिक हालचाली, व्यायाम कमी झाले. याचा परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीवरही झाला. आळस, ताणतणाव, अंगदुखी, शारीरिक विकार यांचे प्रमाण २०२१ नंतर वाढलेले आढळून येते. हार्वड विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालानुसार २०२१ नंतर लोकांमधील निष्क्रियतेचे प्रमाण दुप्पट झालेले आहे. या पार्श्वभूमीवर व्यायामाचा, शारीरिक हालचालींचा आपल्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो, हे जाणून घेणे आवश्यक ठरेल.
जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये लोकांमधील वाढती निष्क्रियता, शारीरिक हालचालींचे कमी झालेले प्रमाण लक्षात घेऊन कृती योजना आखली. २०३० पर्यंत लोकांमधील नकारात्मकता कमी करण्यासाठी जागतिक कृती योजना सुरु केली. याअंतर्गत शारीरिक हालचाली आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन देणे, सकारात्मकता वाढवणे, लोकांना सृजनात्मक बनवणे अशा संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. शारीरिक हालचाली जर कमी झाल्या तर त्याचा परिणाम हा हृदयावर होतो, मनावर होतो. परिणामी शारीरिक विकार वाढतात.हृदयरोग, मानसिक विकार यामुळे वाढू शकतात. यामुळे डब्ल्यूएचओने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याचे ठरवले.
ह
शारीरिक हालचालींचा नोकरी-व्यवसायावर होणारा परिणाम
व्यायाम, शारीरिक हालचाली या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असतात, हे आपल्याला माहीत आहे. परंतु, शारीरिक निष्क्रियता आपल्या नोकरीवर, कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतात. ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा बैठी कार्यपद्धती शारीरिक हालचाली कमी होण्यास कारण ठरते. अनेकांना शारीरिक हालचाल कमी आहे, हे आरोग्याला उपयुक्त ठरेल किंवा आपल्या कॅलरीज वाचतील, असे वाटते. परंतु, शारीरिक हालचाल कमी होणे, हे धोकादायक ठरत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात सर्व्हेक्षणात्मक अहवाल सादर केला. युनायटेड किंगडम आणि चीनमधील २०० कर्मचाऱ्यांचा सर्व्हे त्यांनी या अंतर्गत केला. या अहवालानुसार, अनेक लोकांचा पूर्ण दिवस काम करण्यात, कार्यालयीन कामकाजात जातो. यामुळे ते स्वतःसाठी किंवा शरीरासाठी वेळ देऊ शकत नाही. दिवसाच्या शेवटी ते बौद्धिक काम करून थकून गेलेले असतात. यामुळे ते शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करत नाही. परिणामी, स्थूलता, सांधेदुखी, हृदयरोग, मानसिक अस्थिरता असे आजार निर्माण होऊ शकतात. काही कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला व्यायाम करण्याचा, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा संकल्प केला होता. परंतु, काही दिवसातच हे संकल्प बारगळले. वैयक्तिक कामे, कार्यालयीन कामे, व्यस्त दिनक्रम, स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर कामांना दिलेले महत्त्व यामुळे व्यायाम करण्याचा संकल्प मोडलेला दिसतो.
हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?
शारीरिक निष्क्रियता आल्यामुळे मानसिक तणाव जाणवतो. रात्री नीट झोप येत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कामावरती परिणाम होतो. शास्त्रीय भाषेमध्ये शारीरिक क्रिया, हालचाली, व्यायाम हा दुसऱ्या दिवशी कार्यक्षम राहण्यासाठी अत्यावश्यक असते. यालाच ‘वर्क रिलेव्हन्ट रिसोर्सेस’ असे म्हणतात. या ‘वर्क रिलेव्हन्ट रिसोर्सेस’ मध्ये पुरेशी आणि शांत झोप ही दुसऱ्या दिवशी कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक असते. तसेच शारीरिक हालचाली आणि पुरेशी झोप ही पचन, रक्ताभिसरण अशा अन्य शरीरांतर्गत होणाऱ्या क्रियांसाठी आवश्यक आहेत. तसेच व्यवस्थित शांत झोप झाली असल्यास दुसऱ्या दिवशी मनाची एकाग्रता होण्यासही मदत होते.
हेही वाचा : विश्लेषण : बिपरजॉय- चक्रीवादळांची नावे कशी ठरतात ? अमेरिकेने सागरी वादळांना का दिली महिलांची नावे ?
शारीरिक हालचालींचा कार्यक्षमतेवर होणारा सकारात्मक परिणाम
हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार शारीरिक हालचालींचा कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. यासंदर्भात या अहवालात काही मुद्दे मांडलेले आहे. बऱ्याच वेळा दुपारी जेवणानंतर कर्मचाऱ्यांना आळस येतो, झोप येते. याचे एक कारण म्हणजे जेवणानंतर शारीरिक हालचाली करणे आवश्यक असते. यामध्ये चालणे या व्यायामाचा समावेश होऊ शकतो.
शारीरिक हालचाली, कार्यालयीन वेळेत केलेले व्यायाम यांचा कार्यक्षमतेवरील सकारात्मक परिणाम दिसण्यास काही काळ लागू शकतो. सृजनशीलता ही क्षणार्थात वाढणारी गोष्ट नाही. आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण आपल्यालाच सकारात्मक प्रेरणा देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, योग्य व्यायाम अथवा आवश्यक शारीरिक हालचाली तुमची क्षमता वाढवण्यास नक्कीच कारण ठरतात. तीन प्रकारे आपण स्वयंप्रेरित होऊन काम करू शकतो.
१. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रियांकडे लक्ष द्या-
प्रथम आपली दिनचर्या, कामाची पद्धती, दिवसभरात आपली साधारण किती शारीरिक हालचाल होते, याकडे लक्ष द्या. सतत एका जागी बसून न राहणे, मानेचे, हात-पायाचे व्यायाम, विशिष्ट शारीरिक हालचाल करणे अशा गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. अर्थात याचे परिणाम पटकन दिसणार नाही. परंतु, शारीरिक हालचाली, व्यायाम यामध्ये सातत्य ठेवल्यास तुम्हाला कार्यक्षमता वाढलेली नक्कीच दिसेल.
२. मोजका व्यायामसुद्धा अत्यावश्यक
कायम लक्षात ठेवले पाहिजे की, ‘सम इज बेटर दॅन नन.’ काहीच नसण्यापेक्षा थोडे तरी असले पाहिजे. आपण तणावग्रस्त असतो, थकलेले असतो म्हणून शारीरिक हालचालींपासून दूर राहतो. काहीजण आपण थकून जाऊ म्हणू शारीरिक क्रिया करत नाही. परंतु, यामुळे मानसिक थकवा आणि बैठे काम करून अन्य शारीरिक व्याधी होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने ‘थोडा तरी व्यायाम किंवा शारीरिक हालचाली, क्रिया’ करण्यास सांगितले आहे. नुसते बसून राहणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. १८ ते ६४ वयोगटातील प्रौढ व्यक्ती १ तास ते २.५ तासांपर्यंत व्यायाम करू शकतात. शक्य असेल तेवढे चालणे, शारीरिक हालचाली करणे, मोजके व्यायाम प्रकार यांचे दैनंदिन आयुष्यात उपयोजन करावे. अगदी २०-२० मिनिटांचाही व्यायाम किंवा शारीरिक हालचाली आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात.
३. शारीरिक हालचाल महत्त्वाची
अनेकांना व्यायाम करणे आवडत नाही, असेही लोक मोजके-आरामदायी अशा शारीरिक हालचाली करून व्यायामाचे इप्सित साधू शकतात. कष्टदायक व्यायामप्रकार करण्यापेक्षा ‘स्ट्रेचिंग’, चालणे, काही बैठे व्यायाम प्रकार करता येऊ शकतात. किमान २०-२० मिनिटे हे व्यायाम प्रकार करा. शक्य असल्यास व्यायामशाळा, घरात शक्य असणारे व्यायामप्रकार तुम्ही करू शकतात. सगळ्याचा मूळ उद्देश अर्थपूर्ण शारीरिक हालचाल व्हावी, हा आहे.
अशा प्रकारे शारीरिक हालचाली, व्यायाम प्रकार तुमच्यातील कार्यक्षमता आणि सृजनशीलता नक्कीच वाढण्यास कारण ठरेल.