Type 2 Diabetes : टाईप २ मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. त्याचबरोबर भारतातही बहुतांश लोकांना टाईप २ मधुमेहाची लागण होताना दिसत आहे. शरीरातील इन्सुलिनच्या असंतुलनामुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जाते. त्यावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शिक्सफिटनेसच्या आहारतज्ज्ञ व फिटनेस एक्सपर्ट शिखा सिंह म्हणाल्या की, शरीरातील यंत्रणा इन्सुलिनला प्रतिरोधक बनल्याने किंवा रक्तातील साखरेचे नियंत्रण राखता न आल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

टाईप २ मधुमेहासाठी बैठी जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. मर्यादित शारीरिक हालचालींमुळे शरीरातील अवयवांभोवती मुख्यत: पोटाच्या भागात चरबी जमा झाल्याने इन्सुलिनच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन कार्य बिघडते.

म्हणूनच सिंग यांनी नमूद केले की, वेगाने चालणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे टाईप २ मधुमेहावर रोज वेगाने चालणे हा सर्वांत प्रभावी व सोप्या प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक आहे. एक पद्धतशीर पुनरावलोकन आणि मेटा विश्लेषणात असे आढळून आले की, चार किमी / प्रति तास किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होऊ शकते. जलद चालणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि एकूण शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. त्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत होते आणि आरोग्य सुधारते.

चालण्यासारख्या शारीरिक हालचाली विशेष प्रभावी आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण १५ ते २० मिलिग्राम प्रति डेसिलिटर (मिग्रॅ/डेसीएल) कमी करण्यास मदत होते, असे दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या संचालक डॉ. मनीषा अरोरा म्हणाल्या. तसेच, यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे, स्नायूंमध्ये ग्लुकोजचे सेवन वाढवणे आणि ताण व जळजळ कमी करण्यास मदत मिळते, असे डॉ. अरोरा म्हणाले.

दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाल सिंग यांनी सांगितले की, दररोज ३० मिनिटे चालणे फायदेशीर आहे. तसेच डॉ. सिंग यांनी नमूद केले की, टाईप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी चालण्याची गती महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त मंद गतीने चालणे तितकेसे प्रभावी ठरणार नाही. अधिक फायदे मिळवण्यासाठी कालांतराने तुमचा वेग वाढवणे महत्त्वाचे आहे. कारण- जलद चालण्यामुळे जास्त चरबी जाळण्यास मदत होते आणि शरीरातील चयापचय वाढतो, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते, तसेच चांगला आहारही यासाठी पूरक ठरतो. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि श्वसन आरोग्यदेखील सुधारते.

चांगल्या परिणामांसाठी सतत २० ते ३० मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा आणि चालताना तुमचा वेग हळूहळू वाढवा. त्यामुळे केवळ मधुमेहाचाच धोका कमी होत नाही, तर शरीराच्याि एकूण कार्यासह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य सुधारते, स्नायूंची ताकद वाढते. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. हळूहळू तुमचा चालण्याचा वेग वाढवल्यास अधिक फायदे मिळतात, असेही डॉ. सिंग म्हणाले.