Nose Magnet for Breathing: घोरणं ही झोपेसंबंधित एक सामान्य समस्या आहे. पण, ही सवय घरातील इतरांसाठी त्रास ठरते. कारण एका व्यक्तीच्या घोरण्यामुळे इतरांची झोपमोड होते. झोपेत असताना घशाच्या मागच्या बाजूच्या ऊती कंप पावतात तेव्हा असे होते. यामुळे एक कर्कश्श आवज येतो, ज्याला घोरणं असे म्हणतात. हा आवाज नाक आणि तोंडावाटे येत असतो. पण, जास्त वेळ घोरण्यामुळे मेंदू आणि ह्रदयावर वाईट परिणाम होत असतो. यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. दररोज घोरण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे काही जण घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी अॅकसनोर अँटी स्नोर मॅग्नेटिक नोज क्लिपचा (Acusnore Anti Snore Magnetic Nose Clip) वापर करतात.
घोरण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय काही काळ वापरता येतो. मात्र, जास्त काळ वापरल्याने त्याचा आरोग्यावरही घातक परिणाम होतो. अॅकसनोर अँटी स्नोर मॅग्नेटिक नोज क्लिप ही एक अशी क्लिप आहे जी नाकात सहजपणे बसवता येते आणि घोरण्याच्या कर्कश्श आवाजापासून मुक्तता मिळते. या नोज क्लिपमुळे नाकाचा मार्ग रुंद होतो आणि हवेचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे आवाज कमी होतो. पण, इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ईएनटीतज्ज्ञ डॉ. अनुराग टंडन यांनी नोज क्लिपच्या वापराबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या नोज क्लिपचा वापर कसा हानिकारक ठरू शकतो आणि कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात याविषयीदेखील माहिती दिली आहे.
अनेक तज्ज्ञांनी असा दावा केला की, नाकावाटे शरीरात येणाऱ्या हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारी कंपने कमी होतात, जे घोरण्याचे मुख्य कारण आहे.
काही कंपन्या नोज क्लिपमध्ये श्वासोच्छ्वास वाढवण्यासाठी मॅग्नेट थेरपीचा वापर केला आहे असा दावा करतात. परंतु, या दाव्यांमागे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.
डॉ. अनुराग टंडन म्हणाले की, नोज क्लिपमध्ये मॅग्नेट असते, त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मॅग्नेट वापरल्याने त्याचे दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही समस्या उद्भवू शकतात. आपल्या शरीरातील रक्तात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, अशावेळी मॅग्नेटमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊ शकतात, जे प्राणघातकदेखील ठरू शकते. दरम्यान, घोरण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात.
कोणत्याही हानिकारक परिणामांशिवाय वापर करा असा दावा करून विकल्या जाणाऱ्या नोज क्लिपबाबत धोका अधिक असतो. कारण यातील मॅग्नेट रक्तवाहिन्यांच्या इतक्या जवळ असतात की त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात, जे दुर्लक्ष करण्यायोग्य नसतात.
इतर कोणते सुरक्षित पर्याय आहेत का?
ज्यांना घोरण्याचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत.
नाकाच्या पट्ट्या किंवा डायलेटर्स :
नाकातील सौम्य रक्तसंचय असलेल्या लोकांसाठी नाकाच्या पट्ट्या किंवा डायलेटर खूप प्रभावी ठरू शकतात. बरेच लोक हे वापरतात आणि तो एक प्रभावी उपाय आहे.
जीवनशैलीत बदल :
वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे आणि धूम्रपान सोडणे यामुळे झोपेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
झोपण्याची स्थिती :
तुमच्या झोपण्याच्या स्थितीचादेखील घोरण्यावर परिणाम होत असतो, त्यामुळे पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपल्याने घशातील अडथळा टाळता येतो.
वैद्यकीय सल्ला घ्या :
सतत किंवा मोठ्याने घोरणे, गुदमरणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दिवसा जास्त झोप येणे यासारखी लक्षणं स्लीप अॅप्निया किंवा इतर गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
स्लीप अॅप्निया किंवा झोपेसंबंधित इतर आजारांवर उपचार करण्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण तेच आवश्यकता असल्यास सीपीएपी मशीन किंवा शस्त्रक्रिया यांसारख्या उपचारांची शिफारस करू शकतात.
घोरण्यामुळे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते, कारण ट्रेंडी गॅझेट्स किंवा मशीन्समुळे फक्त काही वेळ बचाव कराल, पण त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.