– डॉ. किरण नाबर
या वर्षी उन्हाळा जरा जास्त प्रमाणातच आहे. अशा या वातावरणात आपण सर्वांनी आपल्या त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये घामोळे व उबाळू हे दोन त्वचेचे आजार सर्वसाधारणपणे पाहावयास मिळतात.
घामोळे : जिथे हवामान उष्ण व दमट आहे, उदाहरणार्थ समुद्राजवळील भागात, एप्रिल मे महिन्यांमध्ये घामोळे येण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यांना घाम जास्त येतो त्यांना घामोळे जास्त येते व जिथे घाम जास्त येतो उदाहरणार्थ डोके, चेहरा, मान, छाती, पोट, पाठ व हातांवर घामोळे जास्त प्रमाणात येते. घामोळे म्हणजे त्वचेवर बारीक लालसर पुरळ येते व त्याला जेव्हा घाम जास्त येतो तेव्हा बरीच खाज येते. तसेच टोचल्यासारखेही वाटते, म्हणून त्याला प्रिकली हीट असेही म्हणतात. ज्यांना कामानिमित्त बाहेर फिरावे लागते त्यांना घामोळे येण्याचे प्रमाण जास्त असते. सध्याच्या या गर्मीच्या वातावरणात घामोळे येऊ नये म्हणून रोज थंड किंवा कोमट पाण्याने दोन वेळा आंघोळ करणे आवश्यक आहे. तसेच घाम आल्यास तो लगेच पुसणेही आवश्यक आहे.
कपडे सैल व सुती वापरावेत. शक्य असल्यास हाफ शर्ट व आउट शर्ट वापरावा, जेणेकरून आतमध्ये हवा खेळती राहील. कपडा घामाने भिजला असेल व शक्य असेल तर तो काढून दुसरा घालावा. कारण भिजलेला कपडा नंतर आलेला घाम शोषून घेऊ शकत नाही व त्यामुळे घामोळे वाढते. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा पंख्याखाली राहून वारा घ्यावा किंवा जमल्यास एअर कंडिशनमध्ये थांबावे. सकाळी अंघोळ केल्यानंतर अंग पुसल्यावर पंधरा ते वीस मिनिटांनी घामोळ्याची पावडर लावावी. रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्यामध्ये नॅपकिन भिजवून तो पिळून त्याने घामोळे असलेली त्वचा टिपून घ्यावी व त्या वेळी पंख्याचा वारा घ्यावा व त्वचा पूर्ण कोरडी झाल्यावर तिथे कॅलामाईन लोशन लावावे. या दिवसांमध्ये पाणी भरपूर प्यावे. दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. तसेच लिंबू सरबत, फळांचा रस, कलिंगडे व इतर रसाळ फळे यांचे सेवन करावे. सलाड व काकडी यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. जेव्हा पाऊस सुरू होतो व हवेमध्ये गारवा येतो त्यानंतर घामोळे आपोआप निघून जाते.
उबाळू : उबाळू हा प्रकार मुख्यत्वे करून दोन ते आठ वर्षे या वयातील लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो व तो एप्रिल – मे या महिन्यांत जास्त करून पाहावयास मिळतो. कारण या महिन्यांमध्ये तापमानही जास्त असते व मुलांना सुट्टी असल्यामुळे ती घराबाहेर अधिक खेळत असतात व येणारा घाम ही मुले लहान असल्यामुळे टिपत नाहीत. त्यामुळे अशा मुलांना प्रथम डोक्यात, कपाळावर, चेहऱ्यावर, मानेवर व छाती-पाठीवर घामोळे येते व त्यातले काही घामोळे पिकून त्यांचे रुपांतर उबाळ्यांमध्ये होते. उबाळू म्हणजे लाल रंगाचे दुखरे असे मोठे फोड. काही जण त्याला ‘आंबे आलेत’ असेही म्हणतात. कारण उबाळू नेमके एप्रिल – मे या आंब्याच्या मोसमात पाहायला मिळतात व मुलांनी जास्त आंबे खाल्ले म्हणून ते झाले आहेत, असे लोकांना वाटते. पण या उबाळूंचा संबंध हा उष्ण व दमट हवामानाशी असतो व त्याचा आंबे खाण्याशी तसा काही संबंध नसतो. उबाळू येऊ नये यासाठी मुलांना दोन वेळ कोमट पाण्याने अंघोळ घालावी. तसेच त्यांना सध्याच्या उष्ण वातावरणात भर दुपारी बाहेर खेळण्यास पाठवू नये व नेहमी जवळ रुमाल किंवा नॅपकिन देऊन त्यांना घाम सतत पुसण्यास सांगावे.
दुपारी व रात्री जेव्हा मुले झोपलेली असतील तेव्हा घामोळ्यावर कॅलामाईनसारखे लोशन थंडाव्यासाठी लावावे. कपडे सैल, सुती व पातळ मलमलचे असावेत. तसेच अशा मुलांनी जास्तीत जास्त वेळ पंख्याखाली किंवा शक्य असल्यास एअर कंडिशन रूममध्ये थांबावे. मुलांना भरपूर पाणी पिण्यास द्यावे. तसेच फळांचे रस, लिंबू पाणी व विविध प्रकारची फळे, विशेषतः कलिंगड, मोसंबी, संत्री ही फळे जास्त खाण्यास द्यावीत. ज्या मुलांना उबाळू आले असतील त्यांना मात्र डॉक्टरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. कारण त्यासाठी वेळीच अँटीबायोटिक्स चालू करावी लागतात.
ज्या भागात हवा उष्ण व कोरडी आहे अशा ठिकाणी लोकांना घामोळे येत नाही. पण घाम बाहेर न पडल्यामुळे शरीराचे तापमान वाढणे व त्वचा एकदम गरम होऊन उष्माघात होण्याचे प्रमाण जास्त असते. बाहेर जाताना सैल, पायघोळ व सुती कपडे घालावेत. शरीराचा जास्तीत जास्त भाग कपड्याने झाकून घेणे आवश्यक आहे. मोठा घेर असणारी हॅट तसेच गॉगल वापरावा. थंड पाण्यात कपडा बुडवून त्याने वेळोवेळी त्वचा टिपावी. दोन वेळा थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ करावी. एअर कूलरचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे व वरती सांगितल्याप्रमाणे आहारात बदल करावा.
हेही वाचा – दुपारच्या वेळेत वर्कआउट केल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी? वाचा डॉक्टर काय सांगतात
या दिवसांत बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी चेहरा व उघड्या भागावर सनस्क्रीन वापरावे. जेणेकरून त्वचा काळवंडणार नाही. सनस्क्रीनचा परिणाम साधारण अडीच ते तीन तास टिकतो. त्यामुळे त्यानंतर परत उन्हात जाणे होणार असेल तर सनस्क्रीन परत लावणे आवश्यक आहे.
गजकर्ण (नायटा) देखील गर्मी आणि उन्हाळ्यात जास्त दिसणारा त्वचारोग आहे. कारण बुरशी उष्ण आणि दमट वातावरणात वाढते. जांघा, काखा, कंबर या घाम साठणाऱ्या भागांवर खाजरे, लालसर, गोल चट्टे येऊन ते पसरत जातात. त्यांना खूप खाज येते. हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे असते. सैल, सुती कपडे वापरणे, रात्री झोपताना घामटलेली अंतरवस्त्रे काढणे, तसेच वेळोवेळी आतील कपडे जास्त गरम पाण्यात बुडवून ठेवणे किंवा त्यांना वारंवार इस्त्री करणे या उपायांनी आपण नायट्यापासून बचाव करू शकतो. ऋतुमानाप्रमाणे आपण वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास आपली त्वचा आपण नक्कीच निरोगी ठेवू शकतो.