अजित अनेक दिवस पोटाच्या तक्रारींनी ग्रस्त होता. “मी जास्तीत जास्त वेळा घरचं जेवणच जेवतोय. तरीही माझं पोट का बिघडतंय मला कळत नाहीये”.
“मी आधी कोरफड प्यायचो .अलीकडे आवळा आणि कोरफड एकत्र घेतो. पण तरीही जड वाटत राहतं”. मी तो माचा चहा (matcha tea ) पण प्यायलो काही दिवस”.
“ काहीतरी हिरवं म्हणून?” मी विचारलं. “ हो कारण ग्रीन म्हणजे हेल्दी ना ?” यावर आम्हा दोघांना खूप हसू आलं.
“ हिरव्या भाज्या तितक्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून हे सगळे प्रयत्न सुरु असतात”.
अजितच्या बोलण्यातच उत्तर आलं याने मलाही समाधान वाटलं.
आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात सकाळ सकाळी ब्रेकफास्ट करावा का?
अनेकदा आहारात भाज्या, फळं यांचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि इतर खाण्याचं प्रमाण अमाप. अशा वेळी कधीतरी भाज्यांचे रस पिणं किंवा भाज्यांचे सूप पिणे असे उपाय करून थोडं मनाचं समाधान केलं जातं. आहारात भाज्यांचा रस प्यावा कि पिऊ नये यावर वादविवाद होत असतात.
भाज्यांचे रस जीवावर बेतल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो देखील. नेमकं आहार शास्त्र काय सांगतं? ते जाणून घेऊया. आपापल्या शरीरात एखादा पदार्थ खाल्ल्यावर पचन करण्याचं काम पचनेंद्रियं करत असतात. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक जीवनसत्त्व आणि पोषकद्रव्ये मुबलक असतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स यकृताचे विकार दार ठेवतात आणि शरीराचा अम्लांश सांभाळण्याचे देखील काम करतात.
आणखी वाचा: Health Special: गुणकारी ताकाची गोष्ट
पालक
आहार शास्त्रामध्ये पालक आणि त्याचे गुणधर्म नेहमी नावाजले जातात. लोह, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर , कॅल्शिअम, जस्त, सेलेनियम इत्यादी पोषकद्रव्ये भरपूर असतात. शिजवून खाल्लेल्या पालकाच्या पदार्थांपेक्षा हलके शिजवून केलेलं सूप किंवा कच्च्या पालकाचा रस कायम गुणकारी असतो. पालकाचा रस प्यायल्याने शरीरातील ऍसिडिटी चे प्रमाण कमी होते आणि यकृताचे आरोग्य सुधारते.
कारलं
चवीला अत्यंत कडू परंतु शरीराला गुणकारक. कारल्यात असणारे पोटॅशिअम, सोडिअमचे प्रमाण शरीरातील जळजळ होणाऱ्या आम्लांशाचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी कारल्याचा रस उपयुक्त आहे.
गाजर
डोळे, त्वचा आणि यकृत या तिन्ही अवयवांची काळजी घेण्यासाठी गाजराचा रस हमखास प्या असं सांगितलं जातं. तंतूमय पदार्थ आणि जीवनसत्त्वे यांचे उत्तम प्रमाण असणारे गाजर रसाहार करणार्याचं लाडकं आहे.
बीट
बीट चवीला हलक गोडसर तुरट असतं. बीटात पोटॅशिअम , मँगनीज आणि फोलेट यांचे प्रमाण उत्तम असते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी बीट प्रभावशाली आहे. खेळाडूंसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील बीटाचा रस गुणकारी आहे.
काकडी
सगळ्यात जास्त पाण्याचे प्रमाण असणारी काकडी रसाहार करणाऱ्यांसाठी गाजराइतकीच लाडकी आहे. काकडीचा रस नियमित प्यायल्याने वजन कमी होऊ शकते, शरीरात योग्य प्रमाणात आर्द्रता राखली जाऊ शकते, आतड्याचे आरोग्य सुधारते आणि त्वचेचे विकार कमी होतात. काकडीतील जीवनसत्त्वाचे प्रमाण आणि त्यातील कमी कॅलरीज (कमी ऊर्जा ) आहार तज्ञांचे लाडकं आहे .
टोमॅटो
स्वयंपाकघरातील सध्या सगळ्यात महाग असणाऱ्या टोमॅटोचा रस अत्यंत गुणकारी आहे. क जीवनसत्त्वाचे मुबलक प्रमाण आणि उत्तम आर्द्रता असणारा टोमॅटो ताज्या रसासाठी उत्तम पर्याय आहे. टोमॅटोमधील लायकोपिन, प्रोस्टेटच्या कर्करोगापासून तसेच हृदयरोगांपासून रक्षण करते.
कोणत्याही भाजीचा रस पिताना शक्यतो तो ताबडतोब पिणे उत्तम. अर्ध्या तासाहून जास्त वेळ ठेवलेला रस अनेकदा आवश्यक परिणाम करू शकत नाही. कारण जास्त वेळ ठेवल्यास त्यातील पोषकद्रव्यांचे विघटन होतं आणि त्यांचा शरीराला अपाय होऊ शकतो . अनेकदा रस पिण्यायोग्य नाहीये हे केवळ वासावरून कळू शकते. त्यामुळे कोणत्याही भाजीचा रस पिताना त्याचा वास जाणून नंतरच त्याचे सेवन करावे.
भाज्यांचे रस तयार करताना त्यातील तंतू पूर्णपणे टाकून देऊ नये. भाज्यांचे रस आणि त्याचे योग्य प्रमाण आणि वेळ जाणून घेण्यासाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.