लग्न झाल्यानंतर अनेक पुरुषांना करिअर व कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक पुरुषांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी त्यांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याशिवाय या लैंगिक समस्यांमुळे त्याचा वाईट परिणाम हा केवळ व्यक्तीच्या शरीरावर होत नाही, तर त्यामुळे व्यक्तीची मानसिक स्थितीही खालावते आणि त्याचा वाईट प्रभाव एकूणच व्यक्तिमत्त्वावर पडतो. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांचा सल्लादेखील घेतात; परंतु त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि लैंगिक समस्यांवर मात करण्यासाठी काय करायला हवं किंवा कोणत्या पदार्थांचं सेवन करायला हवं, याबद्दल जाणून घेऊ. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजीचे सल्लागार डॉ. डॅनी लालीवाला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कोणत्या फळांचे सेवन लैंगिक आरोग्यावर कसे परिणाम करतात या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे
अननस हे गोड आणि तिखट चवीचे परिपूर्ण मिश्रण, तसेच अनेक पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जाते. ते जीवनसत्त्वांनी भरलेले आहे आणि त्यात उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. परंतु, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, अननसाचं सेवन केल्यानं लैंगिक शक्ती सुधारू शकते. हो, अननसाचे पुरुष आणि महिला दोघांच्याही लैंगिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात, असे ज्ञात आहे.
महिलांच्या लैंगिक आरोग्यावर होणारे परिणाम
अननस व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. हे फळ मासिक पाळीपूर्वीची लक्षणे जसे की, पोटफुगी कमी करण्यास मदत करते. मासिक पाळीदरम्यान जाणवणारा थकवा कमी करण्यासदेखील मदत करते. योनीमार्गात रक्ताभिसरण वाढवून महिलांमध्ये कामवासना वाढविण्यास मदत करते. तसेच अननस गर्भधारणेदरम्यानदेखील खूप फायदेशीर आहे. ते गर्भवती महिलांमध्ये निर्जलीकरण, मळमळ व उलट्या प्रतिबंधित करते. तथापि, ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर होणारे परिणाम
अननस हे रक्तप्रवाह वाढविण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे कामवासना वाढते आणि ताठरता टिकवून ठेवण्यास मदत होते. त्याच्या दाहकविरोधी कृतीमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासदेखील मदत होऊ शकते. हे शरीराला जलद ऊर्जादेखील देऊ शकते, ज्यामुळे लैंगिक स्टॅमिना वाढतो. तथापि याला समर्थन देणारा कोणताही थेट पुरावा अद्याप मिळालेला नाही.
अननसाचे शरीराला होणारे इतर फायदे
अननसाच्या सेवनाने हाडे आणि दात दोन्ही मजबूत करण्यास मदत होते. अननस व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्याने आणि त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने, ते सर्दी आणि इतर किरकोळ आजारांशी लढण्यासही मदत करते. ते जखमा बरे करण्यासही साह्यभूत आहे. अननस अन्न पचवण्यासही उपयुक्त आहे. तसेच हे कर्करोग रोखण्यासही मदत करते आणि त्याच्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे वृद्धत्वदेखील कमी होते. डॉ. लालीवाला शिफारस करतात की, अननसाच्या रसाचे सेवन करण्यापेक्षा अननसाचा गाभा खाणे चांगले.