शरीराचे पोषण होते आहाराने आणि आहार तयार झालेला आहे सहा रसांपासून. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे ते सहा रस, ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये ‘चव’ म्हणतो. सर्व पदार्थांना स्वतःची अशी चव असते. आयुर्वेदाने पदार्थाच्या रसाला म्हणजे चवीला नितांत महत्त्व दिलेले आहे. शरीराचे पोषणही याच सहा रसांनी होते. स्वास्थ्यजतन करायचे झाले तर सहाही रसांचे सेवन आवश्यक असते, याउलट एकाच रसाचे अतिसेवन मात्र विकृतीला- अस्वास्थ्याला कारणीभूत होते. ज्या रसाचे अतिसेवन झाले त्याच्या विरोधी रसाने रोगांचा उपचार केला जातो. जसे गोडाचा विरोधी रस कडू तर तिखटाचा गोड किंवा तुरट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेद हे असे वैद्यकशास्त्र आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गामध्ये आणि साहजिकच यच्चयावत सजीव पदार्थांमध्ये कोणत्या रसाचा प्रभाव असतो व त्याचा शरीरावर- आरोग्यावर काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो याचा अभ्यास करुन त्या रसाचा शरीरावर विपरीत परिणाम कमीतकमी व्हावा, यासाठी त्याच्या विरोधात त्या विशिष्ट ऋतूमध्ये कोणत्या रसाचे सेवन आधिक्याने करावे, याचे मार्गदर्शन करते. आयुर्वेदानुसार वर्षाचे जे सहा ऋतू असतात, त्यांमध्ये गोड, आंबट, खारट, कडू, तुरट व खारट हे सहा रस म्हणजे सहा चवी उत्पन्न होतात. वास्तवात जे पाणी आकाशातून पडते ते अव्यक्त रसाचे (चवीचे) असते म्हणजे त्या पाण्याला चव नसते. नमात्र पृथ्वीवर पडल्यानंतर त्यामध्ये माती, वारा, अग्नी, आदी पंचतत्त्वे जसजशी मिश्र होत जातात, तसतशी त्या पाण्याला वेगवेगळी चव प्राप्त होते.

हेही वाचा… सावधान! कृत्रिम स्वीटनरमुळे कर्करोगाचा धोका

पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये विविध खनिजे (minerals) मिसळतात. असे खनिजयुक्त पाणी वनस्पतींकडून शोषले जाते. त्या खनिजांप्रमाणे व त्या वनस्पतींमध्ये तयार होणार्‍या जैवरसीय (bioflavonoids) तत्त्वांनुसार त्या-त्या वनस्पतींना ती-ती चव प्राप्त होते. जसे ऊसाला गोड, आवळ्याला आंबट, मीठाला खारट, कारल्याला कडू, मिरचीला तिखट, जांभळाला तुरट वगैरे. त्यानुसार वर्षा ऋतूमध्ये (पावसाळ्यात) सृष्टीमध्ये अम्ल (आंबट) रस तयार होतो व आंबट रसाचा प्रभाव वाढतो.

हेही वाचा… Health Special: मुलांच्या मोबाईलचं करायचं काय?

पावसाळ्यामध्ये वातावरणात होणार्‍या विविध बदलांच्या परिणामी पाण्यामध्ये तयार होणारा दोष म्हणजे पाणी अम्लविपाकी होते. अम्ल म्हणजे आंबट आणि विपाक म्हणजे पचनानंतर तयार होणारा गुण (मूळ रसामध्ये होणारा बदल), अर्थात शरीरावर आंबट परिणाम करणारा तो अम्लविपाक. जसे दही चवीला गोड असो वा आंबट, ते शरीरावर आंबट परिणामच करते म्हणजे अम्लविपाकी आहे.

हेही वाचा… Health Special: ‘मंत्रचळ’ (OCD) म्हणजे काय?

अम्लविपाकी पाण्याच्या प्रभावामुळे या दिवसांमध्ये निसर्गतः आंबट रसाचा प्रभाव वाढतो. अखिल सृष्टीमध्ये वाढलेल्या या आंबट रसामुळे पाणी अम्लविपाकी होते व त्या आंबट पाण्यावर पोसल्याने वनस्पती व धान्यसुद्धा अम्लविपाकी होते. त्या आंबट पाण्यावर पोसलेल्या वनस्पती सुद्धा अम्लविपाकी म्हणजे आंबट परिणाम करणार्‍या होतात. त्या पाण्याचे प्राशन व त्या वनस्पतींचे सेवन करणार्‍या अखिल सजीवसृष्टीच्या (किटक, प्राणी, पक्षी, वगैरेंच्या) शरीरावरसुद्धा त्या अम्लविपाकाचा परिणाम होतो आणि अंतिमतः ते पाणी पिणार्‍या व त्या पाणी-पक्ष्यांचे भक्षण करणार्‍या मानवाचे शरीर सुद्धा अम्लविपाकी होते, अर्थात मनुष्यांच्या शरीरावर सुद्धा आंबटाचा प्रभाव होतो.

जो एकीकडे पित्ताचा संचय होण्यास कारणीभूत होतो, कारण आंबट रस (चव) पित्त वाढवतो, तर दुसरीकडे आंबट रस वात कमी करत असल्याने पावसाळ्यातल्या वातप्रकोपावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. कसेही असले तरी या दिवसातले पाणी व त्या आंबट पाण्यावर पोसलेल्या वनस्पतींपासून तयार झालेले धान्य, फळे, भाज्या वगैरेंचे सेवन हे शरीरामध्ये आंबट रस (आंबटपणा) वाढवून आरोग्याला बाधक ठरते. पावसाळ्यात आरोग्य का बिघडते याविषयीचा आयुर्वेदाचा हा एक वेगळा दृष्टीकोन आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This causes health problems in the rainy season hldc dvr
Show comments