Health Benefits of Tomato and Cucumber ‘औषधाविना उपचार’च्या गेल्या दोन भागांमधून आपण फळभाज्या आणि शेंगभाज्यांचे महत्त्व समजून घेतले. या भागात आपण उर्वरित भाज्यांची माहिती घेतानाच मांसाहार करणाऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या भाजीचीही माहिती घेणार आहोत. मांसाहारामुळे अनेकदा शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यावर या भाजीचा वापर हा महत्त्वाचा उताराच ठरतो!
काकडी
काकडीचे देशपरत्वे खूप प्रकार आहेत. सर्वांत चांगली काकडी म्हणजे मावळी काकडी होय. त्याच्या खालोखाल नेहमीच्या मिळणाऱ्या काकड्या व तिसऱ्या क्रमांकाच्या काकड्या म्हणजे तवसे म्हणून लांबलचक मोठ्या काकड्यांचा प्रकार होय. मावळी काकडी गोड आहे. तिच्या अधिक सेवनाने कफ, सर्दी, खोकला सहसा येत नाही. विशेषत: कोणत्याही आजारपणानंतर ‘लघुआहार’ सुरू करताना ही काकडी (सिझन असल्यास) जरूर खावी. त्या काकडीमुळे आतड्यांचा क्षोभ कमी होतो. कमीअधिक औषधांनी जेव्हा आतड्यांना दाह होतो, मुलायमपणा कमी होतो तेव्हा काकडी आपल्या स्निग्ध गुणाने आतड्यांचे रोपण किंवा संधानकार्य करते.
काकडी ही मूत्रल आहे. पण त्याच्या बारक्या बिया या मूतखड्याचा पाया होऊ शकतात. म्हणून कॅल्शिअम ऑक्झलेट या काटा असणाऱ्या मूतखड्यात काकडी निषिद्ध-कुपथ्यकारक आहे. कमी बियांची किंवा काकडी किसून पिळून त्याचा रस मूत्रल म्हणून घ्यावयास काहीच हरकत नाही. गरमी, परमा, हातापायांची जळजळ, तीक्ष्णोष्ण खाण्यापिण्याने, दारू, तंबाखू, धुम्रपान सेवनाने जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा एकवेळ काकडीच्या रसावर राहावे. काकडी शुक्रवर्धक आहे. एड्स या महाभयंकर विकाराच्या जागतिक लढाईत तवशासारख्या काकडीचा, त्याच्या मुळांचा उपयोग जगातील अनेक शास्त्रज्ञ प्रयोग म्हणून करू पाहत आहेत. आपण किमान रोजच्या आहारात पित्तशामक म्हणून जरूर वापरावी.
गाजर
‘गाजराची पुंगी’ हा वाक्प्रचार लक्षात न घेता सर्वसामान्य माणसाने ताकदीकरिता आठवड्यातून एक वेळा तरी गाजर जरूर खावे. गाजर हे घोड्यांकरिता मोठे अन्न आहे हे आपणा सर्वांना माहीत नाही. गाजर कितीही महाग असले तरी किंमतवान घोड्याच्या आहारात ते आवश्यक आहे. गाजर रुचीवर्धक व पाचक आहे. दिल्ली गाजर व गावरान गाजर अशा दोन जाती येतात. गावरान गाजर गुणांनी श्रेष्ठ आहे. गाजर रस, कच्चे, शिजवून किंवा किसून तयार केलेली खीर किंवा गाजरहलवा अशा नाना प्रकारे गाजराचा वापर करता येतो. गाजराचा रस पिऊन रक्त वाढते. हाडे मजबूत होतात. गाजराची भाजी खाऊन दात बळकट होतात. हिरड्या मजबूत होतात. शरीराला स्थैर्य, टिकाऊपणा, काटकपणा गाजर सेवनाने येतो.
गोवार
पथ्यकर पालेभाज्यांत विशेषत: कफप्रधान विकारात गोवारीच्या शेंगांना वरचे स्थान आहे. गोवार रूक्ष, वातवर्धक आहे. सर व दीपन गुणांमुळे मलावरोध, मधुमेह, रातांधळेपणा विकारात गोवारीचे महत्त्व सांगितले आहे. रोग निवारण्याकरिता गोवारीची भाजी तुपावर परतून सैंधव मिसळून खावी. गोवारीची भाजी फार तेलकट बनवू नये. औषधी गुण जातात. मेदस्वी माणसाने गोवारीच्या शेंगा नुसत्या वाफारून खाव्यात. जून गोवार खाऊ नये. गोवारीची कडू जात म्हणजे बावची होय.
श्रावणघेवडा
श्रावणघेवडा ही थंड गुणाची, वातवर्धक व पित्तशामक भाजी आहे. मलमूत्र साफ होत नसले तर ताज्या व कोवळ्या घेवड्याची एक वेळ भरपूर भाजी खावी. एक वेळेस पोट साफ होते. लघवी सुटते.
घोसाळी
घोसाळी भज्यांकरिता प्रसिद्ध आहेत. याशिवाय घोसाळ्याची कडू चवीची जात जास्त उपयुक्त असते. घोसाळ्याची भाजी खाऊन लघवी साफ होते. छातीत खूप कफ झाल्यास उलटी करवण्याकरिता घोसाळ्यांचा रस प्यावा. त्रास न होता उलटी होते. जीर्ण, जुनाट, चिघळलेल्या जखमा असणाऱ्या रुग्णांनी घोसाळ्याची भाजी खावी. जखमा लवकर भरून येतात. यकृत किंवा प्लीहा हे अवयव वाढल्यामुळे पोट मोठे झाल्यास घोसाळ्याची शिजवून बिनतेला-तुपाची भाजी किंवा नुसता रस प्यावा. पोटाची सूज कमी होते. वजन कमी करण्याकरिता घोसाळी उकडून त्याचे तुकडे मोठ्या प्रमाणावर खावेत. पोट फुगणे, खडा होणे, स्वप्नदोष, लघवी अडखळत किंवा तिडीक मारून होणे, उष्णतेच्या कामामुळे थकवा येणे या तक्रारीत घोसाळी ही पथ्यकर पालेभाजी आहे.
टिंडा
ही एक पथ्यकार भाजी आहे. टिंडे कोवळे असतील, जून बिया त्यात याची काळजी घ्यावयास हवी. टिंड्याची भाजी घेवड्याप्रमाणेच पित्तशामक, शीत गुणाची, रुची उत्पन्न करणारी आहे. आजारी माणसांनी टिंडा भाजी अवश्य खावी. टिंडा भाजीसोबतची पोळी अंगी लागते. आहार वाढवते. क्षुद्बोध उत्पन्न होतो.
टोमॅटो
टोमॅटोला फार पूर्वी कोणी बेलवांगे म्हणत. का? त्याचा कार्यकारणभाव लागत नाही, पण शरीराच्या सार्वत्रिक वाढीकरिता वांग्यासारखाच टोमॅटोचा उपयोग होतो, याबद्दल दुमत नाही. टोमॅटोमुळे रुची उत्पन्न होते. अग्निवर्धन आहे. शरीर सुकले असताना टोमॅटोचा रस हा एक सहारा आहे. ज्यांना कोणत्याच पदार्थावर वासना नाही, पांडुता आहे, त्यांना टोमॅटोचा रस उत्तम काम देतो. रक्त बिघडणे, दातातून रक्त येणे, हिरड्या झिजणे, रक्त येणे या तक्रारीत टोमॅटो द्याावा. सोबत आल्याचा तुकडा द्याावा.
मांसाहाराकरता आवश्यक
मांसाहार करणाऱ्यांकरिता टोमॅटो फार उपयुक्त आहे, नव्हे आवश्यक आहे. मांसाहारामुळे होणारी जळजळ, लागणारी खूप तहान, पोट जड होणे याकरिता जोडीला टोमॅटो ‘माफक’ प्रमाणात हवा. सुका खोकला, मेदस्वी शरीर याकरिता रसधातू वाढविण्याकरिता टोमॅटो खावा. गर्भवती स्त्रीने १००/२०० ग्रॅम टोमॅटो नियमित खावा. गर्भाचे उत्तम पोषण होते. मानसिक श्रम, अशांत झोप असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे खावा. पोटात वायू धरण्याची खोड ज्यांना आहे, मूतखडा असणाऱ्यांनी टोमॅटो वर्ज्य करावा. टोमॅटोसोबत हिंगपूड व मीठ वापरावे. टोमॅटो बाधत नाही. आंबट टोमॅटो वर्ज्य करावा.
तोंडली
तोंडली या वेलाची फळे, पाने व मूळं औषधी उपयोगाची आहेत. तोंडल्याच्या मुळांचा रस सैंधव चूर्ण मिसळून घ्यावा. मधुमेहावर उपयुक्त आहे. मधुमेही रोग्यांकरिता भाजी उपयुक्त आहे. पोटभर खावी. गरोदर स्त्रियांना क्वचित अंगावरून जात असल्यास लगेच तोंडल्याची भाजी खावी. जिभेला कात्रे पडले असल्यास पानांचा रस जिभेला लावावा. पानांचा रस व्रणरोपणाचे काम करतो. पाने वाटून जखमेवर बांधावीत. पोटात रस घ्यावा. बाळंतिणीला भरपूर दूध येण्याकरिता तोंडल्याची भाजी उपयोगी पडते. पातळ जुलाब होत असल्यास, तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठपाणी घ्यावे. काविळीत तोंडल्याची भाजी पथ्यकर आहे. मधुमेहात पायांची आग होते. ती थांबवण्याकरिता तोंडल्याची भाजी खावी. मार, मुरगळा, सूज याकरिता तोंडल्याचे वाटून शिजवून पोटीस करून बांधणे. तोंडली खाल्ली तर बुद्धी कमी होते हा समज चुकीचा आहे. स्त्रियांच्या धुपणी या विकारात तोंडल्याच्या मुळांचा काढा घ्यावा. जननेंद्रियांच्या विकारात व्रणरोपण, रक्तसंग्रहणाच्या कार्यात तोंडल्याची भाजी उपयुक्त आहे.