How to Reduce Underarms Fats Exercise: बॅट विंग्स, ऍक्सिलरी फॅट अशा नावाने ओळखकी जाणारी दंडाखालील किंवा काखेजवळील चरबी ही अनेकदा आपल्या कपड्यांचा लुक बिघडवते. आरोग्याच्या दृष्टीने अतिवजन हे घातक आहेच पण काही वेळा अशा प्रकारच्या फॅट्समुळे आपल्या आत्मविश्वासावरच हल्ला होऊ शकतो. काखेजवळील फॅट्स वाढल्याने काही वेळा त्याच भागातील त्वचेवर घामामुळे सुद्धा चट्टे उठणे, पुरळ येणे असे त्रास होऊ शकतात. शिवाय आपल्या आवडीचे स्लिव्हलेस कपडे घालायला सुद्धा संकोच वाटू शकतो. हे फॅट्स मुख्यतः स्तनाच्या ऊतींपासून वेगळे असतात पण अनेकदा यामुळे स्तनांचा आकारही मोठा वाटू शकतो. असं असलं तरी स्तनांचा आकार साधारण असणाऱ्या किंवा वजन आटोक्यात असणाऱ्या महिलांना हा त्रास होण्याची शक्यता असतेच. हा त्रास अशा महिलांना अनुवंशिकता, हार्मोन्सचे असंतुलन, त्वचा आणि स्नायू यांच्यामध्ये लिम्फ द्रव तयार होणे अशा कारणांमुळे होऊ शकतो. आज आपण हे फॅट्स कमी करण्यासाठी काही साधे सोपे व्यायाम जाणून घेणार आहोत.
काखेजवळील फॅट्स कमी करण्यासाठी व्यायाम
1) हात गोल फिरवा. कानापासून वर खाली असे ३६० अंशात फिरवा
2) प्लँक करा, कारण यामध्ये तुमच्या पायाच्या बोटांवर व हाताच्या पुढच्या भागावर शरीराला बॅलन्स करायचे असते. यामुळे खांदे व ट्रायसेप्स मजबूत होऊ शकतात. आणखी फायदे मिळवण्यासाठी तुम्ही आळीपाळीने एक एक हात वर उचलू शकता. त्यावेळी आपण एकाच हातावर संतुलन साधायचे असते.
3) खुर्ची किंवा बेंचच्या मदतीने काही ट्रायसेप डिप्स करा. यामुळे तुमचे ट्रायसेप्स (वरच्या हाताच्या मागील बाजूचे मोठे स्नायू) मजबूत होतात. हा व्यायामही सोपा आहे. यात आपल्याला बसून आपले हात खुर्ची / सोफा किंवा बाकावर मागे ठेवून आपले शरीर आपल्या हातांवर जोर देऊन उठाबशा काढल्या प्रमाणे उचलायचे असते.
4) बायसेप कर्ल्स म्हणजे एखादी जड वस्तू उचलून हात छातीपर्यंत वर उचलणे. यामुळे दंडावर ताण येतो व हळूहळू अतिरिक्त फॅट्स बर्न व्हायला मदत होते. दंड सुडौल करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.
5) थेरा बँड हा प्रकार तुम्ही ऐकलाय का? सोप्या शब्दात सांगायचं तर रबरासारखा ताणला जाणारा हा एक पट्टा असतो. तुम्ही ताठ उभे राहून सुरुवात करा, तुमचे पाय रुंद करा. साधारण खांद्यांइतकी रुंदी पायांमध्ये असावी. हात समोर घ्या आणि एक एक करून उजव्या व डाव्या बाजूला वळवा. यावेळी दोन्ही हातांमध्ये ९० अंशाचा कोन व्हायला हवा हे लक्षात घ्या. आपण हाच व्यायाम डोक्यावर हात उभे धरून सुद्धा करू शकता. एकतर वरून ९० अंशात खाली हात आणून किंवा कोपऱ्यात वाकवून खेचत आपण व्यायाम करू शकता. १२ ते १५ वेळा तुम्ही ही कृती करून मग हळूहळू मूळ स्थितीत या.
प्रत्येक व्यायामाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी आणि स्नायूंना समाविष्ट करणे वाढवायला हवे. सावधपणे आणि काळजीपूर्वक पुढे जा. प्रत्येक व्यायामासाठी, ३० ते ६०-सेकंदांची एक कृती मध्ये ब्रेक व पुन्हा कृती असे दोन ते तीन सेट करावे. दंडावरील फॅट्सच नव्हे तर संपूर्ण शरीरातील अनावश्यक फॅट्स बर्न करण्यासाठी धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे कार्डिओ व्यायाम आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करायला हवेत. योग आणि पिलाटीस या दोन्ही प्रकारांमुळे सध्या अंडरआर्म फॅट कमी करता येऊ शकतात. व्यायामासह संतुलित आहार व सातत्य आवश्यक आहे.