Rubina Dilaik’s Fitness Secret : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक नेहमी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. सुंदर फोटोंमुळे ती नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. पण, तुम्हाला रुबिना दिलैकच्या फिटनेस मागील रहस्य माहितीये का?
रुबिना कधी कधी स्ट्रीट फूडसुद्धा खाते, पण नियमित निरोगी आहार घेते. ‘कबूल है’फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी सांगते, “रुबिना नेहमी पार्ट्यांमध्ये टोमॅटोचा ताजा ज्यूस तयार करून पिते.”
अलीकडेच पूजा बॅनर्जीने पती कुणाल वर्मासह रुबिनाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती म्हणाली, “रुबिना नेहमी आरोग्याबाबत जागरूक राहते. तिच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती पार्ट्यांमध्येसुद्धा ताजा टोमॅटोचा ज्यूस पिते. हे मी तिच्याकडून शिकले आणि मीसुद्धा आता टोमॅटोचा ज्यूस पिते.
टोमॅटोचा ज्यूस पिणे खरंच चांगले आहे का; जाणून घ्या, काय आहेत फायदे?
आहारतज्ज्ञ सल्लागार कनिक्का मल्होत्रा सांगतात की, ताज्या टोमॅटोचा ज्यूस एक पौष्टिक पेय आहे, जे अनेक आरोग्यदायी फायदे देते, त्यामुळे याचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. “टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये लायकोपिन असते, जे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते. टोमॅटोच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये पोटॅशियम तसेच इतर फायदेशीर पौष्टिक घटकसुद्धा असतात,” असे कनिक्का मल्होत्रा सांगतात.
त्या पुढे सांगतात, “टोमॅटोचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगला असतो. या ज्यूसच्या सेवनाने त्वचेवर चमक येते “टोमॅटोमध्ये खूप जास्त प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन निर्माण करण्यास मदत करते. कोलेजन त्वचेवर लवचिकता टिकवण्यास आणि वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. याशिवाय यातील लाइकोपिन युव्ही रेजपासून संरक्षण करण्यास मदत करते. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये दिसणारे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. फ्री रॅडिकल्समुळे पेशींचे नुकसान होऊ शकते, तसेच अकाली वृद्धत्व येऊ शकते.
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या मिनरल्ससह व्हिटॅमिन्स ए, सी, के आणि बी असतात. मल्होत्रा सांगतात, “टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, पाण्याचे सेवन हायड्रेशनसाठी मदत करतात.”
टोमॅटोच्या ज्यूसमधील फायबर पचनक्रियेस मदत करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. मल्होत्रा सांगतात, “कॅलरी कमी असूनही टोमॅटोच्या ज्यूसनी पोट भरते. संतुलित आहाराचा भाग म्हणून भूक नियंत्रित ठेवण्यास टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर ठरू शकतो.”
काय लक्षात ठेवावे?
टोमॅटोचा ज्यूस अॅसिडिक आहे आणि अॅसिड रिफ्लक्स किंवा पोटाशीसंबंधित आजार असलेल्या व्यक्तींना हा ज्यूस प्यायल्याने अस्वस्थता जाणवू शकते. “दुकानातून विकत घेतलेल्या ज्यूसमध्ये सोडियम किंवा आरोग्यास हानिकारक घटक असू शकतात, त्यामुळे घरी ताजा ज्यूस तयार करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते,” असे मल्होत्रा सांगतात.
आहारात तु्म्ही ताज्या टोमॅटोच्या ज्यूसचा समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन करण्यापूर्वी वैयक्तिक आहाराच्या गरजा लक्षात घ्या आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.