How To Get Rid Of Gas In Stomach: गंभीर आजारणाची नावे घेतली तर बीपी, ब्लड शुगर, कॅन्सर, डायबिटीज अशी काही नावं आपल्यासमोर येतात. अर्थात या आजारांचे गांभीर्य आम्हीही नाकारत नाही. पण अनेकदा आपल्या शरीराला काही अगदी किरकोळ वाटणाऱ्या समस्यांमुळे सुद्धा पुढे जाऊन मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे अपचन, पोटात गॅस होणे, पोट फुगणे इत्यादी. यामुळे अनेकदा वात येणे, हातापायांना सूज व क्रॅम्प येणे असे असहनीय त्रास होऊ शकतात. यामुळे तुमची शारीरिकच नव्हे तर मानसिक स्थिती सुद्धा प्रभावित होऊ शकते. अनेकजण पोटातील गॅसवर उपाय शोधत असतात, अनेकदा अमुक पाणी प्या, तमुक मसाल्याचे सेवन करा असे उपाय सांगितले जातात पण यावर सर्वात प्रभावी उपाय आहे किंचित हालचाल करणे. आज आपण अगदी नवशिक्यांनाही करता येतील अशी तीन योगासने पाहणार आहोत ज्याने पोटातील गॅस चटकन निघून जाण्यास मदत होते.
इंडियन एक्सप्रेसला योगाभ्यासक व गुरु कामिनी बोबडे यांनी यासाठी भुजंगासन, अष्टांग नमस्कार आणि सुप्त पवनमुक्तासन करायची सोपी पद्धत व फायदे समजवून सांगितले आहेत. एकाच क्रमाने केल्यास तीन आसने पोटाला ताणतात आणि संकुचित करतात, त्यामुळे वायू बाहेर पडण्यास मदत होते, यासह ही आसने हात आणि पायांचे स्नायू मजबूत करतात, तुमचा मणका मजबूत करतात, पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेमध्ये आराम देतात.
भुजंगासन (कोब्रा पोझ)
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा.
- दोन्ही पाय जुळवून घ्यावेत. हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताचे कोपरे शरीराला लागून व समांतर असावेत.
- दीर्घ श्वास घेऊन हळुवार डोके, छाती व पोट वर उचला.
- आता हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा.
- पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत सजग राहून श्वास घ्या.
- आसनस्थिती सोडताना श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.
अष्टांग नमस्कार
माउंटन पोझच्या स्थितीतून, श्वास सुरू ठेवा, हात सरळ ठेवा आणि तळवे त्याच स्थितीत घट्ट ठेवा. शरीराचे गुरुत्वाकर्षण केंद्र शोधण्यासाठी तुमचे शरीर जमिनीच्या समांतर ठेवा, त्यानंतर तुमचे गुडघे जमिनीपासून वर उचला हळूहळू छाती व हनुवटीकडे न्या जेणेकरून तुमचे नितंब वरच्या दिशेने उचलले जाईल. हळूहळू पाय खाली घ्या. हीच क्रिया तीन ते पाच वेळा करू शकता.
सुप्त पवन मुक्तासना (विंड रिलीज पोझ)
शरीर सैल ठेवून पाठीवर झोपा
तुमचा उजवा पाय दुमडा, हाताच्या बोटांनी पायाची बोटे धरून पाय उजव्या गुडघ्याच्या थोडे खाली घ्या.
डावा पाय जमिनीवर सरळ राहू द्या.
दुमडलेल्या गुडघ्यांसह, श्वास घ्या व सोडा
नंतर तुम्ही श्वास सोडत असताना, तुमचे डोके हळू हळू वर करा आणि उजव्या गुडघ्यावर तुमची हनुवटी, नाक किंवा कपाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा असेल तेव्हा तुमचे डोके जमिनीवर परत करा आणि उजवा पाय सरळ करा.
डाव्या पायाने हि क्रिया पुन्हा करा.
दरम्यान, काळजी घेणे हे उपायांपेक्षा अधिक सोयीचे असते त्यामुळे ज्या कारणांनी पोटात गॅसचे प्रमाण वाढते त्या गोष्टी टाळण्याकडे लक्ष द्या.