Turmeric for Cholesterol: बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) समस्या वाढली आहे. निरोगी आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल. मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल पोषण आणि आहारशास्त्र विभागप्रमुख रितिका समद्दार यांनी हळदीमध्ये एक पदार्थ मिसळल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतो, असे एका अभ्यासातून दिसून आले असल्याची माहिती द इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
रितिका समद्दार सांगतात, कोविडच्या काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहारात हळदीचा समावेश केला गेला. परंतु, गेल्या काही वर्षांतील अनेक अभ्यासांमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे आढळले आहेत. कारण, त्याच्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी गुणधर्म आढळतात. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीमध्ये कर्फ्यूमिन नावाचे संयुग असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हळदीतील ४ ते १० टक्के भाग असलेल्या कर्क्युमिन नावाच्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडच्या उपस्थितीमुळे शरीराला डीजनरेटिव्ह सिंड्रोमपासून सुरक्षा मिळण्यास मदत होऊ शकते.
(हे ही वाचा:वय आणि उंचीनुसार वजन किती हवे? तुमचे वजन कमी की जास्त? परफेक्ट बॉडीसाठी एकदा ‘हा’ सोपा चार्ट पाहा)
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयदेखील निरोगी राहते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील दीर्घकालीन सेल्युलर नुकसान टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण हळद रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. याविषयी प्राण्यांवर झालेल्या एका अभ्यासात दिसून आले की, हळदीच्या अर्काने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तवाहिन्यांमध्ये एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखले जाऊ शकते.
कच्ची हळद पाण्यात उकळणे ही एक सामान्य चूक आहे. परंतु, जोपर्यंत तुम्ही त्यात ठेचलेली मिरपूड घालत नाही तोपर्यंत ते त्यात असलेले कर्क्यूमिन सोडणार नाही. नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा कर्क्यूमिनच्या अर्काचा डोस घेणे अधिक चांगले आहे. कच्च्या हळदीचा कोणताही ३ ग्रॅम ते ५ ग्रॅम वजनाचा तुकडा तुम्हाला २०० मिलीग्राम ते ५०० मिलीग्राम कर्क्यूमिन देऊ शकतो. त्यानुसार दररोज ५००-२,००० मिलीग्राम हळदीचे सेवन करणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
हळद आरोग्यासाठी चांगली असली तरी हळदीचीसुद्धा एक वाईट बाजू आहे. तुम्ही एका मर्यादित प्रमाणात उपयोग केला तर नक्कीच हळद ही लाभदायक आहे. पण, अति प्रमाणात वापर केला तर त्याचे तोटेसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतातच. ज्या लोकांचे रक्त पातळ आहे वा ज्यांना अशी समस्या आहे, त्यांनीसुद्धा हळदीचे जास्त प्रमाणात सेवन अजिबात करू नये. हळद ही रक्त अधिक पातळ करण्याचे काम करते. जर सततच्या सेवनाने रक्त अधिक पातळ झाले तर समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे तुम्ही हळदीचे सेवन जास्त प्रमाणात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही तज्ज्ञ सांगतात.