मूल हे आईच्या पोटात वाढते हे आपल्याला माहित आहे. जुळी मुलं देखील एकाच आईच्या पोटात वाढतात. मात्र तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की, एखादं भ्रूण (मूल) जन्माला येणाऱ्या भ्रूणाच्या चक्क मेंदूत वाढतेय..नाही ना…पण चीनमधून अशी एक घटना समोर आली आहे. ज्यात डॉक्टारांनी एका वर्षाच्या मुलीच्या मेंदूतून चक्क एक जिवंत भ्रूण बाहेर काढले आहे.
डॉक्टरांनी जेव्हा या मुलीच्या मेंदूचा रिपोर्ट पाहिला तेव्हा ते देखील हैराण झाले. कारण आजवर आपण पोटात मूल वाढल्याचे पाहिले, ऐकले, पण एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत कसा काय गर्भ वाढू शकतो? यामुळे डॉक्टरही गोंधळात पडले. न्यूरोलॉजी जर्नलमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
नेमकी घटना काय?
चीनमध्ये एका मुलीचा वर्षभरापूर्वी जन्म झाला. जन्मापासून मुलीच्या डोक्याचा आकार सतत वाढ होता. अशापरिस्थितीत तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले जेथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. यावेळी सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये डॉक्टरांना मुलींच्या मेंदूमध्ये एक जिवंत भ्रूण वाढत असल्याचे आढळले. डॉक्टरांनी सांगितले की, हे न जन्मलेले भ्रूण मुलाच्या मेंदूमध्ये ४ इंचापर्यंत वाढले होते. त्याची कंबर, हाडे आणि बोटांची नखेही विकसित होत होती. एक वर्षांची ही मुलगी आईच्या पोटात असल्यापासूनच या न जन्मलेल्या भ्रूणाचा विकास तिच्या मेंदूत होत होता, असेही डॉक्टरांनी सांगितले.
मुलीच्या मेंदूतून काढललेल्या या भ्रूणाच्या जिनोम सिक्वेन्सिंमध्ये हे भ्रूण मुलीचा जुळा असल्याचे समोर आले. आईच्या पोटात वाढणाऱ्या दोन भ्रूणांपैकी एक भ्रूण दुसऱ्या भ्रूणाच्या आत विकसित होऊ लागतो. तसेच हे दोन्ही भ्रूण एकमेकांपासून वेगळे होत नाहीत तेव्हा असे होते.वैद्यकीय भाषेत याला मोनोकोरियोनिक डायनाओटिक असे म्हणतात.
आत्तापर्यंतच्या वैद्यकीय इतिहास अशाप्रकारची सुमारे २०० प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यातील मेंदूच्या आत भ्रूणाच्या विकासाची १८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. बऱ्याच प्रकरणांमध्ये पोटाच्या आतड्या, तोंड आणि अंडकोषात भ्रूण वाढत असल्याचे आढळले आहेत.
दरम्यान या मुलीला हायड्रोसेफलस नावाची समस्या असल्याचे डॉक्टारांनी म्हटले आहे. अशास्थितीत मेंदूत पाण्यासारखा द्रव जमा होऊ लागतो, या द्रवाचे प्रमाण जास्त झाल्यास मेंदूवर विपरित परिणाम होतो. सहसा लहान मुले आणि वृद्धांना या समस्येचा सामना करावा लागतो.