Virat Kohli On Turing Vegetarian: टीम इंडियाचा हुकुमी एक्का म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू विराट कोहली हा त्याच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये भारताचा माजी स्टार युवराज सिंगने सुद्धा विराट कोहलीच्या फिटनेसचे कौतुक करत “जेव्हा पासून कोहली संघाचा कर्णधार झाला तेव्हा पासून संघाच्या फिटनेसचा स्तर प्रचंड वाढला”, असे म्हटले होते. विराट कोहलीने आपल्या फिटनेसचे श्रेय हे व्यायामाइतकेच त्याच्या आहाराला दिले आहे. 2018 मध्ये, विराट कोहलीने आरोग्यासाठी आहारासंबंधित अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत शाकाहारी होण्याचे ठरवले होते. २०२० मध्ये इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनसह संभाषणाच्या वेळी, कोहलीने शाकाहार निवडण्याचे कारण ठरलेल्या त्रासांचा सुद्धा उल्लेख केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहली म्हणाला की, “२०१८ मध्ये, जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो, तेव्हा मला एक कसोटी सामना खेळताना सार्विकल स्पाईनचा त्रास झाला होता. त्यामुळे माझ्या उजव्या हाताच्या करंगळीपर्यंतच्या मज्जातंतू संकुचित झाल्या होत्या. परिणामी माझी करंगळी सुन्न झाली होती व हातालाही सतत मुंग्या येत होत्या. यामुळे मला रात्री झोप लागत नव्हती व प्रचंड वेदना होत होत्या.”

“काही चाचण्या केल्यावर असे लक्षात आले की माझ्या शरीरात खूप आम्ल साचले असल्याने युरिक ऍसिड तयार झाले आहे. मी त्यावेळेस कॅल्शियम व मॅग्नेशियमचा पुरवठा वाढवण्यासाठी गोळ्या घेत होतो पण एवढंच पुरेसं नव्हतं. माझं पोट माझ्या हाडांमधून कॅल्शियम शोषून हाडांना ठिसूळ करत होतं. म्हणूनच इंग्लंड दौऱ्याच्या वेळी मी मांसाहार पूर्ण टाळायचं ठरवलं, आणि खरंच सांगायचं तर मला कधीच इतकं बरं वाटलं नव्हतं. यामुळे माझी ऊर्जा सुद्धा वाढली आहे”

कोहलीच्या शाकाहारी आहारातून फायदे झाल्याच्या मतावर तज्ज्ञांचं काय मत आहे हे आता आपण जाणून घेऊया. इंडियन एक्सस्प्रेसने डॉ संतोष पांडे, अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचार, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांच्याची बोलून शाकाहार व आरोग्य यांचा परस्पर संबंध काय याविषयी माहिती दिली आहे. शिवाय असा निर्णय घेताना आपणही काय काळजी घ्यायला हवी हे सुद्धा डॉ. पांडे यांनी सांगितले आहे.

डॉ. पांडे सांगतात की, शाकाहारी आहारात कॅल्शियम भरपूर असू शकते, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पालेभाज्या, फोर्टिफाइड प्लांट-आधारित दूध आणि टोफू यांसारखे पदार्थ दुग्धजन्य पदार्थांच्या गरजेशिवाय कॅल्शियम देऊ शकतात. शाकाहारी जेवण, विशेषत: पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की फळे आणि भाज्या, रक्तदाब कमी करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. संतुलित शाकाहार किंवा वनस्पती-आधारित आहार निवडताना मायक्रो न्यूट्रियंट्स (पोषक सत्वांकडे) लक्ष द्यायला हवे.

LEAN या संस्थेच्या संस्थापक व पोषण प्रशिक्षक सुविधा जैन यांनी सांगितले की ” जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध शाकाहार आरोग्यसाठी उपयुक्त ठरू शकतो. वनस्पती-आधारित पदार्थांचा समावेश विशेषतः हिरव्या भाज्या, फायबरचे सेवन वाढवते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनास मदत करते.

विराट कोहलीने मांसाहार का बंद केला?

या आहारांमध्ये संतृप्त चरबीचे सेवन कमी केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते, हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि यातील बहुसंख्य पदार्थांच्या कॅलरीज कमी असल्याने वजन व्यवस्थापन आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

हे ही वाचा<< विराट कोहलीच्या आहारात ९० टक्के उकडलेले पदार्थ! तज्ज्ञ सांगतात, तेल, मसाल्याचा वापर बंद करावा का? उलट..

शाकाहार निवडताना हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की शाकाहारामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात, परंतु प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचे पुरेसे फायदे मिळवण्यासाठी जेवणाचे ताट काळजीपूर्वक ठरवून तयार करायला हवे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli big decision for fitness in crazy spine pain turns vegetarian doctor explains how body changes after skipping nonveg svs
Show comments