Using Phone in Toilet: तुम्हालाही फोनची इतकी सवय लागलीय का की, तुम्हीदेखील शौचालयात फोन घेऊन जाता? यावरून अनेकदा तुम्हाला तुमच्या आईने नक्कीच दम दिला असेल आणि शौचालयात फोन वापरायलादेखील हरकत घेतली असेल. प्रत्येकाच्या आईप्रमाणेच वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील शौचालयात फोन वापरण्यास मनाई केली आहे. या लेखाद्वारे आपण पाच अशी मेंदुविकार तज्ज्ञांनी स्पष्ट केलेली कारणे जाणून घेणार आहोत, जी समजल्यावर तुम्ही तुमच्या आईचे म्हणणे लक्षात घ्याल आणि या वाईट सवयीच्या दुष्ट चक्रातून स्वत:ची सुटका करून घ्याल.
“न्यूरोसायन्समधील असंख्य अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, शौचालयात स्मार्टफोनचा सतत वापर केल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात,” असे बेंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या मेंदुविकार आणि हालचाल विकार (Movement disorder) सल्लागार डॉ. हेमा कृष्णा पी. म्हणाल्या. डॉक्टरांनी यासंबंधीच्या कारणांपैकी दिलेली पाच कारणे खालीलप्रमाणे :
दीर्घकाळ बसणे आणि रक्ताभिसरण : शौचालयात असताना फोनवर व्यग्र राहिल्यामुळे आपण तेथे दीर्घकाळ बसून राहण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्ताभिसरण बिघडणे आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढणे यांसारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
आतड्यांच्या हालचालींमध्ये व्यत्यय : स्मार्टफोनमुळे लक्ष विचलित झाल्याने आतड्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा इतर जठर व आतड्यांविषयी समस्या उद्भवू शकतात.
मानसिक अवलंबित्व : या वर्तनामुळे डिजिटल उत्तेजनावर मानसिक अवलंबित्वदेखील निर्माण होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या उपकरणांच्या आधाराशिवाय एकांत किंवा चिंतनाचे क्षण घालवणे कठीण होते.
स्वच्छतेच्या चिंता : बाथरूम हे जीवाणूंच्या वाढीचे ठिकाण आहे आणि या ठिकाणी फोन वापरल्यामुळे हानिकारक जीवाणू फोनवर जाऊ शकतात, जे नंतर चेहरा आणि हातांच्या संपर्कात येतात. त्यामुळे केवळ वैयक्तिक आरोग्यालाच धोका होत नाही, तर फोनवरदेखील अस्वच्छ होत, जीवजंतूंचे आक्रमण होते, जे मग सहजपणे आपल्याकडे संक्रमित होतात.
लक्ष खंडित होणे : या काळात डिजिटल कन्टेंटमध्ये सतत व्यग्र राहिल्याने नैसर्गिक विधीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे शौचालयाबाहेरच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे आव्हानात्मक बनते, ज्यामुळे एकूण उत्पादकता आणि मानसिक स्पष्टतेवर परिणाम होतो.
डॉ. कृष्णमोहन वाय. (क्लिनिकल डायरेक्टर, बॅरिअॅट्रिक आणि जीआय सर्जरी, केअर हॉस्पिटल्स) यांनी सांगितले, “शौचालयात फोन वापरणे हे मूळव्याधीचे थेट कारण नाही. तथापि, ते अप्रत्यक्षपणे त्याला कारणीभूत ठरू शकते किंवा दीर्घकाळ बसून राहिल्याने अस्तित्वात असलेल्या मूळव्याधीची तीव्रता वाढू शकते. फोनवरील कन्टेंटमध्ये व्यग्र राहिल्याने लक्ष विचलित होऊ शकते आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये ताण निर्माण होऊ शकतो.”