हल्लीच्या किशोरवयीन मुलांच्या बोलण्यात ‘ब्रो’ हा शब्द जसा रुळला आहे तसाच ‘योलो’ हा शब्दही रुळलेला आहे. योलो (YOLO) म्हणजे यु ओन्ली लिव्ह वन्स. तुम्ही एकदाच जन्माला येता, एकदाच जगता, आलेला क्षण परत येत नाही तर जे आयुष्य मिळालं आहे ते भरभरुन जगा. स्वतःसाठी जगा इत्यादी इत्यादी. जेन झी पिढीशी बोलताना अनेकदा त्यांच्या चर्चांमध्ये योलोबद्दल ते भरभरून बोलत असतात. किंवा एकच आयुष्य आहे वगैरे गप्पाही होतात.
एकूण किरोशवयीन आणि तरुण मुलामुलींचा स्क्रीन टाइम बघता त्यांना आता योलो बरोबरीने ‘जोमो’ची ओळख करून द्यायला हवी आहे. जसं आयुष्य एकच आहे ते भरभरून जगा हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे ‘जोमो’ म्हणजे ‘जॉय ऑफ मिसिंग आउट’ हाही याच एकदाच मिळालेल्या आयुष्यातला तितकाच सुंदर भाग आहे हे मुलांना, तरुणांना सांगण्याची वेळ आलेली आहे.
हेही वाचा… Health Special: नवरात्रात व्रतासाठी काय खावं?
‘फोमो’ हा शब्द आता बराच प्रचिलित आहे. हा आता फक्त शब्द नाहीये तर एका मानसिक अवस्थेत त्याचं रूपांतर होऊन, आजाराला आमंत्रण मिळावं इतपत गंभीर प्रकरण बनलेलं आहे. ‘फोमो’ म्हणजे ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’..सतत आपल्या आयुष्यातून काहीतरी मिस आउट होतंय ही भावना मनात असणं आणि त्यामुळे प्रचंड असुरक्षित वाटत राहणं. त्यातूनच पुढे अस्वस्थता, पॅनिक अटॅक, नैराश्य यांची मालिका तयार होते. फोमो ही मानसिक अवस्था सोशल मीडियामुळे निर्माण झालेली नसली तरी सोशल मीडियामुळे बळावलेली आहे. माझ्या घरचे माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतायेत, माझे मित्रमैत्रिणी मजा करतात मला सांगत नाहीत, मला त्यांच्यात घेत नाहीत, माझ्या घट्ट मैत्रिणीने अमुक तमुक सगळ्यांना सांगितले पण मला नाही असं वाटून फोमो पूर्वीही लोकांना वाटत असे, अर्थात त्याला तेव्हा फोमो हे नाव नव्हतं.
माणसांच्या मनातली असुरक्षिततेची भावना निरनिराळ्या घटकांमुळे, कारणांमुळे प्रबळ होते. सोशल मीडिया आल्यावर, तिथल्या लाईक्स, लव्ह आणि फॉलोअर्सची चटक लागल्यावर, त्याकडे तटस्थपणे बघण्याची नजर विकसित न झाल्यामुळे माणसांच्या मनातल्या असुरक्षिततेच्या आदिम भावनेने फोमो नावाचं रूप घेऊन माणसांनाच छळायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर घडणारी एखादी चर्चा, ट्रेंड, चॅलेंज आपल्याला वेळेत समजला नाही, समजला तरी काही कारणांनी त्यात आपण सहभागी होऊ शकलो नाही, इतरांच्या आयुष्याचे अपडेट्स; जे सतत सोशल मीडियावर बघण्याची सवय माणसांना लागलेली असते, ते मिळाले नाहीत तर माणसं अस्वस्थ होतात आणि त्यांच्या मनातली फोमोची भावना तीव्र व्हायला सुरुवात होते.
हेही वाचा… Mental Health Special: ‘जबाबदारीचा स्वीकार’ खरंच किती महत्त्वाचा असतो?
किशोरवयीन आणि तरुणतरुणींना ही याचा धोका असतो कारण ते सतत इंस्टाग्रामवर असतात. इंस्टाग्रामचं स्वरूप व्हिज्युअल असल्याने आपण सतत चांगलं दिसलो पाहिजे, इतर चांगले दिसतायेत, त्या स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे, इन्स्टा ट्रेंड्स आपल्याला समजले पाहिजेत, आपण कुल असलं पाहिजे अशा अनेक गोष्टींमुळे मुलांच्या आणि तरुणतरुणींच्या मनावर प्रचंड ताण येतो, त्यातूनच फोमोची सुरुवात होते. पण फोमोच्या विचित्र ट्रॅपमध्ये अडकून मानसिक स्वाथ्य गमावून बसायचं नसेल तर फोमो बरोबर जोमोचा विचार मुलांपर्यंत पोचवायला हवा.
`एका क्लिकवर जगाशी जोडल्या जाण्याच्या काळात आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, आभासी जगात सगळं मिळाल्याचा आभास झाला तरी वास्तव त्यापासून कोसो दूर असू शकतं आणि आपल्याला जे मिळालेलं नाहीये ते न मिळण्याचीही एक गंमत असते हे जाणीवपूर्णक मुलांना शिकवण्याची आज गरज आहे. यावेळी सोशल मीडियापासून अनेक गोष्टी मुलांच्या आयुष्यात येतायेत. अशावेळी मिसिंग आउट मधला जॉय एकदा मुलांना समजला, सगळं, पाहिजे तेव्हा, लगेच मिळत नाही..मिळालं नाही तरीही आयुष्यात विशेष फरक पडत नाही हे एकदा मुलांना समजलं, स्वीकारता आलं की त्यांच्या जगण्याचे प्रश्न किचकट न करता त्याकडे हसतखेळत बघायला ते शिकू शकतात. भारत हा नैराश्यग्रस्त तरुणाईचा देश होऊ बघतो आहे अशावेळी मुलांच्या आयुष्यात जोमो येण्याची फार गरज आहे.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: त्रासदायक डोकेदुखी
आपल्यावर माहिती सतत येऊन आदळत असते. फोन उघडला की व्हॉट्सअप मेसेजेस पासून नोटिफिकेशन्सपर्यंत सगळीकडे फक्त माहिती असते. सोशल मीडियावरही तेच. टीव्हीवरही तेच. सगळीकडे फक्त प्रचंड माहिती आणि या माहितीच्या महासागरात गटांगळ्या खाणारे आपण.. सतत सगळे अपडेट्स मिळण्याची आपल्याला इतकी सवय होते की अपडेट्स मिळाले नाहीत की अस्वस्थ वाटायला लागतं. अपडेट्स मिळवण्याची धावपळ सुरु होते. पण थोडी कमी माहिती, किंवा अजिबातच माहिती न मिळवण्याचेही फायदे असतात. हे मुलांना समजलं पाहिजे. सगळे अपडेट्स लगेच का हवेत? गरज काय आहे? आवश्यक तेवढी माहिती आणि तीही योग्यवेळी मिळाल्याने आपलं काहीही नुकसान होत नाही हे मुलांना समजावून देणं आज गरजेचं आहे. खरंतर हे मोठ्यांच्या जगाने ही समजून घेणं आवश्यक आहे. आपण सतत माहिती खाणारे किडे बनलो आहोत, ती माहिती आपल्याला लागतेय का, ती माहिती आपण प्रोसेस करतोय का, त्यावर विचार करतोय का, त्या माहितीचा आपण काय उपयोग करतोय हे सगळं करण्याची आपल्याला आणि आपल्या मुलांना फुरसत नाहीये. आपण फक्त माहिती गपागप गिळतोय. जसा आपल्या फोनमध्ये कचरा तयार होत असतो तसाच तो आपल्या मेंदूतही होतो.
माहितीच्या या अविरत इनकमिंगला थोडा ब्रेक लावण्याची संधी जोमो आपल्याला देतं. जोमो मुळे माहितीच्या आणि सोशल मीडियाच्या कोलाहलात आपल्याला थोडा श्वास घ्यायची फुरसत मिळते. मुलांना ही फुरसत आज शिकवायला हवी आहे. पालकांच्या दुप्पट गतीने आज मुलं आणि तरुणाई धावत असते. आणि जेव्हा ते काहीही करत नसतात तेव्हा ते फोनला चिकटलेले असतात.
काहीही न करणं म्हणजे शब्दशः काहीही न करणं ही अवस्थाच मुलांच्या जगण्यातून नाहीशी होतेय. हे भीतीदायक आहे. निवांतपणा मुलांच्या आणि तरुणाईच्या जगण्यात परत आणायचा असेल तर सध्या तरी आपल्याला ‘जॉय ऑफ मिसिंग आउट’ शिवाय पर्याय नाही