कर्करोग हे ऐकूणच अंगावर शहारे येतात. कारण या धोकादायक आजारावर पूर्णपणे प्रभावी अशी औषधी सध्या उपलब्ध नाही. मात्र, काही वैद्यकीय उपचाराने त्याचा धोका कमी करता येत असल्याचे सांगितल्या जाते. कॅन्सरमुळे दरवर्षी अनेक लोकांचा बळी जातो. तोंडाचा कर्करोग, मुत्रपिंडाचा कर्करोग याप्रमाणे प्रोस्टेट कर्करोग हा देखील कर्करोगाचा प्रकार आहे. प्रोस्टेट कॅन्सर हा जगभरातील पुरुषांमधील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात हा आजार वाढत आहे. मात्र, जीवनशैलीत काही बदल करून या आजाराचा धोका कमी करता येऊ शकते.
प्रोस्टेट कर्करोग कसा होतो?
पुरुषांतील प्रोस्टेट ग्लँडमधील पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागल्याने हा आजार होतो. प्रोस्टेट ग्रंथी ही मुत्राशयाच्या अगदी खाली आणि गुदाशयाच्या समोर स्थित असते. ती विर्याचा भाग असलेले काही द्रव पदार्थ बनवते.
(सुका मेवा भिजवून खायचा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात)
प्रोस्टेट कर्करोग टाळता येते का?
प्रोस्टेट कर्करोग टाळण्यासाठी कोणतेही सिद्ध उपचार नाही. हा वृद्धत्वाचा आजार आहे. जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता वाढते. यामध्ये वंश आणि अनुवांशिकता देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तुमच्या वडिलांना, भावाला किंवा अनेक नातेवाईकांना प्रोस्टेट कर्करोग असेल तर तुम्हाला ते होण्याची शक्यता असते. तपासणी केल्याने कॅन्सर असल्यास शक्य तितक्या लवकर निदान आणि उपचार केले जाऊ शकतात, असे मुंबई येथील सर एचएन रिलायन्स फाउन्डेशन रुग्णालयाचे कन्सल्टंट यूआरओ – ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉ. श्रीकांत अतलुरी यांनी म्हटल्याचे हिंदुस्तान टाईम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.
जीवनशैलीतील कोणते बदल प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढवतात?
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, फॅट्स आणि अॅनिमल प्रोटीन असलेल्या आहारांवर अवलंबून राहिल्यास डीएनएचे नुकसान होऊ शकते आणि कर्करोग होऊ शकतो. वय, वंश आणि अनुवांशिकतेमुळे आधीच जास्त धोका असलेले पुरुष आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे टाळू शकतात. आहारात चरबी, चार्ड मिटचे सेवन टाळा, फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक करा. नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, धुम्रपान आणि मद्यपान टाळा. जीवनशैलीमध्ये हे बदल केल्यास प्रोस्टेट कर्करोग होण्याचे टाळता येऊ शकते, असे डॉ. अतलुरी यांचे म्हणणे आहे.
मसिना रुग्णालयाचे डॉ. प्रितम कुमार जैन यांनी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
- आरोग्यपूर्ण जीवनशैली : आरोग्याला पोषक नसलेल्या आहारांपासून दूर राहा. पौष्टिक आहार घ्या आणि वेळेवर झोपा.
- नियमित व्यायाम करा : दिवसातून २० मिनिटे आणि आठवड्यातून ५ दिवस व्यायाम केला पाहिजे.
- लठ्ठपणा टाळा : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि निरोगी अन्न खाणे उपयुक्त ठरू शकते. वजनाशी संबंधित समस्या लवकर दूर केल्या पाहिजे.
- बॉडी मास इंडेक्स राखले पाहिजे.
- दुग्धजन्य पदार्थ आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन टाळले पाहिजे.
- लाल आणि प्रक्रिया केलेले मांस असलेले आहार टाळले पाहिजे.
- ५ अल्फा रिडक्टेस इन्हिबिटर्सना प्रतिबंधित करणारी औषधे आणि अॅस्पिरीन जी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकते, या दोन्ही औषधींची एफडीएने शिफारस केलेली नाही.
प्रोस्टेट संबंधी समस्यांची सुरुवातीची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. वारंवार लघ्वी लागणे (मिक्चुरिशन), अपूर्ण लघ्वी होणे, रात्री बरेच वेळा लघ्वीसाठी झोपेतून उठणे (नॉक्ट्युरिया) हे प्रोस्टेट संबंधित समस्यांची लक्षणे असू शकतात, असे डॉ. जैन म्हणाले.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)