शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर व कार्ब्स इत्यादींची गरज असते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ किंवा कोबालामीन (Cobalamin) हे एक असे जीवनसत्त्व आहे की, जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. शरीराला ताकद मिळण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ ची नितांत गरज असते. शरीरामध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरातील पेशींसाठी तसेच नसा आणि डीएनएसाठी विटामिन बी-१२ हा अत्यंत गरजेचा घटक आहे. व्हिटॅमिन बी-१२ किंवा कोबालामिन हा मानवी शरीराला विविध चयापचय प्रक्रियांसाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा पोषक घटक आहे. व्हिटॅमिन बी-१२ हा असा एक पोषक घटक आहे; जो तुमच्या नसा निरोगी ठेवणे, सामान्य मेंदूचे कार्य राखणे आणि डीएनए व लाल रक्तपेशी तयार करणे यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच इतर जीवनसत्त्वांप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक समजला जातो. पण, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दिसून येते. त्यामुळे महिलांमधील व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता कशी दूर करता येईल, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह यांनी माहिती दिली आहे. डॉ. अंजना सिंह सांगतात, आजच्या धावपळीच्या जीवनात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनत आहे. व्हिटॅमिन बी-१२ हे एक असे जीवनसत्त्व आहे; जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. मात्र, त्याची कमतरता शरीरासाठी खूप हानिकारक आहे. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे त्वचा, डोळ्यांच्या समस्यांसह न्यूरॉलॉजिकल आजार होतात. त्यामुळे या व्हिटॅमिनच्या कमतरतेच्या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असे डाॅक्टर सांगतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात, व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते; ज्यामुळे अशक्तपणाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे अनेक मोठ्या आजारांचा धोकाही वाढतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे गर्भपात, बाळाचा अयोग्य विकास आणि जन्मादरम्यान होणाऱ्या समस्यांमुळे गर्भवती महिलांमधील समस्या अधिक वाढतात. ज्या स्त्रिया बाळाला दूध पाजतात, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असू शकते. बी-१२ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लोकांना डिप्रेशनलाही सामोरे जावे लागू शकते. या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन बी-१२ सप्लिमेंट्सचा वापर करायला सांगू शकतात. महिलांना कधी कधी असे होते की, सकाळी उठल्यावर थकवा जाणवू लागतो. दिवसभर फक्त झोपूनच राहावे, असे वाटते. त्याचप्रमाणे हाता-पायांमध्ये मुंग्या येणे किंना सुन्न पडणे, धूसर दिसणे, खूप जास्त घाम येणे ही सर्व लक्षणे वास्तविकत: व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे जाणवत असतात. व्हिटॅमिन्स हा सेंद्रिय संयुगांचा समूह आहे; ही व्हिटॅमिन्स मानवी शरीराच्या सामान्य वाढीसह पोषणासाठीही आवश्यक असतात. मासे हा विटामिन बी-१२ चा मुख्य स्रोत आहेत. त्याचप्रमाणे ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी-१२ असल्यामुळे ते खाणे फायदेशीर ठरु शकते. मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे खाद्यपदार्थ या जीवनसत्त्वाचे प्रमुख नैसर्गिक स्रोत असल्याने, दररोज सुमारे ३ एमसीजी (गर्भवती किशोरवयीन आणि स्त्रियांना २.६ mcg आवश्यक आहे; तर स्तनपान करवणाऱ्या किशोरवयीन आणि स्त्रियांना २.८ mcg आवश्यक आहे) हे पदार्थ खाणं आवश्यक आहे. ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात मांस किंवा मासे खात नाहीत, त्यांना दूध, दही, कॉटेज चीज, चीज व दही हे पर्याय उपयोगी पडू शकतात, असेही त्या सांगतात. परंतु, कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही त्यांनी नमूद केले.