डॉ. अश्विन सावंत
पित्त म्हणजे म्हणजे आंबटकडू चवीचे पित्त (बाईल) असा मर्यादित अर्थ नसून शरीरामध्ये रुपांतर (conversion) करणारे, बदल (change) करणारे एक शरीरामधील उष्ण-तत्त्व आहे हे आपण जाणून घेतले आणि पित्तप्रकोप कसा ओळखावा हे समजून घेत आहोत,जो विशेषतः शरद-ग्रीष्म या उष्ण ऋतूंमध्ये मुख्यत्वेकरुन होतो. त्यातही शरद ऋतू अर्थात ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये जेव्हा तीव्र ऊन असते तेव्हा त्याच्या परिणामी पित्तप्रकोपजन्य विविध त्रास आपल्याला होत असतात. शरीरात होणारा हा पित्तप्रकोप ओळखण्याची एक साधीशी स्वतःच करण्याजोगी चाचणी म्हणजे ’प्रकाश-असहत्व’ अर्थात प्रकाश सहन न होणे.
प्रकाश सहन न होणे म्हणजे प्रकाशकिरणे फेकणाऱ्या वस्तूंकडे पाहू न शकणे (खरं तर त्या वस्तूंमधून निघणाऱ्या प्रकाशकिरणांचा त्रास होणे). जसे-सूर्य, भट्टी, बॉयलर, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, वेल्डिंगमधून उडणाऱ्या ठिणग्या वगैरे. मायग्रेन(अर्धशिशी) हा एक आजार आहे, ज्यामध्ये रुग्ण प्रकाश-असहत्व असल्याचे स्वतःच सांगतो, ते मायग्रेनचे एक निश्चित लक्षणच आहे. मात्र तुमच्यामध्ये पित्तप्रकोपाची अन्य लक्षणे दिसत नसतानाही ’प्रकाश-असहत्व’ हा त्रास होत असेल तर शरीरामध्ये उष्णता वाढल्याचे निदान करता येते.
हेही वाचा… Health Special: प्री-हॅबिलिटेशन काय असतं आणि ते इतकं महत्त्वाचं का?
प्रकाश नकोसा वाटणे, घराबाहेर पडल्यावर सूर्याचा उजेड (थेट किरणे नाहीत तर केवळ सभोवतालचा उजेड) सुद्धा सहन न होणे, टीव्हीवर आवडता कार्यक्रम असुनही टीव्हीकडे पाहू नयेसे वाटणे, कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे फार वेळ सलग पाहाता न येणे, टीव्ही-कॉम्प्युटरकडे काही वेळ बघितल्यावर डोळ्यांची आग होणे वा डोळे लाल होणे, भिरभिरल्यासारखे होणे, डोके जड होणे, डोळे बंद केल्यावर रंगीत प्रकाश दिसणे, मळमळणे वगैरे. अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास तुमच्या शरीरामध्ये पित्त (उष्णता) वाढत आहे, असे निदान करता येते.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: जीवनावश्यक मीठ
शरद ऋतूमध्ये असा त्रास होणे तसे स्वाभाविक म्हटले पाहिजे,अर्थात त्याचाही उपचार करावा लागतो. मात्र जर रुग्णाला हा त्रास दीर्घकाळ सुरु राहिला तर ते भावी पित्तविकाराचे सूचकही असु शकते. यामुळे अशा लहानसहान वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर वेळीच पित्तशामक उपचार करावा.