तुम्ही पोटभर जेवल्यानंतरही तुम्हाला गोड खाण्याची इच्छा कधी झाली आहे का? सेंसरी- स्पेसिफिक सॅटीटी (sensory-specific satiety) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटनेचा शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला आहे. जेवणानंतर आपल्याला गोड पदार्थांची तीव्र इच्छा होते हे आपल्या खाण्याच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या जैविक, मानसिक व संवेदी घटकांमुळे होते.
सेंसरी- स्पेसिफिक सॅटीटीची भूमिका (The Role of Sensory-Specific Satiety)
जेवणानंतरही आपल्याला गोड पदार्थांची इच्छा होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे सेंसरी- स्पेसिफिक सॅटीटी. ही संकल्पना विशिष्ट प्रकारच्या अन्नाचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने मिळणारा आनंद कमी होण्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ- जर तुम्ही नुकतेच चविष्ट जेवण घेतले असेल, तर तुमचे चव रिसेप्टर्स (taste receptors) त्या चवींबद्दल असंवेदनशील होतात; परंतु ते गोड चवींना अत्यंत तीव्र प्रतिसाद देतात. म्हणूनच पोट भरले असतानाही गोड पदार्थ खाण्याचा विचार आकर्षक राहतो.
मेंदूची बक्षीस प्रणाली (The Brain’s Reward System)
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याच्या आपल्या इच्छेत आपले मेंदू महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः साखर आणि फॅट्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने डोपामाइन बाहेर पडण्यास सुरुवात होते, जे आनंद आणि बक्षीस मिळाल्याचा भावनेशी संबंधित एक न्यूरोट्रान्समीटर आहे. डोपामाइनची ही वाढ आपले पोट तांत्रिकदृष्ट्या भरलेले असले तरीही अधिक गोड खाण्याची इच्छा वाढवते. मिष्टान्नांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, ते मेंदूला एक बक्षीस मिळाल्याच्या भावनेचे तीव्र संकेत देतात, ज्यामुळे त्यांना प्रतिकार करणे कठीण होते.
उत्क्रांतीचा दृष्टिकोन (The Evolutionary Perspective)
ऐतिहासिकदृष्ट्या आपल्या पूर्वजांना उच्च कॅलरीयुक्त अन्न मर्यादित प्रमाणात उपलब्ध होते, म्हणून जेव्हा जेव्हा ते उपलब्ध असेल तेव्हा तेव्हा फळे आणि मध यांसारख्या ऊर्जासमृद्ध पदार्थांचे सेवन करणे जगण्यासाठी फायदेशीर होते. जरी आजच्या काळाता अन्नटंचाईची समस्या नसली तरी आपले शरीर आणि मेंदू अजूनही शक्य तितक्या वेळा कॅलरीयुक्त अन्न शोधण्यासाठी सज्ज असते, विशेषतः जेवणानंतर जेव्हा पचन सुरू असते तेव्हा.
रक्तातील साखरेचे नियमन आणि हार्मोनल प्रभाव (Blood Sugar Regulation and Hormonal Influence)
जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवण खातो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे ग्लुकोजचे नियमन करण्यासाठी इन्सुलिन सोडले जाते. या प्रक्रियेनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण जलद कमी झाल्यास पातळी पुन्हा स्थिर करण्यासाठी अधिक गोड खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त घ्रेलिन (जे भूक उत्तेजित करते) आणि लेप्टिन (जे तृप्ततेचे संकेत देते) यांसारखे हार्मोन्समध्ये जेवणानंतर चढ-उतार होतात, कधी कधी मिश्रित संकेत तयार होतात, ज्यामुळे आपल्याला शारीरिकदृष्ट्या जास्त अन्नाची आवश्यकता नसतानाही गोड खाण्याचीही इच्छा होते.
खाण्याची संस्कृती (Eating cultures)
अनेक संस्कृतींमध्ये जेवणाचा पारंपरिक भाग म्हणून मिष्ठान्नांचा समावेश केला जातो, ज्यामुळे गोड पदार्थाशिवाय जेवण पूर्ण होत नाही या विचाराला आणखी बळकटी मिळते. याव्यतिरिक्त मिठाईशी भावनिक संबंध असतो, जसे की बालपणी बक्षीस म्हणून मिळणारा गोड पदार्थ किंवा भेटवस्तू म्हणून मिळणारी मिठाई अशा आठवणी गोड पदार्थांशी भावनिक संबंध तयार करतात. त्यामुळे आपले पोट भरलेले असतानाही मिष्ठान्न खाण्याची आपली इच्छा वाढवू शकतात.
भूक कशी नियंत्रित करावी? (How to manage cravings?)
गरजेपेक्षा जास्त खाण्याऐवजी साखरेचा जास्त वापर न करता फक्त भूक भागविण्यासाठी थोडेसे गोड खाण्याचा प्रयत्न करा. प्रक्रिया केलेल्या मिष्ठान्नांऐवजी फळे निवडा. गरम चहाचा कपदेखील मिष्ठान्नाला एक आरामदायी पर्याय ठरू शकतो. जाणीवपूर्वक खाण्याची सवय लावा. भुकेचे संकेत आणि भावनिक ट्रिगर्सकडे लक्ष दिल्याने प्रत्यक्ष भूक आणि सवयीमुळे होणारी गोड खाण्याची इच्छा यांच्यात फरक करण्यास मदत होऊ शकते.
(हा लेख डॉ. रिचा चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्या नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये, एंडोक्रायनोलॉजी विभाागत वरिष्ठ सल्लागार आहेत.)