म्ही तुमचा टूथब्रश बाथरूममध्ये ठेवता का? तसे असल्यास तुम्ही कदाचित पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. कारण- त्यामुळे तुमच्या टूथब्रशमध्ये धुळीचे कण जमा होऊन, आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.
कन्टेंट क्रिएटर शशांक अलशी यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी, तुमचा टूथब्रश बाथरूममध्ये ठेवल्याने तो जीवाणू आणि बुरशी यांमुळे दूषित होऊ शकतो, असे सांगितले. “बाथरूमचे वातावरण, तेथील ओलावा व उबदारपणा, यामुळे तुम्हाला तुमचा टूथब्रश ठेवण्यासाठी एक सोईस्कर जागा वाटू शकते. पण हे जीवाणू आणि इतर रोगजनकांसाठी एक प्रजननक्षम केंद्र आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेतली.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना गुडगावच्या पारस हॉस्पिटलचे डॉ. आर. आर. दत्ता यांच्या मते, “बाथरूमच्या वातावरणातील ओलावा आणि उबदारपणा टूथब्रशच्या ब्रिस्टल्सवर जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.”
या मतावर सहमती दर्शविताना इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे प्रोफेसर डॉ. आशीष काकर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “फेकल कॉलिफॉर्म्स (fecal coliforms) आणि इतर रोगजनक सूक्ष्म जीवांमुळे टूथब्रश दूषित होण्याचा मोठा धोका आहे. टॉयलेट फ्लशिंगदरम्यान दमट वातावरण आणि एरोसोलायझेशन जीवाणूंची वाढ आणि प्रसार सुलभ करते. असा दूषित टूथब्रश वापरल्यास तोंडामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.”
टूथब्रशच्या स्वच्छतेवर परिणाम करणारे पर्यावरणीय घटक
उच्च आर्द्रता पातळी जीवाणू आणि बुरशीजन्य प्रसार वाढवते. हवेत बारीक कणांच्या स्वरूपात असलेली (एरोसोलाइज्ड) विष्ठा आणि टॉयलेट फ्लशिंगमधून सूक्ष्म जंतूंना प्रोत्साहन देते आणि डॉ. काकर यांनी नमूद केल्याप्रमाणे, “रोगजनकांना आश्रय देऊ शकणाऱ्या हवेतील बुरशीचे बीजाणू धुळीच्या कणांच्या संपर्कात येतात.” डॉ. दत्ता याबाबत पुढे म्हणाले, “टूथब्रशवर जीवाणूंचा प्रसार झाल्यामुळे तोंडाच्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो.”
हेही वाचा – मैदा किंवा गव्हाच्या पिठाऐवजी फक्त बदामाचे पीठ वापरावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे
मग टूथब्रश नक्की कुठे ठेवावा?
तुमचा टूथब्रश बाथरूमच्या बाहेरील ठिकाणी ठेवण्याचा विचार करा. डॉ. काकर यांनी शिफारस केलेला पर्याय जसे की :
- स्नानगृहाच्या (बाथरूम) बाहेरील स्वच्छ, कोरडे कपाट किंवा ड्रॉवरमध्ये ब्रश ठेवा
- वायुजन्य दूषित पदार्थांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी टूथब्रश ठेवण्यासाठी बॉक्स वापरा; जे बाजारात सहज उपलब्ध होतात.
- नियंत्रित आर्द्रता आणि कमीत कमी एरोसोलाइज्ड कणांसह बेडरूम किंवा इतर राहण्याच्या ठिकाणीही ब्रश ठेवू शकता.
टूथब्रशची योग्य स्वच्छता न राखल्यास होणारे दीर्घकालीन परिणाम
डॉ. दत्ता यांनी नमूद केले, “टूथब्रश स्वच्छता कशी राखली जाते आणि ते कुठे ठेवले जातात या पद्धतींचे तोंडाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. टूथब्रशवर जमा झालेल्या जीवाणू आणि जंतूंमुळे हिरड्यांना आलेली सूज (Gingivitis), पीरियडॉन्टायटिस (periodontitis) व दात किडणे (Tooth Decay), तोंडात संसर्ग (Oral Infections) आणि रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो.”
डॉ. काकर पुढे नमूद करतात, “चुकीच्या ठिकाणी टूथब्रश ठेवल्यास आणि योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात; ज्यामध्ये पीरियडॉन्टल रोग (Periodontal Disease), ओरल कॅन्डिडिअॅसिस (Oral Candidiasis), अॅस्पिरेटेड सूक्ष्म जंतूंपासून (Aspirated Microbes) होणारा श्वसनमार्गातील संसर्ग यांचा समावेश होतो.”
टूथब्रशची योग्य स्वच्छता राखण्यासाठी कोणते योग्य उपाय करू शकता?
डॉ. काकर प्रत्येकाला टूथब्रशच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देतात:
- दर ३-४ महिन्यांनी किंवा आजारानंतर टूथब्रश बदला.
- टूथब्रश वापरल्यानंतर तो स्वच्छ धुवा आणि स्वच्छ, कोरड्या वातावरणात ठेवा.
- टूथब्रश शेअर करणे टाळा. सर्वांचे टूथब्रश एका ठिकाणी ठेवू नका.
- अँटीमायक्रोबियल टूथब्रश सॅनिटायझर्स किंवा क्लोरहेक्साइडिन / आवश्यक तेल माउथवॉशमध्ये भिजविण्याचा विचार करा.
- टूथब्रशवरील सूक्ष्म जीवांचा भार कमी करण्यासाठी उत्कृष्ट मौखिक स्वच्छता पद्धत वापरा.
- बाजारात अल्ट्राव्हायोलेट लाइटचे कंटेनरदेखील उपलब्ध आहेत; जे वापरता येतील.
दूषित ब्रशच्या वापरामुळे तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्या उदभवू शकतात. टूथब्रश स्टोरेज आणि बदलण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला टूथब्रश कुठे ठेवता ही एक क्षुल्लक बाब वाटू शकते; परंतु तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. बाथरूममध्ये टूथब्रश ठेवण्याची सामान्य प्रथा टाळा आणि त्याऐवजी दूषित पदार्थांचा संपर्क कमी करणारी पर्यायी जागा निवडून, तुम्ही जीवाणूवाढीचा धोका आणि संभाव्यता लक्षणीयरीत्या कमी करू शकता.