Uric Acid: डॉ. अमरेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते. पण जेव्हा आपल्या जीवनशैलीमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर प्रभाव होतो. तेव्हा युरिक ऍसिड वाढीस लागून आपल्याला शरीरात स्पष्ट लक्षणे दिसू लागतात. युरिक ऍसिड छोट्या खड्यांसारखे शरीरात जमा होते. युरिक ऍसिडचा मारा शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. मुख्यतः किडनी निकामी करण्यातही युरिक ऍसिड हे कारण ठरू शकते.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार आंबट पदार्थांचे तसेच प्युरीन युक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यास युरिक ऍसिडचा त्रास वाढतो. असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने शरीरात यूरिक अॅसिड वाढू शकते. आपल्याला जर विशेषतः युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे दिसत असतील तर हे पदार्थ आपण नक्कीच टाळायला हवे.
युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे
शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो, विशेषतः उठताना बसताना या व्यक्तींना सतत आधार घ्यावा लागतो व तरीही वेदना कमी होत नाहीत. बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे ही सर्व युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे आहेत.
‘हे’ पदार्थ वाढवतात किडनी निकामी करण्याचा धोका
युरिक ऍसिड वाढल्यास कोणत्या भाज्या टाळाव्यात?
यूरिक अॅसिडची समस्या टाळण्यासाठी डॉक्टर फ्लॉवर, कोबी, ब्रसेल्स, स्प्राउट्स आणि मशरूम न खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये प्युरीनचे प्रमाण खूप जास्त असल्याने या गोष्टी खाणे टाळावे.
युरिक ऍसिड वाढल्यास मांसाहारात काय खाऊ नये?
मांसाहारामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांच्या वापरामुळे शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याचा धोका असतो आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. हेरिंग, ट्राउट, मॅकेरल किंवा ट्यूना यासारख्या माशांचे सेवन करू नका. सीफूडमध्ये खेकडा किंवा कोळंबी खाणे टाळावे ज्यामुळे यूरिक अॅसिडची पातळी वाढते.
युरिक ऍसिड वाढल्यास कोणता सुका खाऊ टाळावा?
युरिक अॅसिडच्या रुग्णांनी जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, पांढरा ब्रेड, केक, बिस्किटे, कोको, आइस्क्रीम, यीस्ट असलेले पदार्थ, रिफाइन्ड कार्बोहायड्रेट आणि जास्त फॅट्स असणारे पदार्थ खाऊ नयेत. हे खाल्ल्याने यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.
युरिक ऍसिड वाढल्यास दुग्धजन्य पदार्थांमध्ये काय खाऊ नये?
आपल्या आहारात प्रथिने जास्त प्रमाणात घेणे युरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. म्हणून, प्रथिने आणि प्युरीन असलेले पदार्थ खाणे टाळा. युरिक ऍसिडचा त्रास असल्यास दूध, दही, राजमा, मटार, पालक, मसूर खाणे टाळावे. यामध्ये असलेले ट्रान्सफॅट्स शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढवतात.
युरिक ऍसिड वाढल्यास कोणती पेय टाळावीत?
कोल्ड ड्रिंक्स, शीतपेये, सोडा, शिकंजी आणि जास्त साखर असलेले फळांचे रस टाळा. तसेच, आपल्या आहारात मध, सोया दूध, कॉर्न सिरप आणि उच्च फ्रुकटोज असणारे पदार्थ कमी करा. याशिवाय दारू, कोरा चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित ठेवा.
हे ही वाचा<< विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?
युरिक ऍसिड वाढल्यास रात्री काय खाऊ नये?
युरिक अॅसिडच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात झोपण्यापूर्वी डाळ आणि भात खाऊ नये. हे युरिक अॅसिड वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे बोटांच्या आणि सांध्यातील सांधेदुखीचा त्रास अधिक वाढतो. सोललेल्या डाळींचा आहारात समावेश करणे पूर्णपणे टाळा.
(टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)