बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. चुकीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. अलीकडे कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. कोलेस्ट्रॉल वाढलं की ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम करतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीराला मोठा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक, यांसारखे आजार होण्याचा मोठा धोका असतो.
निरोगी आणि फिट राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सामान्य ठेवणं फार गरजेचं आहे. पण, आजकाल लोक कोलेस्ट्रॉलकडे बरंच दुर्लक्ष करतात. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याचीदेखील आवश्यकता आहे. अलीकडेच अपोलो रुग्णालयाच्या मुख्य पोषण विशेषज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसला नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तीन पेय कसे मदत करू शकतात, याविषयी माहिती दिली आहे.
डॉक्टर म्हणतात, शरीरात कोलेस्ट्रॉल मर्यादेपलीकडे वाढल्यास स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका यांसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काही नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करून तुम्ही त्याची पातळी नियंत्रित करू शकता.
(हे ही वाचा : कमी वयात होणाऱ्या मधुमेहामुळे तुमचे आयुर्मान घटणार? संशोधनात समोर आली ‘ही’ माहिती )
१. ग्रीन टी
आरोग्यासाठी ग्रीन टी अनेक पद्धतींनी लाभदायक मानली जाते. ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप मदत मिळते. ग्रीन टीमध्ये असलेला कॅटेचिन हा घटक महत्वाचा आहे. यात अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे एलडीएलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. डॉ. प्रियंका रोहतगी म्हणतात, एका संशोधानुसार, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि एलडीएल ते एचडीएल कोलेस्ट्रॉलचे गुणोत्तर सुधारू शकते. २०१५ मधील एका अभ्यासात असे दिसून आले की, उंदरांनी कॅटेचिन आणि एपिगॅलोकाटेचिन गॅलेट, ग्रीन टीमधील सर्व अँटिऑक्सिडंट्सचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल अनुक्रमे १४.४ आणि ३०.४ टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेली ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरू शकते. दररोज दोन ते तीन कप ग्रीन टी प्या, असेही त्या सांगतात.
२. सोया मिल्क
सोयाबीनपासून तयार करण्यात आलेलं सोया मिल्क म्हणजेच दूध मिल्क हे देखील आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात कमी करता येते. सोया दुधात संतृप्त चरबीचे प्रमाण खूप कमी असते. सोया दूध हे हृदयासाठी निरोगी पेय आहे, ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप कमी असते. याव्यतिरिक्त त्यात उपस्थित एक विशिष्ट प्रोटिन लिव्हरमध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) वाढवणारे एन्झाईम ब्लॉक करते. तुम्ही दिवसातून दोन ते तीन सर्विंग सोया मिल्क सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी सोया मिल्कचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकतो.
३. टोमॅटो रस
टोमॅटोचा रस अनेक पद्धतींद्वारे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटोमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायदा होतो. एलडीएलसारख्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी टोमॅटोचा फायदा होतो. टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळेच आपण आपल्या दिवसाची सुरुवात दररोज टोमॅटोच्या रसाच्या सेवनाने करायला हवी.
अशाप्रकारे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही या पेयांचा दररोजच्या आहारात समावेश करू शकता. पण, अगोदरपासून काही आजार असल्यास, औषधे सुरू असल्यास तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही या पेयांचे सेवन करू शकता, असेही डाॅक्टर नमूद करतात.