Unhealthy Habits : मुलांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून पालक नेहमी सजग असतात; पण मुलं मोठी होतात तशा त्यांच्या सवयीखील बदलतात. कधी कधी मुलं अशा काही वाईट आणि घाणेरड्या गोष्टी शिकतात, ज्यामुळे पालकांनाही लाजिरवाणे वाटू लागते. या वाईट सवयींमध्ये मद्यपान, धूम्रपान अशा वाईट सवयींचा समावेश आहे. या वाईट सवयींमुळे केवळ तुमच्या सामाजिक जीवनावरच नाही, तर आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असतो.

एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली की, तरुण वयात करत असलेल्या वाईट सवयींचे दुष्परिणाम तुम्हाला वयाच्या ३६ व्या वर्षात दिसून येतात. या वाईट सवयींमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि शारीरिक निष्क्रियता अशा गोष्टींचा समावेश आहे.

ज्यवास्किला विद्यापीठातील संशोधकांनी फिनिश शहरातील सुमारे ३७ रहिवाशांचे ३० वर्षांहून अधिक काळ आरोग्य आणि शारीरिक बदलांचे निरीक्षण केले. या काळात २७, ३६, ४२, ५० व ६१ वयोगटातील सर्वेक्षण आणि वैद्यकीय चाचण्यांद्वारे डेटा गोळा करण्यात आला.

अ‍ॅनल्स ऑफ मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात असे नमूद करण्यात आले की, तरुण वयातील तीन वाईट सवयी- धूम्रपान, जास्त मद्यपान व व्यायामाचा अभाव यांमुळे वयाच्या ३६ वर्षी आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहेत.

यावेळी संशोधकांनी म्हटले की, वयाच्या ४० ते ५० वर्षातही याच वाईट सवयी सुरू असतील, तर त्यामुळे वृद्धापकाळात विविध प्रकारचे आजार बळावण्याची शक्यता वाढते.

यावेळी विश्लेषणातून असे दिसून आले की, वाईट सवयींचे शरीरावर होणारे वाईट परिणाम ३६ ते ६१ वयातही सारखेच राहिले, यातून असे सूचित होते की, तरुण वयातील वाईट सवयींचे परिणाम वयाच्या ३६ व्या वर्षातच दिसून येत नाही, तर त्यानंतरही ते दिसून येत असतात.

संशोधकांनी सांगितले की, वाईट सवयी फॉलो करणाऱ्या सहभागी लोकांमध्ये वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत त्याचे स्पष्ट दुष्परिणाम दिसून येत होते.

संशोधनातील निष्कर्षांवरून असे दिसून येते, “धूम्रपान, जास्त मद्यपान व शारीरिक निष्क्रियता यांसारख्या धोकादायक सवयी लवकरात लवकर बंद करणे आवश्यक आहे. तसे केले, तर भविष्यातील आरोग्यासंबंधित धोके टाळता येतील. कारण- या सवयींमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते,” ज्यवास्किला विद्यापीठाच्या जेरोंटोलॉजी रिसर्च सेंटरमधील आरोग्य शास्त्रज्ञ व संशोधनाच्या प्रमुख लेखिका तिया केकलायनेन म्हणाल्या.

वाईट सवयी बंद करून निरोगी जीवनशैलींचे पालन केल्यास हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका कमी होतो आणि अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते, असे केकलायनेन म्हणाल्या.

व्यायामाच्या अभावामुळे शारीरिक आरोग्य बिघडते आणि धूम्रपानामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होईल. तसेच, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे.

या तीन वाईट सवयींमुळे दीर्घकाळ नैराश्याची लक्षणे आणि चयापचय जोखीम वाढत असल्याने त्याचे दुष्परिणाम अधिक दिसून आले.

सध्याच्या अभ्यासाचे निष्कर्ष असे सूचित करतात की, या सवयींचे वाईट परिणाम ३६ ते ६१ वयोगटातही समान होते. त्यामुळे वयाच्या ३६ व्या वर्षातच नाही तर त्यानंतरच्या काळातही या सवयींचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात.